बंगाल म्हणजे काय, तर शरच्चंद्र आणि रवींद्रनाथांचा प्रांत. शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांच्या साहित्याची ताकद गतकाळातील नाटककार भा. वि. तथा मामासाहेब वरेरकर यांनी ओळखली. त्यांनीच मराठीत शरच्चंद्रांचे साहित्य रुजवले. दुसरीकडे शरदबाबूंची प्रत्येक साहित्यकृती वाचणे ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी नरहर कुरुंदकर यांनी, ‘धार आणि काठ’ या त्यांच्या समीक्षा संग्रहात, एक विस्तृत परिशिष्ट लिहिले आहे.
शरच्चंद्रांच्या साहित्याचे यथास्थित महत्त्व त्यातून स्पष्ट होते. काळ बदलला तसे शतकाभरापूर्वीच्या साहित्याचा परिचय करून घेण्याचे तंत्रही बदलले. तथापि, नव्या माध्यमांनाही शरच्चंद्रांच्या साहित्याची मोहिनी टाळता आली नाही. सिनेमा आणि दूरचित्रवाणीवरील मालिकांनी, त्यांची जादूई साहित्य संपदा सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
या सर्व प्रयत्नांमध्ये शरच्चंद्रांच्या अनुवादित साहित्याचे महत्त्व वादातीत आहे. चट्टोपाध्याय हे भारतीय भाषांमध्ये अनुवादित झालेले श्रेष्ठ लेखक आहेत. संख्या आणि गुण या दोन्ही पातळ्यांवर ही स्थिती आहे. यावरून या अनुवादित साहित्याची महती समजते.
नुकत्याच प्रकाशित झालेल्या, शरच्चंद्र चट्टोपाध्याय : सिलेक्टेड स्टोरीज या अंजिता घटक ( Anchita Ghatak‘) यांच्या अनुवादित पुस्तकाने ही बाब अधोरेखित केली आहे.
घटक यांनी शरच्चंद्रांच्या निवडक दहा कथांचे, इंग्रजीत अत्यंत संवेदनशीलपणे संपादन आणि भाषांतर केले आहे. हा अनुवाद म्हणजे केवळ कल्पनाविलास नसून, तो तत्कालीन समाजमानसाचा जिवंत दस्तावेज आहे. अंजिता घटक यांनी या संग्रहाची विभागणी मुख्यत्वे दोन भागांत केली आहे- पहिला भाग बालमनाचे भावविश्व आणि निष्पापपण उलगडणारा आहे, तर दुसरा भाग सामाजिक विषमतेचे दाहक वास्तव मांडणारा आहे.
पुस्तकातील ‘लालू’ ही कथा बालपणातील अवखळपणाचे आणि बालसुलभ बंडखोर वृत्तीचे सुंदर चित्रण करते. लालूच्या खोडकरपणाच्या मागे मानवी सहानुभूतीची एक उपजत जाण कशी दडलेली असते, हे शरच्चंद्रांनी अत्यंत मार्मिकपणे रेखाटले आहे. दुसरीकडे, ‘महेश’ ही कथा वाचकाला अस्वस्थ करते. दारिद्र्य, जातीयता आणि ग्रामीण भागातील सरंजामशाही यांच्या कचाट्यात सापडलेल्या ‘गफूर’ नावाचा गरीब विणकराची ही गोष्ट आहे.
गफूर आणि त्याचा लाडका बैल महेश यांच्यातील मूक, तरीही घट्ट नाते सांगणारी ही कथा. पाण्याचे दुर्भिक्ष आणि समाजाची क्रूरता यामुळे या नात्याचा जो करुण अंत होतो, तो वाचकाला सुन्न करतो. ‘देवदास’ किंवा ‘परिणीता’सारख्या अजोड साहित्य कृती देणार्या शरच्चंद्रांच्या लेखनाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांच्या कथांमधील ्त्रिरया! पुरुषप्रधान आणि कर्मठ समाजाच्या चौकटीत कोंडलेल्या, तरीही आपल्या आंतरिक नैतिकतेशी आणि आत्मसन्मानाशी तडजोड न करणार्या ्त्रिरया या संग्रहातही भेटतात. गरिबी, वर्गकलह आणि स्त्री-पुरुष नातेसंबंधांमधील भावनिक गुंतागुंत, लेखकाने उपदेशाचे डोस न पाजता केवळ प्रसंगांमधून उभी केली आहे. हे सर्व अनुवादानेही जपले आहे.
भाषांतर हा मूळ साहित्याचा आत्मा टिकवून ठेवण्याचा एक कठीण प्रवास असतो. ‘क्षुरस्य धारा निशिथा दुरत्यया’ याचे अनुवाद हे उत्तम उदाहरण आहे. तलवारीच्या पात्यावरून चालणे आणि अनुवाद करणे सारखेच. म्हणूनच अनुवादसुद्धा स्वतंत्र साहित्य कृती मानावी लागते. अंजिता घटक यांनी शरच्चंद्रांच्या मूळ बंगाली भाषेतील जानपदीय बाज आणि भावनिक आर्द्रता इंग्रजीत आणताना कमाल केली आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील ग्रामीण बंगालचे चित्र, तेथीली संस्कृती आणि बोलीभाषेचा लहेजा इंग्रजीतही तितकाच प्रभावीपणे आला आहे.
त्यामुळे हा कथासंग्रह केवळ साहित्याचे अभ्यासक किंवा बंगाली साहित्याचे चाहते यांच्यासाठीच नाही. तर मानवी स्वभावाचे विविध पैलू समजून घेऊ इच्छिणार्या प्रत्येकासाठी एक समृद्ध करणारा अनुभव आहे. अगदी संथ लयीत सुरू होणार्या या कथा वाचकाला कधी खिळवून ठेवतात आणि कधी अंतर्मुख करतात, हे समजतही नाही. पुस्तकाला प्रस्तावना आहे पण अशा प्रकारच्या पुस्तकांना, प्रदीर्घ आणि चिकित्सक प्रस्तावनेची गरज असते. कथांमधून न आलेला साहित्याचा प्रवाह या निमित्ताने मांडता येतो. काही वेळा अशी प्रस्तावना हीसुद्धा महत्त्वाची कृती ठरते. मराठीत असे उदाहरण आहे- ‘भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा’ या पुस्तकाला दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी लिहिलेली प्रस्तावना माहीत असणार्यांना हा मुद्दा ध्यानी येईल.
तथापि, या पुस्तकाची एक उणी बाजूही आहे. या कथा नेमक्या कुठे आणि कोणत्या वर्षी प्रकाशित झाल्या याचा उल्लेखही हवा होता. केवळ एक नोंद नसणे एवढीच ही बाब नाही. कोणत्या काळात लेखकाने हा विचार मांडला हे त्यावरून स्पष्ट होते. लेखकाच्या ताकदीचा अंदाज येतो. शरदबाबूंचे साहित्य हे इथल्या महिलांच्या वेदनेचा हुंकार आहे. तो त्या काळातही क्रांतिकारक होता. एरवी शरच्चंद्र आजही जवळचे वाटले नसते.
अंचिता घटक सामाजिक भान असणार्या लेखिका आहेत. त्यांची लेखणी ्त्रिरयांच्या मनोव्यापारापुरती सीमित नाही. त्या स्त्रियांच्या चळवळीत हिरिरीने लढणार्या कार्यकर्त्या आहेत. म्हणून एरवीचा हा साधा दोष उणीव म्हणून लक्षात राहतो. तरीही शरच्चंद्रांच्या साहित्याची ताकद आणि मानवी करुणा यांना समान स्पर्श करणारे हे पुस्तक आहे, याची जाणीव पुस्तक संपले तरी राहते.
कुरुंदकरांनी शरच्चंद्रांच्या साहित्याला शरद ऋतूतील चांदण्याची उपमा दिली आहे. हे चांदणे जेव्हा खर्या अर्थाने खुलते तेव्हाच त्याला परतीचे वेध लागतात. या पुस्तकालाही हे उदाहरण लागू होते. आणखी कथा हव्या होत्या असे वाटत असतानाच पुस्तक वाचून होते. हीच या पुस्तकाची ताकद आहे.
शरच्चंद्र चट्टोपाध्याय : सिलेक्टेड स्टोरीज
अनुवाद – अंचिता घटक
प्रकाशक – एकदा प्रकाशन
पृष्ठे – १८९, किंमत- २९९ रु.
satul68@gmail.com
