सारनाथ बॅनर्जी हे अव्वल दर्जाचे चित्रकादंबरीकार. ‘ग्राफिक नॉव्हेल’ अर्थात चित्रकादंबरी हा प्रकार भारतात रुळवणाऱ्या पहिल्या चित्रकार-लेखकांपैकी एक. ‘अॅब्सोल्यूट जफर’ ही त्यांची नवी चित्रकादंबरी बर्लिनमध्येच जन्मलेल्या, वाढलेल्या पण भारतीय बाप आणि पाकिस्तानी आई यांच्या मुलाबद्दल आहे. मुलाचं नाव जफर. वडिलांचं भृगू. हे भृगू जफरच्या लहानपणीच त्याच्यावर भारतीय उपखंडातल्या गोष्टींचा मारा करतात- सतत त्याला दिल्ली/ कोलकाता किंवा कराचीबद्दल सांगत राहतात. तिथली भुतं, चटपटीत ‘चाट’ विकणारे ठेले… किंवा अगदी स्वत:चीच चुलत/ मामे/ आते/ मावस भावंडंसुद्धा… हे सारं जफरला परकंच वाटतंय, हे मात्र भृगूला फार उशिरा कळतं… तोवर जफर वयात आलेला असतो आणि भृगूचं वय होऊ लागलेलं असतं. भृगूचं रगेल तारुण्य सरून वार्धक्याच्या खुणा दिसण्याचं वर्णन सारनाथ खुसखुशीतपणे करतात. तो बॅडमिंटनऐवजी ज्युडो खेळू लागला, पूर्वी त्याची नुसती चिडचिड व्हायची तर आता तो राग थेट व्यक्तच करू लागला, पचनाची काळजी करावीच लागू लागली… आणि ‘चालणं हाही व्यायामच की’- अशी त्यानं स्वत:ची समजूत करून घेतली.
आजघडीला सारनाथ बॅनर्जी हे नेमके वयाच्या याच टप्प्यावर आहेत. तेही बर्लिनला राहतात. चित्रकलेच्या प्रांतातही सारनाथ यांना मान आहे, हे २०२५ च्या ‘बर्लिन बिएनाले’साठी त्यांच्या चित्रांची (हे चित्रकादंबरीचेच अंश होते) झालेली निवड किंवा खासगी कलादालनांनी सारनाथ यांची चित्रं आम्ही विकतो हे जगाला दाखवण्यासाठी ती चित्रं विविध ‘आर्ट फेअर’मध्ये मांडणं, यातून दिसलं होतंच आणि पाकिस्तानी चित्रकर्तीसह बर्लिनमध्ये ते राहायचे, हेही अनेकांना माहीत आहे. त्यांना एक मुलगाही आहे, त्याला बहुतेक काळ सारनाथ यांनी वाढवलं. थोडक्यात, ही चित्रकादंबरी आत्मपर आहे!
इतरही अनेकांच्या चित्रकादंबऱ्यांत आत्मपर सूर अधूनमधून येऊ शकतो, चित्रकार-लेखकाला अस्वस्थ करणारे प्रसंग किंवा दृश्यं ही अनेकदा चित्रकादंबरीत केंद्रस्थानीही असतात, हे ठीक. पण सारनाथ यांची आगामी चित्रकादंबरी यापेक्षा निराळ्या अर्थानं आत्मपर असेल- तिच्यात स्वत:ला खोदून काढण्याचा लेखकाचा प्रयत्न दिसेल. अर्थात, सारनाथ बॅनर्जी यांची कथानकं कधीच सरळ एका रेषेतली नसतात. त्यामुळे मुलाला भारतीय उपखंडाबद्दल सांगितलेल्या गोष्टी हाही या पुस्तकातला रंजक भाग असणार, अशी अटकळ आहे. बसक्या आकाराचं, २७२ चित्रमय पानांचं आणि ७९९ रुपये किमतीचं हे पुस्तक ‘जानेवारी २०२६ मध्ये प्रकाशित होईल’ एवढंच ‘हार्पर कॉलिन्स’ या प्रकाशकांनी जाहीर केलं आहे.
