पाटणजवळच्या मान्याची वाडीतील शिवारात चरत असलेल्या गाईचा तोरा काही औरच होता. नाकात नथ, कानात डूल, ओठांवर लिपस्टिक, गळ्यात मोत्याची माळ अशा साजश्ृंगारात तिचे मोहक बागडणे लक्ष वेधून घेत होते. तिच्याच बाजूला कृष्णवर्णाचा अभिमान बाळगत म्हैससुद्धा गवताचे घास घेत होती. तिलाही ब्युटीपार्लरमधून छान सजवून पोट भरण्यासाठी पाठवले होते.

काही अंतरावर एक सांड व रेडासुद्धा चार्‍याचा आस्वाद घेत होते. दोघेही बिचारे या दोघींकडे बघत होते. खाता खाता तोंडातून टपकणारी लाळ त्यांच्या मनोवस्थेचे वर्णन करण्यासाठी पुरेशी होती. अचानक दोघे गाई व म्हशीच्या दिशेने धावत सुटले. त्यांना पाहताच दोघी धूम पळू लागल्या. सुमारे वीस मिनिटे हा पाठलाग सुरू होता. थकल्यावर गाय व म्हशीने ‘दुरून बोलत असाल तर चर्चेची तयारी आहे’ असे ओरडून सांगताच चौघेही एका झाडाखाली जमले. मग सांडाने सुरुवात केली.

‘सध्या दिवस तुमचेच आहेत हे मान्य. लाडकी बहीण काय, आता नारीशक्ती विधेयक काय, गोमाता काय व आता ‘गाई-म्हशींसाठी ब्यूटीपार्लर’ काय? आमची कुणी दखलच घेत नाही. अरे, तुमच्यापेक्षा जास्त राबतो आम्ही. आमच्यामुळे वंशावळ तयार होते पण माणूस काळजी करतो ती तुमचीच. हा अन्याय नाही का?’ असे म्हणत सांडाने थोडे जवळ जाण्याचा प्रयत्न करताच गाईने ‘अंघोळ न केल्याने तुझा वास येतो’ असे म्हणत त्याला दूर केले. यामुळे चिडलेला सांड आणखीच खवळला.

‘वसूबारसच्या दिवशीसारखे थोडे सजलात म्हणून जरा जास्तच तोरा मिरवता काय? आता आम्हीही सार्‍या बैलांना एकत्र करतो व गावचे शंकरपटाचे स्वप्नच उधळवून लावतो.’ यावर रेडा म्हणाला ‘मीही असहकार पुकारणार. गुरांच्या बाजाराच्या दिवशी बसकण मारणार, कितीही मारले तरी उठणारच नाही. काळे असलो म्हणून काय झाले. आम्हीही ‘दिलवाले’ आहोतच की!’ मग दोघेही एकसुरात बोलू लागले. ‘माणसांच्या बळावर सौंदर्याचा माज करू नका. भलेही आज त्यांचे प्रेम उतू जात असेल पण तुमच्यावर प्रेम करण्याचा नैसर्गिक हक्क आमचाच आहे हे कायम लक्षात ठेवा.

आपले गाव आदर्श आहे. अशा ठिकाणी ब्युटीपार्लर उभारून नर-मादी असा भेद करणे योग्य नाही. आम्ही भेद करत नाही असे गावकरी म्हणत असले तरी पार्लरमध्ये तुम्हालाच प्राधान्य मिळते. क्वचित आम्हाला नेले तर पाणी संपलेले असते. हा अन्याय जाऊन सांगा तुमच्या मालकांना.’ असे म्हणत दोघांनी पुन्हा जवळ जाण्याचा प्रयत्न करताच गाय व म्हशीने गावाकडे धूम ठोकली.

हा प्रसंग गावातल्या कुणाला ठाऊक होण्याचे काही कारण नव्हते. मात्र नंतर एकेक गोष्ट घडायला लागली. गावातले बैल शंकरपटाच्या ऐन शर्यतीत बसायला लागले. रेतन केंद्रात यायला सांड नकार देऊ लागले. मारून मुटकून आणलेच तर नाक मुरडू लागले. गुरांचा बाजार असेल तर रेडे गोठ्यातून बाहेरच पडेनात. आता वंशावळ संपते की काय या भीतीने सारे गावकरी मग चावडीवर जमले. बराच खल झाला. कुणी तरी पार्लरमधील भेदभावाकडे लक्ष वेधले. यावर गंभीर चर्चा झाल्यावर सांड, बैल व रेड्यांसाठी नव्याने पार्लर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या निमित्ताने गावाला दुसर्‍यांदा प्रसिद्धी मिळेल या समाधानात सारे पांगले. तिकडे गोठ्यात केव्हाच आनंदोत्सव सुरू झाला होता!