ब्रिटनचा मध्यम पल्ल्याचा धावपटू सेबेस्टियन को याने ॲथलेटिक्समध्ये जागतिक स्तरावर छाप उमटवण्याबरोबरच खेळाच्या प्रशासनातही महत्त्वाची भूमिका बजावली. मैदानावरील विक्रमांपासून ते आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनांचे नेतृत्व करण्यापर्यंतचा त्याचा प्रवास प्रेरणादायी आहे.
सर्गेइ बुब्काने ज्या १९८० च्या दशकात पोल व्हॉल्टमध्ये एका पाठोपाठ एक जागतिक विक्रमांची रास रचली, त्याच दशकात आणखी एका ॲथलीटने त्याच्या क्रीडा प्रकारात जागतिक विक्रमांचा धडाका लावला होता. हा होता ब्रिटनचा सेबेस्टियन को. त्याने कारकीर्द सुरू असताना, बुब्काप्रमाणे स्वत:चेच विक्रम मोडले. बुब्काइतके ३५ नाही, तर १२. पण, ते धावण्याच्या आणि त्यातूनही मध्यम अंतर धावण्याच्या स्पर्धेत. हे थोडे अधिक कठीण. कारण, यात दीर्घ अंतराच्या धावण्याचे तंत्र, अखेरच्या काही मीटर अंतरात वेगाने धावण्यासाठी ‘स्प्रटिंर’चे कसब आणि या दोन्हींचे मिळून एकत्रित भान आवश्यक असते. सॅबेस्टियन को तसाच होता. म्हणूनच तो ८०० मीटर आणि १५०० मीटरच्या शर्यतींमध्ये विक्रमांवर विक्रम रचू शकला.
को याचा जन्म १९५६ मधला. लंडन ही जन्मभूमी. पण, को आणि त्याचे कुटुंबीय नंतर शेफिल्डमध्ये स्थलांतरित झाले. तेथेच त्याची धावण्यातील कारकीर्द सुरू झाली. हॅलेमशायर हॅरियर्स हा शेफिल्डमधील १८९६ मध्ये स्थापन झालेला क्लब. त्या क्लबमध्ये को याचे प्रशिक्षण सुरू झाले. मध्यम अंतराचा धावपटू म्हणूनच त्याच्यातील कौशल्याला पैलू पाडले गेले. अर्थात, जोडीने अभ्यास मागे पडला, असे झाले नाही.
ब्रिटनच ते. नेमस्तपणा रक्तातच. को यानेही खेळ सुरू असताना लॉहबरो विद्यापीठात अर्थशास्त्र आणि सामाजिक इतिहास या विषयाचे पदवी शिक्षण घेतले. को याला त्याच्या क्रीडा प्रकारातील पहिले ठळक अस्तित्व जाणविण्यासाठी १९७७ साल उजाडावे लागले. त्या वर्षी सेबेस्टियन को याने युरोपीयन इनडोअर स्पर्धेतील ८०० मीटर शर्यत जिंकली. एक लक्षात घ्यायला हवे, की हे यश त्याला २२ व्या वर्षी मिळाले. अनेक यशस्वी खेळाडू या वयात ऑलिम्पिक गाजवून आलेले असतात. को याला ऑलिम्पिक स्पर्धेत उतरण्यासाठीच वयाची २४ वर्षे उलटावी लागली.
को १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये पोचेपर्यंत त्याने ८०० आणि १५०० मीटर शर्यतीतील विश्वविक्रम अवघ्या ४१ दिवसांच्या फरकाने मोडले होते. हे साल होते १९७९. त्या आधी ८०० मीटरमध्ये यूकेसाठी नवा विक्रम रचणाराही को हाच होता. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिले मोठे जेतेपद मिळविल्यानंतरच्या तीन वर्षांत सॅबेस्टियन को मध्यम अंतराच्या दोन स्पर्धांतील विश्वविक्रमवीर झालाही होता. पण, तुम्ही विश्वविक्रमवीर असलात, म्हणून तुमचा ऑलिम्पिकमधील विजय निश्चित असतोच असे नाही, याची प्रचिती त्याला विश्वविक्रम रचल्यानंतरच्या वर्षभरातच यायची होती. नोंद म्हणून : को याची ८०० मीटरमधील सर्वोत्तम विश्वविक्रमी कामगिरी १ मिनिट ४१.७३ सेकंद, तर १५०० मीटरमध्ये ३ मिनिटे २९.७७ सेकंद.
सेबेस्टियन को जेव्हा त्याच्या कारकिर्दीतील अत्यंत उच्च दर्जाची कामगिरी करत होता, त्याच वेळी ब्रिटनचे अन्य दोन मध्यम अंतर धावपटू कमाल बहरात होते : स्टीव्ह क्रॅम आणि स्टीव्ह ओवेट. सेबेस्टियन को याची पूर्ण कारकीर्द या दोघांशी तीव्र स्पर्धा करण्यात गेली. मध्यम अंतराच्या शर्यतींमध्ये आलटून पालटून या दोघांपैकी एकाबरोबर त्याचे द्वंद्व चुकले नाही. पण, या द्वंद्वांनी ऑलिम्पिकमधील ८०० आणि १५०० मीटरच्या शर्यती देखण्या बनविल्या हेही तितकेच खरे. आणखी उल्लेखनीय बाब म्हणजे त्या वेळी धावण्यासारख्या क्रीडा प्रकारात आफ्रिकन आणि अमेरिकनांना मागे टाकून तीन-तीन ब्रिटिश खेळाडू वर्चस्व राखून होते.
आधी म्हटले, तसे को १९८० च्या ऑलिम्पिक स्पर्धेत उतरला, तेव्हा अगोदरच ८०० आणि १५०० मीटर शर्यतींतील विश्वविक्रमवीर होता. साहजिकच ८०० मीटरच्या शर्यतीत तो संभाव्य जेता म्हणूनच पळत होता. पण, या शर्यतीत – जिला सेबेस्टियन को स्वत:ही कारकिर्दीतील ‘अत्यंत वाईट’ शर्यत म्हणतो – त्याला स्टीव्ह ओवेटने मागे टाकले. ओवेटला सुवर्णपदक, को याचे रौप्यपदकावर समाधान. अस्वस्थ को याला या शर्यतीतील पराभव स्वस्थ बसू देत नव्हता. त्याला त्याचा वचपा काढायची संधी सहा दिवसांनी मिळणार होती, १५०० मीटरच्या शर्यतीत. आधी ८०० मीटरची शर्यत जिंकल्याने १५०० मीटरच्या शर्यतीतही ओवेटच्या नावाची उच्च रवाने चर्चा होणे स्वाभाविक होते. को मात्र सुवर्णपदकासाठी इरेला पेटला होता.
१५०० मीटर अंतराच्या शर्यतीत दमसास महत्त्वाचा, पण ती मॅरेथॉनसारखी दीर्घ नसल्याने स्प्रिंटिंगचे कौशल्यही असावे लागते. पहिले हजार-बाराशे मीटर दमसास ठेवून फार कुणाच्या मागे पडणार नाही, असे धावायचे आणि शेवटच्या २००-३०० मीटरमध्ये वेग वाढवत न्यायचा. मॉस्को ऑलिम्पिकमधील १५०० मीटर अंतराच्या शर्यतीची चित्रफित आज आंतरजालावर उपलब्ध आहे. ती पाहिली, तर लक्षात येते, की हे शेवटचे अंतर को याने जीव पणाला लावल्यासारखे कापले आहे. वेग वाढवत मागून येणारा स्टीव्ह ओवेट आणि बरोबरीने धावणारा पूर्व जर्मनीचा युर्गन स्ट्रॉब यांच्या पुढे राहण्यासाठी को याने घेतलेली धाव जिगरबाज आहे.
शेवटच्या काही अंतरात तर आपल्या डाव्या आणि उजव्या बाजूला असलेले हे दोन्ही स्पर्धक नेमके किती अंतर मागे आहेत, हे पाहण्यासाठी को याने दोन्ही बाजूंना हलकेच मान वळविली. ते गाठू शकतील, असे वाटल्यानंतर आणखी वेग वाढवला आणि अंतिम रेषा पार करण्याच्या आधीच विजयी होण्याची खात्री पटल्यावर दोन्ही हात उंचावून प्रेक्षकांना अभिवादन करायला त्याने सुरुवातही केली. शर्यत फक्त विजेत्यालाच लक्षात ठेवते, आव्हानवीर कितीही श्रेष्ठ असला, तरी. ही शर्यत संपताना को याच्या चेहर्यावर दिसलेले त्वेषपूर्ण भाव आणि ती संपल्यानंतर थकून गुडघ्यावर कोसळताना चेहर्यावर उमटलेली आनंदरेषा हेच सत्य सांगून जाणारी.
को याने पुढच्या १९८४ च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिक्समध्येही १५०० मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले. पाठोपाठच्या ऑलिम्पिक स्पर्धांत १५०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक मिळविणारा तो अजून तरी एकमेव. या ऑलिम्पिक्समध्येही त्याला ८०० मीटर शर्यतीत रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले. ही शर्यत ब्राझीलच्या योकिम क्रुझने जिंकली होती. १५०० मीटरमध्ये मात्र त्याने त्याच्याच देशातील त्याचा सहकारी स्पर्धक स्टीव्ह क्रॅमचे आव्हान मोडून काढले होते. याही शर्यतीत को याने शेवटचे काही अंतर पार करताना घेतलेली वेगवान धाव तोच सुवर्णपदकाचा मानकरी का, याचे उत्तर देणारे. आपल्या नजीकच्या स्पर्धकाला तब्बल सहा मीटर मागे टाकून मध्यम अंतराची शर्यत जिंकणे हे फार वेळा घडत नाही.
को १९९० मध्ये ॲथलेटिक्समधून निवृत्त झाला. पण, म्हणून त्याचा खेळाशी संबंध संपला असे झाले नाही. वास्तविक को याचे वैशिष्ट्य असे, की कारकीर्द सुरू असतानाच खेळाडूंचे म्हणणे क्रीडा संघटनेसमोर मांडण्याची संधी त्याला मिळाली. निमित्त होते १९८१ मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या ॲथलीट्स आयोगावरील नियुक्तीचे. समितीच्या सभेसमोर प्रथमच क्रीडापटूंना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी यानिमित्ताने मिळाली. को आणि इतरांनी त्या वेळी उपस्थित केलेले अनेक मुद्दे अजूनही सुसंगत आहेत. उत्तेजक द्रव्यांविरोधातील लढाई, लिंगसमानता, क्रीडा क्षेत्रात घुसलेले राजकारण हेच मुद्दे त्या वेळीही ऐरणीवर होते, आता तर उग्र रूपात दिसतात.
को यांनी राजकारणातही सक्रिय भूमिका बजावली. १९९२ ते १९९७ या कालावधीत ते फालमाउथ आणि कॅम्बोर्नचे हुजूर पक्षाचे खासदार होते. पण, या राजकीय वकुबाचा उपयोग नंतर ब्रिटनला उपयोगी पडला, तो २०१२ चे ऑलिम्पिक यजमानपद मिळविण्यासाठी. हे ऑलिम्पिक लंडनमध्ये व्हावे, यासाठी प्रयत्न करणार्या समितीचे को अध्यक्ष होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे २०१२ च्या ऑलिम्पिकचे यजमानपद लंडनला मिळाले.
एक प्रकारे को यांनी त्यांच्या बहराच्या काळात गाजवलेली आंतरराष्ट्रीय स्पर्धा यानिमित्ताने आपल्या जन्मभूमीत आणली. लंडन ऑलिम्पिकनंतर ब्रिटिश ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्षपद, तर २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स परिषदांच्या संघटनेचे अध्यक्षपद को यांच्याकडे चालून आले. या संघटनेचे सध्याचे नाव वर्ल्ड ॲथलेटिक्स. को सध्याही त्याचे अध्यक्ष आहेत.
वर्ल्ड ॲथलेटिक्सची ध्येय-धोरणे पाहिली, तर वृद्धी, प्रेरणा, सहकार्य आणि नेतृत्व या चार स्तंभांवर तिची उद्दिष्टे उभी राहणे अपेक्षित आहे. तंदुरुस्त समाज घडविणे हेही एक महत्त्वाचे ध्येय. ‘खेळ कशासाठी खेळायचा’, ‘खेळला, तर त्यातून काय मिळते’, आणि पर्यायाने, ‘खेळ नेमके साध्य तरी काय करू शकतो,’ असे प्रश्न अजूनही आपल्यासारख्या देशात पडतात, कारण त्या अर्थाने चांगली क्रीडा संस्कृती आपल्याकडे रुजलेली नाही.
मोठमोठ्या स्पर्धा भरविणे म्हणजे क्रीडा संस्कृती रुजविणे असे नसते. त्यासाठी ऑलिम्पिकच्या बोधचिन्हातील पाच वर्तुळांचे एकमेकांत मिसळलेले असणे नीट समजून घ्यावे लागते. क्रीडा क्षेत्र म्हणजे फक्त स्पर्धा वा शर्यत नव्हे, ते वृत्ती घडविण्याचे साधन आहे. सेबेस्टियन को यांच्या संकेतस्थळावर गेले, की ज्या तीन ओळींनी भेट देणार्याचे स्वागत होते, त्या याचा अत्यंत उत्तम आरसा. त्यांनी म्हटले आहे, ‘खेळ हा आपल्या सर्व समुदायांतील सर्वांत शक्तिशाली सामाजिक कार्यकर्ता आहे. इतर कुठले क्षेत्र करू शकत नाही, अशा गोष्टी खेळ साध्य करू शकतो. (विशेष म्हणजे) तो शक्तिशाली असला, तरी शांतिदूत आहे.’
siddharth.kelkar@expressindia.com
