अभिजात संगीताच्या मैफलीत आपल्या सुरेल आणि सर्जनशील वादनाने रसिकांची हटकून दाद घेणार्या सीमा शिरोडकर यांचे निधन ही चटका लावून जाणारी घटना आहे. हार्मोनिअम या वाद्यावर त्यांनी मिळवलेली हुकमत, साथसंगत करण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य आणि सर्जनाची बीजे त्यांच्यापाशी होती. त्यामुळेच त्यांनी स्वकष्टाने स्वरांची साधना केली. स्वर प्रसन्न होणे, म्हणजेच, त्या स्वरांवर स्वार होण्याची क्षमता प्राप्त होणे. सीमाताईंपाशी ती होती, हे तर निश्चित, परंतु स्वतंत्र वादन आणि साथसंगत यातील नेमका फरक त्यांनी जाणला होता. त्यामुळेच हे वाद्य अभिजात संगीतातील एका स्वरावरून दुसर्या स्वरावर अलगद पोहोचणार्या मींडसारख्या अलंकारासाठी जुळवून घेण्याचे कसब सीमाताईंनी आत्मसात केले होते.
संगीताच्या क्षेत्रात, त्यातही अभिजात संगीताच्या क्षेत्रात त्रिरयांचा प्रवेश फार उशिरा झाला. मध्ययुगात ्त्रिरयांचे सर्व अधिकार काढून घेत, त्यांना गुलाम बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि त्याला विरोध होण्यास काही शतके जावी लागली. सतीची चाल बंद करण्याच्या मागणीसाठी कोलकात्यात ब्रिटिश सरकारविरुद्ध आंदोलन करणारे राजा राममोहन राय आणि पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू करणारे महात्मा जोतिबा आणि सावित्रीबाई फुले हे एकोणिसाव्या शतकातील पहिले दूरदृष्टीचे नेते. १८४५मध्ये मुलींची शाळा सुरू झाली, तरी त्याचे दृष्य परिणाम दिसण्यास सहा-सात दशके जावी लागली. ज्या काळात स्त्रियांना गाणे ऐकण्यास आणि नाटक पाहण्यासही बंदी होती, गाणे सादर करण्यास आणि नाटकात भूमिका करण्यासही मज्जाव होता, त्या काळात सामाजिक बदल घडण्यास कारणीभूत ठरले, ते कलाक्षेत्रच.
१९२२च्या डिसेंबर महिन्यात हिराबाई बडोदेकरांचा पहिल्या जाहीर मैफिलीत शालीन अभिजात स्वर उमटल्यामुळेच महिलांचा आत्मविश्वास दुणावला. सीमाताई शिरोडकर या, या परंपरेच्या पाईक ठरल्या. मैफलीत संगतकार म्हणून तबला किंवा हार्मोनिअमवर फक्त पुरुषांनीच संगत करणे असा काही नियम नव्हता, पण पुढे येण्यास फारसे कुणी तयार होत नव्हते. सीमाताईंनी हे पाऊल उचलले आणि त्या यशस्वी झाल्या. हार्मोनिअम हे काही भारतीय वाद्य नाही. परंतु त्यावर भारतीय कलावंतांनी मिळवलेली हुकमत पाहून गोरे ब्रिटिशही थक्क झाले. वाद्य साथीचे असले तरीही केवळ गायकाच्या गायनाची री ओढणे एवढेच काम सीमा शिरोडकर यांनी कधी केले नाही. गायकाच्या गळ्याला मिळणारी विश्रांती तेवढ्याच भरदारपणे आणि कलात्मकतेने भरून काढणारा साथीदार म्हणजे जे गायले तेच वाजवणारा कलावंत नसतो. त्याने कलावंताच्या प्रतिभेला साद घालणे आवश्यक असते. मैफलीत कलावंताच्या मनात सुरू असलेल्या आंदोलनांना ओळखून त्याला काही नवे सुचवायचे असते. आपली स्वत:ची प्रतिभा त्यासाठी उपयोगात आणायची असते. कलावंताची गायनशैली त्यासाठी आत्मसात करायची असते. हे सारे गुण सीमाताईंच्या अंगी होते. त्यामुळेच त्यांचे निधन ही संगीत क्षेत्रासाठी अतिशय क्लेशदायक घटना आहे.

