आज संपूर्ण महाराष्ट्र राज्य सरकारला दुवा देईल, याची आम्हास ठाम खात्री आहे. कारण की मुखारोग्याच्या प्रसारासाठी त्यांनी केलेली भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची निवड. उत्पादनाच्या वा विचाराच्या प्रसारासाठी योग्य ती तोलामोलाची व्यक्ती असणे नितांत गरजेचे असते. बाजारपेठीय विक्रयतंत्रात असे होणे म्हणजे समसमासंयोग जुळून येणे. जसे की चपळ, लवचीक उत्पादनांच्या (यात वैचारिक लवचीकताही आली) जाहिरातींसाठी सर्कसपटू अक्षयकुमार याच्याइतका योग्य प्रसारक मिळणे अवघड तद्वत मुखारोग्याच्या प्रसारासाठी सचिन तेंडुलकर यांच्यापेक्षा सुयोग्य व्यक्ती मिळणे दुर्मीळ. वास्तवात फाटक्या तोंडाचा हा मराठी माणसाचा लौकिक. त्यामुळे मराठी माणूस फार म्हणजे फार बदनाम झाला. मनात येईल ते तोंडातून वदणे ही त्याची इतिहासदत्त सवय. कानफाटय़ा अशी मराठी माणसाची नाचक्की होऊ लागली ती त्यामुळेच. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचे मोठेपण असे की मराठी माणसांवरचे (आणि त्यांच्या जिभांवरचे) हे किटाळ त्यांनी सहजी दूर केले. शेन वॉर्न वा अब्दुल कादिर यांस मारलेले स्क्वेअर कटच जणू! त्यांच्या या कार्यकर्तृत्वाचा गौरव महाराष्ट्र सरकारने त्यांना मुखारोग्य मोहिमेचे सदिच्छादूत नेमून केला. म्हणून समस्त मराठी जन सरकारचे ऋणी राहतील. असो. यानंतर मुखारोग्यासाठी आवश्यक गुणवैशिष्टय़ांविषयी. यासाठी अत्यावश्यक गुणविशेष म्हणजे तोंड न उघडणे. हे फार कौशल्याचे काम.
येरागबाळय़ास न झेपणारे. आपल्या भारतरत्नांचेच पाहा ! आसपास मॅच फिक्सिंगचे प्रयोग होत होते आणि त्यांच्या आसपासच्या अनेक खेळाडूंविषयी संशय व्यक्त केला जात होता पण भारतरत्नांच्या तोंडून हुं की चुं नाही. किती ही सहनशीलता ! केंद्र सरकारची भलामण करणारे ट्वीट भारतरत्नांसह अनेकांच्या खात्यातून केले गेले. सर्वाचा मजकूर सारखा. त्यावरही झाली टीका. पण आपल्या भारतरत्नांनी एक अवाक्षर देखील त्यावर काढलेले ऐकिवात नाही. झालेच तर सध्या राजधानी दिल्लीत सुरू असलेले कुस्तीगीरांचे आंदोलन. तेही चांगले आंतरराष्ट्रीय पदकविजेते. पण तरीही त्यांच्यावर आंदोलनाची वेळ आली. प्रकरण इतके तापले की कपिलदेव, हरभजन सिंग, झालेच तर नेमबाज अभिनव बिंद्रा आदी अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली. पण पाहा सचिन तेंडुलकर बोललेत का काही? अजिबात नाही. मुखारोग्याचे महत्त्व अंगी मुरलेले असल्याखेरीज इतकी स्थितप्रज्ञता साधेल तरी का कोणास? या स्थितप्रज्ञतेचे महत्त्व प्रत्येकास कळावे हेच तर मुखारोग्य प्रसार मोहिमेचे खरे उद्दिष्ट. दात चांगले राहावेत वगैरे क्षुद्र बाबी फक्त सांगण्यासाठी. त्यासाठी खरे तर टुथ पेस्टच्या जाहिरातीही पुरेत ! पण मुखारोग्य ही व्यापक संकल्पना आहे. तिचे महत्त्व जनसामान्यांच्या मनी बिंबवण्यासाठी व्यक्तीही तितकीच अधिकारी हवी. म्हणून भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या निवडीचे महत्त्व. या निवडीचा आदर करून अधिकाधिक मराठी जन भारतरत्नांप्रमाणे मुखारोग्य जपण्यासाठी प्रयत्न करतील याची आम्हास खात्री आहे. शेवटी देश पुढे न्यावयाचा असेल तर उत्तम मुखारोग्यास पर्याय नाही! आमेन.



