राजेश बोबडे
महात्मा गांधी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यात सेवाग्राम येथे ग्रामसुधारणेवर अनेकवेळा विचारमंथन झाले. गांधीजींचा संदर्भ देऊन समृद्ध नव्या भारतासाठी ग्रामोद्धाराचे चिंतन करताना महाराज म्हणतात, ‘‘संसारातील घडामोडींचा कल लक्षात येण्यासाठी बराच काळ जावा लागतो. ज्याप्रमाणे लहान मूल कधी तारुण्यात पदार्पण करणार याची तारीख ठरलेली नसते, त्याचप्रमाणे वृद्धापकाळही कुठून सुरू झाला हे निश्चित सांगता येत नाही. जगातील प्रगती व अधोगती याचीही अशीच स्थिती आहे.’’
‘‘महात्मा गांधीजी स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीपासूनच ग्रामनिर्माणाकडे वळले होते, हे आम्ही पाहात होतो. त्यांचे बोलणे, वागणे सर्व काही खेडय़ासाठीच होते. खेडय़ांमध्ये सुधारणा कशी होईल, तेथील शाळा, घरे, मंदिरे व्यवस्थित कशी राहतील याबद्दल त्यांची नेहमी चर्चा चाले. शहरातील रहिवाशांपेक्षा खेडुतांशी ते अधिक जिव्हाळय़ाने बोलत. गांधीजी त्यांच्या घरच्या परिस्थितीविषयी विचारपूस करून त्यांना मार्गदर्शन करत.’’
महाराज म्हणतात, ‘‘खेडुतांच्या सुखदु:खाशी समरस होताना मी त्यांना अनेकदा पाहिले आहे. केवळ स्वातंत्र्याची भाषणे देणारा व चळवळ करणारा हा महापुरुष नव्हता. शरीराचे मीलन व अंत:करणाचे मीलन यात फरक काय असतो, हे गांधीजी व खेडूत एकत्र आल्यावर दिसून येत असे. याउलट आजचा नेता खेडय़ात जातो, पण त्याच्या हृदयात निवडणुकीचा जो मोह असतो आणि त्याचेच दर्शन घडते. त्याचे व्यवहारही याच पद्धतीने घडतात. तो निर्भय नाही, शुद्ध सेवक नाही, खेडय़ांचा विकास हे त्याचे ध्येयसुद्धा नाही. फोटोसाठी, वृत्तपत्रातील प्रसिद्धीसाठी धडपड, आपल्या पक्षासाठी त्याचे काम सुरू असते. काही अपवाद याला असतीलही, पण त्यांची निवड लाखातून करावी लागेल. तसे गांधीजींचे नव्हते. ते खेडय़ाचे दु:ख पाहून व्याकूळ होत, पण ती वेळ खेडे उन्नत करण्याची नव्हती. स्वातंत्र्यप्राप्ती त्या वेळी अधिक महत्त्वाची होती.’’
‘‘स्वराज्य मिळाले की आपण खेडय़ाचा उत्तम प्रकारे विकास करू; शेती, उद्योग, शाळा, परस्परप्रेम, सामुदायिक प्रार्थना, आरोग्य स्वच्छता, निव्र्यसनी राहणी हे सारे घडवून आणू असे त्यांचे उद्दिष्ट होते. पण त्यांच्या हत्येनंतर लागलीच काळाची पावले बदलली. कुटुंबप्रमुखामुळे घर सुधारत असते. ग्रामनेत्यामुळे गावाचा विकास होत असतो आणि देशाचा पुढारी देशाची परिस्थिती बदलवीत असतो. परंतु आपल्या देशात उलट घडले. गांधीजींनंतर प्रत्येक पुढारी आपले विचार पुढे दामटू लागला. त्याचा परिणाम खेडय़ांकडे दुर्लक्ष होण्यात व शहरांची भरभराट होण्यात झाला. शहरे कारखान्यांनी, यंत्रांनी भरू लागली. खेडी उदास झाली, ओस पडू लागली, ग्रामोद्योगाची तर थट्टाच सुरू झाली.’’
याबाबत महाराज ग्रामगीतेत म्हणतात..
शहरी यंत्रादिके आली।
गावाची उद्योगकला मेली।
कुशल माणसे शहरी गेली।
उद्योगासाठी।।
