‘राजसभावर्णनं’ नावाच्या सातव्या उल्लासामध्ये व ‘राजरीतिवर्णनं’ नावाच्या आठव्या उल्लासामध्ये जयराम कवीने शहाजीराजाच्या दरबाराच्या वैभवाचे व फुरसतीच्या वेळातील काव्यशास्त्रविनोदाचे वर्णन केले होते. त्या दोन भागांमधील संस्कृत काव्याचा गोषवारा सांगताना राजवाड्यांनी शहाजीच्या दरबाराची वैशिष्ट्ये आवर्जून नमूद केली. त्यांनी लिहिले, ‘राजांशी झालेल्या मुलाखती नेमक्या कोणत्या शहरी, कोणत्या वर्षी, महिन्यात किंवा तिथीस झाल्या, याचा स्थलकालनिर्देश कवीने केलेला नाही. दिशा, काळवेळ याचे भान नसलेल्या कवीला त्याबद्दल दोष न देता मिळते तेवढी माहिती अपूर्व मानून समाधान करून घेणे भाग आहे. तत्रापि अंदाज आहे की, महाराजांची मुलाखत कवीने वसंतऋतूत म्हणजे चैत्रवैशाखात घेतली असावी.’
‘एके दिवशी प्रात:काली कवि राजदर्शनास गेला. तेव्हा विश्वनाथभट्ट प्रात:स्मरण करीत होते. त्यावेळी अष्टोत्तरशे मंगले राजाच्या दर्शनार्थ आणलेली सिद्ध होती. राजाने प्रात:स्मरण ऐकून त्या मंगलांचे दर्शन-स्पर्शन अनुभवले. नंतर एका ब्राह्मणाने तेलातुपाने भरलेल्या पराती आणल्या. त्यांत राजाने आपले मुखबिंब अवलोकन केले व सभामंडपात प्रवेश केला. ‘नवगजी’ नावाच्या त्या सभामंडपात उजेडाचा लखलखाट असून वरचे छत नेत्रांना थंडावा देणारे होते.
मासे व कासवे यांची चित्रे काढलेला रुजामा नवगजीत अंथरलेला असून त्यावर सर्व सेवकसमुदाय आधीच येऊन राजाची मार्गप्रतीक्षा करीत होता. अनेक मराठा क्षत्रियांच्या उपस्थितीमुळे नवगजी गजबजली होती. अशा त्या सभामंडपात, ज्याच्या मस्तकावर आब्दगिर्यांनी चांदव्याची अब्दागिरी धरली आहे व ज्याच्याभोवती चवर्या ढाळीत आहेत, असा शहाजीमहाराज हातात तरवारीची मूठ लटकावीत, धीरोदात्त गतीने प्रवेश करून सेनापति, पंडित व कवि यांचे मुजरे घेत घेत सिंहाकृति स्तंभांवर बसवलेल्या सिंहासनावर सर्वांना आश्वासन देत विराजमान झाला. राजगुरु प्रभाकरभट्ट यांनी आपल्या पायांचे तीर्थ महाराजांच्या अंगावर शिंपडले, तेव्हा राजाने उठून प्रभाकरभट्टांना आपल्याजवळ बोलावून सर्व पुरोहितकर्म त्यांच्या हस्ते करवून घेतले…’ शहाजीराजाच्या दरबाराच्या वैभवाच्या या वर्णनानंतर सातवा उल्लास संपला.
आठव्या उल्लासातही जयरामकवीने शहाजीराजाच्या दरबारात घडलेल्या काही विशेेष प्रसंगांचे वर्णन केले असल्याचे स्पष्ट करीत राजवाड्यांनी पुढे लिहिले, ‘एके दिवशी कोण्या खिदमतगाराने तेल लाविलेली नागवी तरवार अवलोकनार्थ राजापुढे आणिली, तिचे कवीने मोठे हृदयंगम वर्णन केले, तसेच राजाच्या घोड्याचेही वर्णन असेच बहारीचे केले. तेव्हा खूष होऊन राजाने कवीस तो घोडा बक्षीस दिला व हुकूम केला की, तुम्ही या घोड्यावर बसून आमच्याबरोबर स्वारीशिकारीस येत जावे. त्याप्रमाणे एक दिवस राजा स्वारीस निघाला, तेव्हा कवीने सैन्याचे वर्णन केले. तेवढ्यात शत्रुसैन्य पश्चिमपर्वताच्या पलीकडे दूर पळून गेल्याची बातमी आली. मग लढाईवर जायचा बेत रद्द करून राजाने शिकारीत व कवीच्या काव्यालापात काही वेळ घालविला… श्रावणीपौर्णिमा आली व छावणीत रक्षाबंधनोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला. त्या उत्सवाच्या गौरवार्थ जयरामने काही पद्ये म्हटली, तीहि राजाला आवडली’…
शहाजीराजांची जयरामने कसकशी मर्जी संपादन केली, हे सांगताना राजवाड्यांनी काही ठिकाणी त्यांच्या खास शैलीतली शेरेबाजीही केली. उदाहरणार्थ – ‘एकदा मलयाचलाच्या खोर्यांतील पुंडपाळेगारांनी सैन्याचा रस्ता आडविला, असे कळल्यावरून त्यांच्यावर शहाजीने फौज पाठवली. मारिलेल्या पुंडांची हजारो मुंडकी शिपायांनी शहाजीपुढे आणून रचिली. ती गांवोगांव झाडांना टांगण्याचा राजाने हुकूम केला. त्यावर जयरामकवीने केलेल्या पद्याचा मतलब असा की, राजा, तुझ्या या कृतीने या प्रांतांतील सर्वच झाडे नारळाची झाडे झाली!
येथे शहाजीराजाने तैमूरलंगाचा कित्ता उचचला व स्तुतिपाठक कवीने बीभत्स व हास्यरसांचा प्रांत कधीकधी किती निकटचा असतो, हे दाखविण्यात शेक्सपीयरवर ताण केली, असे कोण म्हणणार नाही?’ याशिवाय उल्लास संपवण्यापूर्वी त्यांनी कवीच्या कौतुकाचीही नोंद केली, ती अशी की, ‘शहाजीराजांनी गोवर्धनाचार्यकृत सुप्रसिद्ध आर्या फार आवडत. तेव्हा राजाच्या सांगण्यावरून हुबेहूब गोवर्धनाच्या आर्येसारख्या आर्या जयरामाने रचून दाखविल्या व शाबासकी मिळवली.’
anand47.hardikar@gmail.com
