आपल्या चरित्रनायकाच्या आयुष्यातील अखेरच्या टप्प्याबद्दलची संक्षिप्त माहिती देताना राजवाड्यांनी लिहिले, ‘शहाजीराजा व त्याचा पुत्र शिवाजी ह्या दोन महापुरुषांच्या भेटीत काहीतरी व्यूह रचिला जात असावा असा संशय औरंगझेबास आला. साठसत्तर हजार फौजेचा धनी जो शहाजी व बापाहून कांकणभर जास्त पटाईत शिवाजी संगनमताने कोणती घोरपड उभी करतील आणि कोणती खेकटी नाचवितील, त्याचा अंदाज आपल्या मनाशी करून औरंगझेबाने शाहिस्तेखान व जयसिंग यांना शिवाजीवर धाडिले आणि कर्नाटकात बिदनूरच्या नाइकाची उठावणी करून शहाजी दक्षिणेचा रस्ता जेणेकरून धरील अशी योजना केली… शहाजी कर्नाटकात शक १५८३ च्या फाल्गुनात पोहोचला. नंतर शक १५८४ च्या चैत्रात तो व अल्लीशहा मिळून बिदनूरवर चाल करून गेले. गदग, लखमेश्वर, सोंधा ह्या बाजूने अल्लीशहा बिदनूरवर उतरला आणि शहाजीने दक्षिणेकडून चाल केली. बिदनूरकराच्या एका प्याद्यास शहाजीचे दहा प्यादे, असा विजोड पडल्यामुळे बिदनूरकर दाती तृण धरून दोनअडीच महिन्यांत शरण आला…’
‘१५८४ च्या ज्येष्ठ अखेर शहाजीची ती मोहीम संपली, त्या वर्षीचा व पुढील वर्षाचा असे दोन पावसाळे त्याने बंगळूरास काढिले. १५२५च्या आश्विनात बसवापट्टणाकडील काही पाळेगारांनी (=करवसुली व युद्धप्रसंगी सैन्यपुरवठा करणार्यांनी) बखेडा मांडिला होता. तो मोडण्याकरिता शहाजी त्या प्रांती गेला’, ही माहिती सांगून राजवाड्यांनी पुढे लिहिले, ‘बंदोबस्त करीत करीत होद्दीगिरे या गावच्या रानात त्याने तळ दिला. तेथे हरणाची शिकार करीत असता घोड्याचा पाय कसल्याशा भंडोळीत (वेलीची वा गवताची गुंडाळी) अडकून घोडा व राजे एकावच्छेदे पडले. त्यात डोक्याच्या कवटीस जखम होऊन शहाजीराजे शक १५८५च्या माघ शुद्ध षष्ठीस शनिवारी परलोकास गेेले. शिवाजीने सुरत लुटिल्याची खबर त्यांनी नुकतीच ऐकिली होती. मरणसमयी शहाजीची उमर सत्तरीला पोहोचली होती… ’
‘शहाजीराजांच्या निधनानंतर एकोजी जवळ नसल्यामुळे भडाग्नी दिला, बातमी समजून परतल्यावर एकोजीने उत्तरक्रिया केली आणि इकडे महाराष्ट्रात शिवाजीराजांस निधनवार्ता पोहोचल्यावर त्यांनीहि प्रीतिश्राद्धादि विधि यथासांग करून लक्षभोजने घातली. होद्दीगिरे येथे एकोजीने राजांचे एक छोटेखानी वृंदावन बांधिले व शिवाजीने शिखरशिंगणापुरास एक मोठी डौलदार छत्री उभारली…’ ही माहिती सांगितल्यावर राजवाड्यांनी स्थानमाहात्म्याचे अगदी थोडक्यात वर्णन केले. ‘शिखरशिंगणापुरावर भोसल्यांची फार भक्ति असे आणि भक्ति बसण्यासारखेच ते स्थान आहे. तेथून पूर्वेस नगरापासून सोलापुरापर्यंतचा सर्व बालेघाट दिसतो, दक्षिणेस मिरजेपर्यंतचा टापू नेत्रकक्षेत येतो. पश्चिमेस पन्हाळ्यापासून रायरी सिंहगडागपर्यंतचा डोंगराळ प्रदेश डोळ्यांत साठवला जातो तर उत्तरेस फलटण, बारामती, पाटस, खेड, जुन्नर ह्य तालुक्यांची मखमल पृथ्वीवर हंतरलेली दृष्टिपंथास भरते… असे हे महाराष्ट्राचे मध्यवर्ती ठिकाण राष्ट्राच्या पितरांचे शेवटचे विश्रांतिस्थान होण्यास सर्वथैव लायक आहे!’
शहाजीराजांचे इतके सुसंगत आणि विस्तृत गद्य चरित्र मराठीत प्रथमच सांगितल्यावर राजवाड्यांनी लिहिले, ‘या थोर पुरुषाचे एकंदर साद्यन्त राजकीय चरित्र थोडक्यात हे असे आहे…’ आणि आपल्या कामगिरीचा पूर्वार्ध असा संपवल्यावर अधिक महत्त्वाचा उत्तरार्ध त्यांनी सुरू केला. त्यांनी लिहिले, ‘या विवेचनावरून शहाजीचे मुख्य धोरण काय होते व इतिकर्तव्यता कोणती होती, हे स्पष्ट होते. जयराम पिंड्ये म्हणतो त्याप्रमाणे स्वराज्य स्थापून स्वधर्म, स्वदेश, स्वभाषा व स्वजन ह्यांचे पालन, लालन व संरक्षण करावे, ह्यत तो आपल्या जीविताचे साफल्य मानी. आजपर्यंत (आपली) अशी समजूत होती की, स्वराज्य स्वधर्म स्वभाषादि संरक्षण करण्याच्या कल्पनेचा प्रथमोदय शिवकाली झाला… … आजपर्यंत अशीहि समजूत होती की, मराठे लोकांच्या अंगी माणुसकी प्रथम शिवाजीने आणिली. परंतु ह्य कल्पना जयरामाच्या प्रत्यक्ष साक्षीपुढे व कालानुक्रमाने ह्य मी मांडलेल्या राजकीय चरित्रापुढे ह्यपुढे टिकणे शक्य नाही!’
(अवतरणांतील व्याकरण व संबोधने मुळावरहुकूम)
anand47.hardikar@gmail.com
