राजवाड्यांनी शहाजीराजांचे चरित्र जसे एका दृष्टिक्षेपात सामावेल, अशा पद्धतीने वाचकांसमोर ठेवले, तसेच ते पुढील ४०-४५ पानांमध्ये विस्तारानेसुद्धा उलगडून दाखवले. राजांचा पराक्रम निरनिराळ्या मोहिमांमध्ये कसकसा नावाजला गेला आणि कधीकधी त्यांच्यावर अन्याय होऊन त्यांच्या पराक्रमाचे श्रेय दुसर्‍यातिसर्‍याला देण्याचा प्रकारही घडला, याचे तपशीलवार वर्णन त्यांनी केले.

‘शक १५४२मध्ये जहांगीराने घेतलेला सर्व निजामशाही प्रांत पुन्हा हस्तगत करण्याच्या इराद्याने मलिकंबराने मोंगलाई सुभेदाराचे मुख्य ठाणे जे बर्‍हाणपूर त्यास वेढा दिला व गेलेला प्रांत पुन्हा परत मिळवला. त्या बर्‍हाणपूरच्या स्वारीत शहाजीने बहुत पराक्रम केला…’ ही उमेदवारीच्या काळातील कर्तबगारीची नोंद जशी राजवाड्यांनी केली, तशीच पुढे शक १५४६मध्ये भातवडीच्या घनघोर संग्रामात तिशीतल्या शहाजीराजांनी केलेली व्यूहरचना कशी जगाच्या निदर्शनास ठळकपणे आली, तेही त्यांनी तपशीलवार सांगितले. त्यांनी लिहिले, ‘शक १५४६ रक्ताक्षनामक संवत्सराच्या कार्तिकात अहमदनगराजवळच्या भातवडीच्या रानात आदिलशाही, मोंगलाई व निजामशाही ही तिन्ही सैन्ये एकमेकांशी भिडून मोठे तुंबळ युद्ध झाले. त्यांत आदिलशाही व मोंगलाई सैन्याचा पुरता मोड झाला. ह्या लढाईत शहाजीराजे भोंसले ह्यांनी देवासुरयुद्धाप्रमाणे युद्ध करून मोंगलांच्या सैन्याची दाणादाण उडवली, असे बृहदीश्वरशिलालेखकार लिहितो. ह्या संग्रामात शहाजीचे लढवय्येगिरीचे व पुढारीपणाचे सर्व गुण ठळकपणे दिसले. त्यावेळी वृद्ध मलिकंबर ऐंशीच्या घरात होता. नावाला सेनाध्यक्ष होता. लढाईची सर्व व्यूहरचना तरुण शहाजीची होती. युद्धानंतर मूर्तिजाशहाच्या दर्शनाला मंडळी गेली तेव्हा शिरस्त्याप्रमाणे यद्यपि मलिकंबराला दरबारी शिलशिल्याला अनुसरून अग्रेसर (पुढे) केले होते, तरीही निजामशहाने विशेष बहुमान केला तो कर्त्या व आवडत्या शहाजीराजाचा केला. त्यामुळे ह्या प्रसंगानंतर वृद्ध मलिकंबर व तरुण शहाजी यांच्यात द्वेष, मत्सर व वैमनस्य यांचा प्रवेश झाला…’

‘भातवडीच्या लढाईत नामोहरम झालेल्या आदिलशहाला जमीनदोस्त करण्याचा मनसुबा बाळगून मलिकंबरने नंतर आपले सैन्य विजापूरच्या इलाख्यात नेऊन आदिलशहाने वसवलेले नवरसपूर जाळूनपोळून खाक केले व जाताना वेढा घालून सोलापूरचा भुईकोट काबीज केला’, ही माहिती सांगून पुढे लिहिले, ‘ही मोहीम १५४७च्या चैत्रवैशाखात आटोपल्यावर पावसाळ्यात सैन्य आपल्या जागी परतले. सैन्याबरोबर शहाजी व खेळोजी ही भोसलेमंडळीहि राजधानीस परत आली. मलिकंबरच्या बगलबच्च्यांनी मूर्तिजाच्या मनात असे भरवले की, भातवडीची लढाई, नवरसपूरची जाळपोळ व सोलापूरचा वेढा विजयाने शेवटास नेण्यात शहाजीचा पराक्रम विशेष नसून, मुख्य कर्तबगारी खेळोजी भोसल्याची आहे. त्यामुळे मूर्तिजाने शहाजीला न गौरविता खेळोजीचा आदर विशेष केला. नवरसपूरच्या मोहिमेत खरी कामगिरी शहाजीची होती व तत्प्रीत्यर्थ दरबारी त्याचा सन्मान झाला पाहिजे होता. परंतु तसा काहीएक प्रकार न होता इतरांचाच जयजयकार झालेला पाहून शहाजी विमनस्क, खिन्न व अजुर्दा झाला.’

शहाजीच्या मानसिकतेचे वर्णन करीत व नंतरच्या वर्तणुकीचे स्पष्टीकरण देत राजवाड्यांनी त्यानंतर लिहिले, ‘शहाजीला असे दिसले की, आज पंचवीस वर्षे ज्या मूर्तिजाची आपल्यावर मेहेरनजर असे व ज्याच्या कृपाछत्राखाली पराक्रम करण्याची आपण ईष्र्या बाळगली, तोच मूर्तिजा आपल्यावर उलटला आहे. कर्त्या व चढत्या शहाजीच्या शत्रुमंडळींत आता घरचे भाऊ खेळोजी व राज्याचा धनी मूर्तिजा यांची गणना होऊ लागली. सासरा जाधवराव, वजीर मलिकंबर, धनी मूर्तिजा व चुलतभाऊ खेळोजी हे विरुद्ध झालेले पाहून शहाजीला सुरक्षिततेचा मार्ग धुंडाळणे भाग पडले. खिन्न होऊन स्वस्थ बसता, तर शहाजी ह्या चौकडीपुढे नष्ट झाला असता. त्याच्या ज्या पराक्रमाचे तेज सहन न होऊन निजामशाहीतील प्रमुख सूत्रधार शहाजीच्या विरुद्ध झाले, तोच पराक्रम आदिलशाहीतील मुख्य कर्णधारांना आदरणीय व स्वीकारणीय वाटला आणि त्यांनी विजापुरी येण्याबद्दल शहाजीशी संधान बांधले. ते प्रशस्त भासून शक १५४७च्या पावसाळ्यानंतर शहाजी स्वसैन्यासह आदिलशाहीला जाऊन मिळाला. तेथे पुढे त्याला साजेशी मनसबदारी व अक्कलकोटची जहागीर मिळाली.’

– आनंद हर्डीकर