शहाजीराजांच्या कारकीर्दीतील अनेक टप्प्यांचे कालक्रमानुसार वर्णन राजवाड्यांनी केले. अगदी शेवटचा एक नमुना आता पाहू आणि नंतर त्यांनी शहाजीच्या ऐतिहासिक कार्याबद्दल केलेल्या अन्वयार्थात्मक भाष्याचा थोडक्यात आढावा घेऊ.
शक १५८३ मधील अशाच एका प्रसंगविशेषाबद्दल माहिती देताना राजवाड्यांनी लिहिले, ‘त्यासाली शहाजी काही प्रांतांवरील स्वारीत गुंतलेला असताना त्याला अशी बातमी लागली की, औरंगझेब गृहकलहांतून नुकताच मोकळा झाला आहे व बंगालच्या सुभेदारीवर असलेला उपद्व्यापी मीर जुमला आदिलशाही व कुतुबशाही खालसा करण्याचा त्याला आग्रह करीत आहे. १५७९ मध्ये ही दोन राज्ये औरंगझेबाला खालसा करता आली नव्हती. मुसलमानी इतिहासकार त्याचे वरकरणी थातुरमातुर कारण असे देतात की, शहाजहान व दारा शुकोह त्यावेळी औरंगझेबाच्या आड आले.
परंतु खरे कारण असे होते की, आदिलशाहीला विशेष प्राणघातक धक्का बसण्याचा रंग दिसल्यास साठसत्तर हजार फौजेचा स्वस्थ बसलेला मालक जो शहाजी, तो स्वसंरक्षणार्थ जागा होऊन त्याच्याशी झुंज पडेल, ही भीती वृद्ध व अनुभवी शहाजहानास होती. ती भीति व तो संशय तरुण व सापेक्षतेने अल्पानुभवी औरंगझेबाला नसल्यामुळे औरंगझेब विजापूर व गोवळकोंडा खालसा करण्याच्या गोष्टी त्यावेळी बोलत होता. आता चारपाच वर्षे लोटल्यानंतर, शहाजहान व दारा शुकोह यांचा अडथळाहि नाहीसा झाल्यामुळे व शहाजीहि औरंगझेब व मीर जुमला यांच्या मते वयस्कर होऊन स्वास्थ्यप्रवण बनल्यामुळे, ही दोन संस्थाने गिळंकृत करण्याला फारशी अडचण पडू नये, अशी औरंग व जुमला यांची समजूत होण्याचा संभव होता.’
‘औरंगझेबासंबंधाने शक १५८३मध्ये आलेल्या ह्या संशयाचा इशारा शहाजीने अल्ली आदिलशहाला दिला’, ही माहिती पुरवून झाल्यावर राजवाड्यांनी पुढे जे लिहिले, ते फार महत्त्वाचे होते. त्यांनी लिहिले, ‘शहाजीने आदिलशहाला असेहि कळविले की, शिवाजीशीहि आपला स्नेह करून देता येईल. अल्लीशहाला हा पोक्त सल्ला पसंत पडून शिवाजी व आदिलशहा ह्यांच्यामध्ये त्यासाली गुप्त तह झाला.
शिवाजीने ह्या गेल्या पाच वर्षांत अफजल मारिला, रुस्तुमजमा व फाजलखान ह्यांस कोल्हापूरच्या युद्धात पराजित केले, पन्हाळा घेतला, शिद्दी जोहर खाकेत घातला, गदगलक्ष्मेश्वरापर्यंत खंडण्या वसूल केल्या, वासोटा पाडला, निजामपूर लुटले, दाभोळ व प्रभावळी कबजांत आणिली, शृंगारपूर नागविले व औरंगझेबाचा मामा जो शास्तेखाना त्याचा हात तोडिला. असे हे चमत्कारावर चमत्कार करणार्या वीरशिरोमणीचे साहाय्य औरंगजेब व मीर जुमला ह्यांच्या स्वारीच्या भयास्तव अल्ली आदिलशहाला हवेच होते. ते शहाजीने मोठ्या युक्तीने मिळवून दिल्याबद्दल अल्ली आदिलशहाने शहाजीचे आभार मानिले…’
शिवाजीच्या दृष्टीने ह्या तहाचे वैशिष्ट्य काय होते, हे सांगताना राजवाड्यांनी लिहिले, ‘शिवाजीलाहि यावेळी आदिलशहाशी वैर करणे सोईचे नव्हते. औरंगझेबाने करतलबखान, जामदारखान, नसीरीखान, हुषदारखान, अबदुल मुनीम व शेवटी शाहिस्तेखान अश्या अनेक खानांचे भुंगे शिवाजीवर सोडिले होते. त्यांचा परामर्श घेऊन शिवाय आदिलशाही सरदारांशीहि झगडत बसणे शिवाजीला जड होऊन गेले होते. तेव्हा तोहि ह्या तहाला राजी झाला व आपल्या वडिलांच्या उपकाराचे धन्यवाद गाऊ लागला… आदिलशहाने शिवाजीकडे चाकरीचा दाया (हमी) मागण्याचे सोंग बिलकूल न करता बरोबरीचा स्वतंत्र राजा या नात्याने परस्परकुमकेचा करार केला.
इमानभाष्य व उभयतांच्या जामिनी खातरजमापूर्वक झाल्या. दरसाल सात लक्ष होन रोकड आदिलशहाने शिवाजीस पेषकष द्यावी असेहि ठरले. शिवाजीचा वकील शामजी नाईक पुंडे विजापूरदरबारी दोन्हीकडील कामांची विल्हेवाट लावू लागला. विजापूरकरांचा वकील शिवाजीच्या दरबारी नसावा, अशीही अट अल्ली आदिलशहाने मान्य केली. अल्लीशहा व शिवाजी ह्या दोघांना त्यांच्या मर्जीप्रमाणे तह करून दिल्यानंतर शहाजीला मग शिवाजीच्या राज्यात उघड माथ्याने जाणे सुलभ झाले… पितापुत्रांच्या भेटीस चोवीस वर्षे होऊन गेलेली, सबब शास्त्रविधीने भेट घेणे प्राप्त झाले!…’
anand47.hardikar@gmail.com
