‘शहाजीराजाने पुणे प्रांताला रामराम ठोकला होता, तो शक १५५९ मध्ये. त्यामुळे कर्नाटकात जाऊन शक १५८३मध्ये त्याला तब्बल दोन तपे होऊन गेली होती. एवढ्या प्रदीर्घ कालांतराने आपल्या जहागिरीचे आणि जीवश्चकंठश्च कुटुंबीयांचे तसेच कुलदेवतांचे दर्शन घ्यावे, असे त्याला वाटणे स्वाभाविकच होते.’ – शहाजीच्या त्यावेळच्या मन:स्थितीचे वर्णन करताना राजवाड्यांनी लिहिले, ‘जिजाबाईचे, आपल्या नुकत्याच जन्मलेल्या नातवाचे, इष्टमित्रांचे, कुलस्वामी जो शिखरशिंगणापूरचा शंभुमहादेव त्याचे व कुलस्वामिनी जी तुळजापूरची भवानी तिचे दर्शन घ्यावे, असा शहाजीचा फारा दिवसांचा हेतू होता. तो सफल होण्याला हा समय उत्तम आहे, असे जाणून आदिलशहाच्या अनुमतीने शहाजी पुणे प्रांताकडे जावयास निघाला… प्रथम तुळजापूरच्या भवानीचे दर्शन घेऊन, तीस वर्षांपूर्वी ज्या प्रदेशात त्याचा काही काळ गेला होता त्या बेदर, आवसे, धारूर, बीड, परांडा वगैरे प्रांतांवर तुळजापूरच्या टेकाडावरून नजर फेकून तो पंढरपुरावरून शिखरशिंगणापुरास गेला. शिखर उतरून आपले संबंधी जे फलटणचे निंबाळकर त्यांना दर्शन देऊन शहाजी शिवाजीच्या राज्यात शिरला. जेजुरीस भेटीचा बेत ठरला…’

‘पित्याच्या या भ्रमंतीबद्दल पुत्र घटकेघटकेची बातमी मिळवीत होताच. शक १५०५ मध्ये शहाजीकडून शिवराजाच्या दरबारी मोरो त्रिमळ (त्र्यंबक) पिंगळे यास मुद्दाम पाठवण्यात आले होते. त्या मोरोपंतास शिवाजीने पित्याच्या स्वागतासाठी मुद्दाम पुढे पाठवले आणि वडिलांस समारंभाने वाजतगाजत खंडोबाच्या देवालयात आणून उतरविले. पितापुत्रांच्या भेटीस चोवीस वर्षे होऊन गेलेली असल्याने शास्त्रविधीने भेट घेणे प्राप्त झाले’, अशी नोंद राजवाड्यांनी केली आणि पुढे त्या प्रत्यक्ष भेटीचे चित्रदर्शी वर्णनही केले -‘शिवाजीराजे व सौभाग्यसंपन्न वज्रचूडेमंडित जिजाई आऊसाहेब व सईबाई व पुतळाबाई आदिकरून खाशी मंडळी बाल संभाजीराजासह आधीच मंदिरात जाऊन शहाजीमहाराजाची मार्गप्रतीक्षा करीत बसली होती. महाराज येताच राजोपाध्ये यांनी श्रीची पूजा यथासांग करवून, तुपाने भरलेल्या काश्याच्या ताटात स्त्री, पुत्र, स्नुुषा व पौत्र यांची मुखे शहाजी महाराजांकरवी एकावच्छेदे करून पाहविली. नंतर भेटी झाल्या. शेकडो लढायांत हजारो जिवांचा संहार करण्याने ज्यांची अंत:करणे वज्राहूनहि कठोर झालेली, त्या पितापुत्रांची मने मोहाने जिंकली जाऊन मेणाहूनहि मऊ होऊन गेली…’

मराठेशाहीच्या इतिहासातील घटनाप्रसंगांवर प्रतिभावान चित्रकारांनी कल्पकतेने रंगवलेली अगणित चित्रे उपलब्ध आहेत, तथापि राजवाड्यांनी वर्णन केलेल्या या अत्यंत भावपूर्ण, हृद्य प्रसंगाचे मात्र चित्रीकरण झालेले नाही. ‘राधामाधवविलासचंपू’ या ग्रंथाच्या वाटेला आणि त्यातल्या त्यात पुन्हा राजवाडेलिखित प्रस्तावनेच्या वाटेला फारसे चित्रकार-शिल्पकार फिरकलेच नसावेत!

त्या भेटीचे वर्णन केल्यावर राजवाड्यांनी पुढे लिहिले, ‘शिवाजीच्या संपादित राज्यातील राजगड, तोरणा, सिंहगड, पुरंधर, प्रतापगड, विशाळगड, पन्हाळा, रांगणा इत्यादि गड पहात पहात दोन महिन्यांनी ते पितापुत्र राजधानी जी रायगड तेथे गेले. रायगडास राजधानी करण्याचा सल्ला शिवाजीस शहाजीराजांनीच कर्नाटकातून मोरोपंत पिंगळ्याच्या मुखे सांगून पाठवला होता… शिवाजीचे किल्ले, कोट, ठाणी, राजधानी, अठरा कारखाने, शिबंदी, फौज, हत्ती, घोडे, तोफा वगैरे जंगी सामान पाहून राजे परम संतुष्ट झाले आणि आपली तुळजा नावाची प्रासादिक तरवार त्यांनी शिवाजीस बहाल केली. एकंदर सहा महिने शिवाजीच्या राज्यात राहून शक १५८३च्या अखेर शहाजी कर्नाटकप्रांतांत जाण्यास निघाला. शिवाजी व जिजाबाई शहाजीस पोहोचविण्यास वारणेपर्यंत गेली. निरोप देताना शहाजीने शिवाजीची मन:पूर्वक स्तुति केली. आमच्या वंशात जन्म घेऊन तुम्ही बेचाळीस पिढ्या उद्धरिल्या, धर्मस्थापना करून वर्णाश्रम पुनरुज्जीवित केले, यवनाक्रांत पृथ्वीचे क्लेश निवारण करून जगदंबेचा वर आमच्या प्रत्ययास आणून दिला… वगैरे कर्णमधुर शब्द उच्चारून शहाजीने शिवाजीस शेवटचा आशीर्वाद दिला आणि आदिलशहा, औरंगजेब इत्यादि यवनांशी ह्यपुढे कसे वर्तन ठेवावे, त्याची वाटाघाट करून मग त्याने कर्नाटकाचा रस्ता धरिला…’
आनंद हर्डीकर
anand47.hardikar@gmail.com