‘कोंडीत सापडलेल्या मूर्तिजाची कीव करीत त्याच्या प्रतिस्पध्र्यांनी तहाच्या माध्यमातून त्याला आणि पर्यायाने निजामशाहीलाही जीवदान दिले खरे, परंतु मोंगलांचे सैन्य चाल करून येत असल्याची बातमी कळताच गर्भगळित झालेल्या मूर्तिजाने जुन्या अंतस्थ शत्रूला म्हणजे फतेखानाला तुरुंगातून सोडले, एवढेच नव्हे तर त्याला पुन्हा वजिरीदेखील बहाल केली. क्षणात तह मोडण्याची मूर्तिजाची ही कसरत पाहून आदिलशाही मुत्सद्दी थक्क झाले. फतेखानाचे त्या मुत्सद्द्यांशी वाकडे होते, त्यामुळे त्याने वजीर झाल्याबरोबर शहाजहानाशी संधान बांधले आणि थेट कारवाईच सुरू केली. त्याने मूर्तिजाला वेडा ठरवून तुरुंगात टाकले, त्या वेड्याच्या विश्वासातील पंचवीस वजनदार सरदार एका दिवसात ठार केले आणि सार्यावर कळस म्हणून दोनचार महिन्यांनी खुद्द बुर्हाणशहाचा ऊर्फ मूर्तिजाचाही प्राण घेतला… नंतर स्थिरस्थावर झालीशी वाटून फतेखान शहाजहानाशी उरमटपणाने वागू लागला. शहाजहानाने लगेच सैन्य पाठवून त्याला नरम केले, आठ लाख रुपये नजर घेऊन व दरसाल खंडणी ठरवून निजामशहाला आपला मांडलिक बनवले’…
शहाजीशी थेट निगडित असा पुढचा टप्पाही त्यांनी लगेच सांगून टाकला. त्यांनी लिहिले, ‘निजामशाही अंकित झाल्यावर व शहाजीला मनसबदार बनविल्यावर एकट्या आदिलशाहीचा आपण केव्हाही फडशा पाडू, असा शहाजहानाचा मतलब होता; परंतु तो शहाजीने फिसकटून टाकिला. मनसबेवर लाथ मारून व तह धाब्यावर बसवून तो आदिलशाही मुत्सद्द्यांस मिळाला.’
शहाजीराजाच्या नेतृत्वगुणांचे दर्शन घडवीत त्यांनी जे सविस्तर वर्णन केले, त्यातला आणखी एकच नमुनेदार उल्लेख पाहून नंतर आपल्याला त्यांच्या मुख्य भाष्याची दखल घ्यायची आहे. एक बेडूकउडी मारून शहाजहान व शहाजी या दोघांशीही संबंधित अशा थोड्या पुढच्या टप्प्याची राजवाड्यांनी केलेली मांडणी वाचकांसमोर ठेवावीशी वाटते. त्यांनी लिहिले, ‘शहाजहानाने आपल्या प्रचंड सेनासमुद्राचे चार भाग केले. पैकी एक भाग कुतुबशहाला अडविण्याकरिता व एक भाग आादिलशहाच्या व शहाजीच्या मध्ये घालण्याकरिता पाठवून दोन भाग शहाजीला जमीनदोस्त करण्याकडे त्याने योजिले.
आड पडण्याऐवजी कुतुबशहा ताबडतोब शरण आला, कारण आदिलशहाच्या जुलमापासून मुक्त करणारा कोणी तरी प्रबल वाली त्याला हवाच होता. तेव्हा त्याच्यावर पाठविलेले सैन्य आदिलशहावर धाडिलेल्या सैन्याच्या मदतीला गेले. आदिलशहावर जे सैन्य पाठविले होते, त्याचा मुख्य रोख आदिलशहाला चीत करण्याचा नसून शहाजीला दक्षिणदिशेने कोंडण्याचा होता. तात्पर्य, उत्तरेकडून, पूर्वेकडून व दक्षिणेकडून शहाजीचा कोंडमारा करण्याचा ह्या मोंगली सैन्याच्या चारहि तुकड्यांचा बेत होता. उघडच आहे, लढाईचा मुख्य विषय शहाजी होता!’…
शहाजहानाच्या या योजनेला शहाजीराजाने कसा शह दिला, ते सांगताना राजवाड्यांनी पुढे लिहिले, ‘होता होईल तो सर्व मोहीम पावसाळा सुरू होण्यापूर्वी चार महिन्यांत खलास व्हावी, अशी शहाजहानाची योजना आहे, विजापूरकरांना व आपल्याला शहाजहान विभक्त करणार, हे ओळखून शहाजीने प्रथम लढाईचे तोंड आंगावर उत्तरेकडून नगर, चांभारगोंदे, बारामती, नीरथड या दिशेने दक्षिणेकडे घेत घेत आदिलशाहीच्या कोल्हापूर, मिरज व रायबाग प्रांतांपर्यंत नेले आणि चांदवडच्या डोंगराजवळच्या सरहद्दीवरील सुमारे पंचवीस किल्ले आस्ते आस्ते विशेष हातघाईवर न येता बरसात लागेतोपर्यंत एकेक करून सोडून दिले.
इकडे आदिलशहाने शहापूरचे धरण फोडून विजापुराभोवती वीसपंचवीस मैल पाणीच पाणी करून देऊन शत्रूला कुंठित केले. आदिलशाही प्रांताच्या आश्रयाने हुलकावण्या दाखवीत दाखवीत शहाजीने शहाजहानाच्या सरदारांना दौड करावयाला लावून सडकून घुमविले आणि दमविले. शहाजीचे अर्धेअधिक किल्ले आणि सबंध कोकणप्रांत दोनअडीच महिने लढूनहि शहाजहानाच्या हाती लागले नाहीत व पुढील दीड महिन्यात हाती लागतील, अशीहि खात्री पटेना. तेव्हा शहाजहानाने तो सैतानी हुतूतू सोडून देऊन परत येण्यास आपल्या सरदारांस फर्मावले व आपल्या सैन्याची अब्रू कशी तरी त्या वेळेपुरती बचाविली.’
anand47.hardikar@gmail.com
