‘प्रकटपणे स्वतंत्र स्वराज्य स्थापण्याचा शहाजीचा पहिला उद्योग शके १५५१ मध्ये लोदीच्या बंडाच्या वेळी झाला. (शकसंख्येमध्ये ७८ची भर घातली की इसवी सन आपल्याला समजू शकेल, हे वाचकांनी लक्षात घ्यावे.) परंतु शहाजहानाच्या व आदिलशहाच्या जोड प्रतिरोधापुढे तो उद्योग फार काळ टिकू शकला नाही… नंतर स्वराज्य स्थापनेचा दुसरा उद्योग शक १५५५ मध्ये निजामशाही पुनरुज्जीवित करून तिची पेशवाई करता करता व फारसे विपरीत भासू न देता राजकीय प्रसंगांच्या सहज ओघात राज्यासन स्वत: आक्रमिण्याचा होता. तोही शहाजहानाच्या प्रबल विरोधामुळे व महंमदशहाच्या नरमपणामुळे साधला नाही. नाही तर त्याच वेळी प्रच्छन्न स्वराज्य स्थापनेचा योग बहुतेक जुळून आला होता.’ शहाजीराजांच्या कारकिर्दीचे सार वाचकांसमोर मांडायला राजवाड्यांनी अशी सुुरुवात केली.

राज्य स्थापनेचे दोन छुपे प्रयत्न असे फसले, तरीही शहाजीराजाने आपल्या हेतूशी फारकत घेतली नाही, उलट पुन्हा दीर्घकाळ म्हणजे जवळजवळ दहा वर्षे खटपट व जुळवाजुळव करून स्वराज्याची कर्नाटकात रचना केली व ती त्या वेळी साधली. ती कशी ते सांगताना राजवाड्यांनी लिहिले, ‘कारण आता त्या कामी शहाजहानासारख्या प्रबल शत्रूचा प्रतिबंधहि नव्हता आणि शिवाजी व (थोरल्या) संभाजीच्या शस्त्रप्रहारांनी आदिलशहाहि हतप्रभ झाला होता… परंतु कर्नाटकातले शहाजीचे स्वराज्य म्हणजे कानडी लोकांवरचे मराठ्यांचे राज्य होते. त्या स्वराज्यात हे व्यंग होते, पण परिस्थितीपुढे त्याला उपाय नव्हता. त्या स्वराज्यात दुसरी गोम अशी होती की, आदिलशहापासून शहाजीचे स्वराज्य धक्काबुक्की होऊन तुटून विभक्त झालेले नव्हते; म्हटले तर स्वतंत्र, म्हटले तर परतंत्र अशा स्थितीत होते. परंतु शहाजीला ज्या परिस्थितीतून रस्ता काढावयाचा होता, त्या परिस्थितीत ह्याहून श्रेष्ठ फल तत्काल मिळण्यासारखे नव्हते. आस्तेआस्ते कालांतराने अलगद हातांत आपण होऊन पडण्यापैकी होते आणि तो प्रकार पुढे झालाहि… राज्याक्रमणाचे हे असे प्रकार यद्यपि अत्यल्प घर्षणाचे (संघर्षाचे) असले, तरी परिणामी कर्त्याला गौणत्व आणून कधीकधी अडचण उत्पन्न करणारे असतात. दुर्बल राजाची पेशवाई किंवा सरलष्करकी करता करता त्याला हळूच ढकलून देणार्‍या स्वराज्य स्थापकावर कृतघ्नतेचा आणि स्वामिद्रोहाचा आरोप प्रतिपक्षी आणू शकतात व ते आरोप निमूटपणे ऐकून घ्यावे लागतात. मूळ धन्याचे मांडलिकत्व पतकरिता  ते प्रसंगी झुगारून स्वराज्य स्थापण्याचा प्रकारहि असाच स्वामिद्रोहाच्या आरोपास पात्र होतो. कर्नाटकातील स्वराज्य स्थापनेतील हे गौणत्व शहाजी जाणून होता…’

आणि त्यामुळेच ‘मिंधेपणाचा गंधहि ज्या स्थापनेत आढळून येणार नाही, असे स्वराज्य दादाजी कोंडदेव, जिजाबाई व शिवाजी यांच्याद्वारे स्थापिण्याचा उद्योग शहाजीने चौथ्यांदा बंगळूराहून पुणे प्रांती करविला’, असे स्पष्ट करीत राजवाड्यांनी लिहिले, ‘आदिलशाहीशी व मोंगलाईशी फटकून वागून हा उद्योग मुद्दाम जाणूनसवरून करण्यात आला. अशाकरिता की, ह्या उद्योगावर स्वामिद्रोहाचा किंवा कपटकूटाचा आरोप प्रतिपक्षांना आणण्याची बिलकूल सोय राहू नये. पुणे प्रांतातील हे स्वराज्य स्वजनांचे स्वजनांवर असल्यामुळे ते टिकाऊ, भरीव व चिरंजीवी झाले… महाराष्ट्रातील ह्या चौथ्या स्वराज्य स्थापनेचे सर्व श्रेय शिवाजीच्या पदरांत पडले, हे खरे; परंतु मूळ कल्पना व योजना शहाजीराजाची असल्यामुळे त्यालाहि या श्रेयाचा वाटेकरी करणे इतिहासाला क्रमप्राप्त आहे!’

या चौथ्या यशस्वी प्रयोगातील शहाजीराजाचे योगदान आणखी स्पष्ट करीत राजवाड्यांनी पुढे लिहिले, ‘पिंगळे, अत्रे, रोझेकर, जेधे, बांदल हे सर्व मुत्सद्दी व सरदार शहाजीचे, जहागीर शहाजीची; किल्लोकिल्लीं व ठाणोठाणीं साठवलेला जंगी सरंजाम शहाजीचा. त्या जोरावर शिवाजीने आपली इमारत मूळ रचिली. आकाशातून पडला आणि धावायला लागला, अशातला काही प्रकार शिवाजीचा नव्हता. पित्याच्या खांद्यांवर उभा राहून शिवाजी पहिल्यांदा उच्चासनास्थ झाला. थोर मराठा कुळांशी शहाजीचे पिढीजात शरीरसंबंध असल्यामुळे शहाण्णव कुळी मराठ्यांचे साहाय्य व शहाजीच्या नावाचा दरारा व दिमाख ह्या देणग्या शहाजीकडून शिवाजीस मिळाल्या. शिवाय, अडचणीच्या प्रसंगी वेळोवेळी शहाजीची मदत शिवाजीला पोचत असे ती निराळीच!’

– आनंद हर्डीकर

anand47.hardikar@gmail.com