भारताची फाळणी ही पूर्वनियोजित तारखेआधी झाली, जवळजवळ दहा महिने! याची दोन कारणे सांगितली जातात. एकतर ब्रिटिश इंडियाचा कणा दुसर्‍या जागतिक महायुद्धामुळे आर्थिक व सामाजिक तणावाने मोडला होता. तर दुसरीकडे देशाच्या स्वातंत्र्याची मागणी करणार्‍या भारतीय जनतेचे राष्ट्रीय ऐक्य आणि दबाव झपाट्याने वाढत होते. त्यामुळे इंग्रजांना देश चालवणे आवाक्याबाहेरचे होत होते. त्यासाठी ब्रिटनच्या सागरी महासत्तेचे प्रमुख ॲडमिरल लॉर्ड माउंटबॅटन यांची तातडीने (२२ मार्च १९४७ साली) भारतात रवानगी करण्यात आली. पण सत्ता द्यायची तर नक्की कोणाकडे, हे काही ब्रिटिशांना ठरवता येईना. मुस्लिमांच्या वतीने मुस्लीम लीगचे नेते महम्मद अली जिना मुस्लिमांच्या स्वतंत्र, स्वायत्त देशासाठी अडून बसले होते. तर महात्मा गांधी काँग्रेस आणि हिंदुत्वाच्या वतीने तसेच हिंदूमहासभा ‘फाळणी नको’ म्हणून सांगत होते.

या संदर्भात एक गोष्ट लक्षात घ्यावयास हवी, की हिंदुत्वाचा हा वाद त्याआधीच ब्रह्मदेशात ऐरणीवर आला होता आणि हिंदूंच्या वतीने सुरुवातीला सयादाव ओटामा त्याचे नेतृत्व करीत होते. ओटामा यांचे नेतृत्व कमी पडल्यामुळे तेथील हिंदू जनतेने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर ही नेतृत्वाची जबाबदारी सोपवली. सावरकरांच्या हिंदुत्व या संकल्पनेचा जन्म इथेच झाला. अमर्त्य सेन आणि त्यांचे वडील आशुतोष सेन हेसुद्धा या यादवीचे पीडित ठरले. आशुतोष सेन मंडाले विद्यापीठात मानद प्राध्यापक होते. आर्य संस्कृतीशी नाते सांगणे, खाकी कपडे वापरणार्‍या हिंदू चेहर्‍याच्या विरुद्ध मुस्लीम लीग विरुद्ध नॅशनल गार्ड विरुद्ध काँग्रेस असा सर्व गोंधळ सुरू होता.

काही संशोधकांच्या मते, लॉर्ड माउंटबॅटन हे इंग्लंडच्या सौम्य प्रकृतीच्या राजे जॉर्ज सहावे तसेच माउंटबॅटन यांचे चुलतभाऊ असलेल्या (सहाव्या जॉर्जपेक्षा) वरचढ झाले होते. स्वत:च्याच वजनामुळे कोसळत असलेल्या ब्रिटिश साम्राज्यांची कल्पना माउंटबॅटनना आली होती. त्यासाठी बकिंगहॅम राजघराणे आणि माउंटबॅटन राजघराणे यांच्यामध्ये साम्राज्याची समसमान वाटणी करण्याचा त्यांचा विचार होता. पण प्रत्यक्षात विपरीत घडले, दुसर्‍या महायुद्धामुळे झालेल्या पडझडीमुळे ब्रिटिश साम्राज्याला बहुतेक वसाहती ब्रिटनला सोडाव्या लागल्या.

ब्रिटिश साम्राज्याच्या आधी असलेल्या ज्या साम्राज्याचा विशेष उल्लेख होत नाही, ते साम्राज्य म्हणजे भारतीय साम्राज्य (इंडियन एम्पायर) होय! याची व्याप्ती अफगाणिस्थानापासून एडनपर्यंत पसरली होती. एडनमध्ये भारतीय गुजराती-पारशांचे प्रमाण तुलनेने अधिक होते. तर रंगून, ब्रह्मदेशात चेट्टीयार, तमिळ लोकांचे स्थान हे स्थानिकांपेक्षा वरचढ होते. ब्रह्मदेशात मोहम्मद मकादी या स्थानिक पुढार्‍याचा भारतीयांच्या सबलीकरणाला तीव्र विरोध होता. पुढे नागालँडचे नेते अंगामी झापू फिझो यांनी कोहिमामध्ये भारतीयांच्या अधिकाराला असाच विरोध केला. अन्यथा भारत-पाकिस्तान या फाळणीचा विस्तार भूतकाळात अस्तित्वात असणार्‍या पूर्वीच्या ‘इंडियन एम्पायर’सारखा कदाचित विशाल असला असता.

तसेच आफ्रिकेतील देशांची फाळणीही झाली नसती. नायजेरिया, घाना, केनिया, युगांडा, टांझानिया, मॉरिशस, सोमालिया असे अनेक ब्रिटिश सत्तेखालील देश साहजिकच भरडले गेले नसते. तसेच मध्यपूर्वेतील काही देश अरेबिया, पर्शिया, सीरिया, लेबनॉन, पॅलेस्टीन, जॉर्डन जे पहिल्या महायुद्धात आधीच दुभंगले गेले होते त्या देशांची पुनर्रचना करणेही भाग पडले असते. ब्रिटिशांच्या विजयानंतर मध्यपूर्वेतील लॉर्ड माउंटबॅटनचे साहाय्यक असलेले, भारतीय परराष्ट्र सेवेत (आयएफएस) असलेले राजघराण्यातील नरेंद्रसिंग सरीला यांच्या ‘शॅडो ऑफ द ग्रेट गेम: द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज पार्टिशन’ या पुस्तकात भारताच्या फाळणीचे विदारक चित्र दिसते.

घाईघाईने दहा महिने आधी केलेल्या भारताच्या फाळणीचे आणखी एक कारण म्हणजे १९४६ साली मुंबई बंदरात झालेला आणि आजूबाजूच्या आंतरराष्ट्रीय बंदरातून सर्वदूर पसरलेला नौदलाचा उठाव हेही होते. अशा कारणांमुळे हिंदू आणि मुस्लिमांना सोयीने स्थलांतरित होण्याएवढा वेळच मिळाला नाही. त्यामुळे संपत्तीची योग्यरीत्या विल्हेवाट लावणेही विस्थापितांना शक्य झाले नाही. समाजकंटकांनी याचा फायदा घेऊन नुसती लूटमारच केली नाही, तर अश्रापांचे जीव घेतले, बलात्कार केले.

आता आपण बघू या फाळणीविषयी माहिती देणार्‍या एका नव्या पुस्तकाकडे. हे पुस्तक चर्चा करते, ते एक नव्हे तर पाच फाळण्यांविषयी! बर्मा, पर्शियन/ अरबी आखातातील देश, ब्रिटिश भारताची (भारत-पाक) फाळणी, तसेच भारत-पाकमधील ५०० हून अधिक संस्थानांचे विलीनीकरण आणि नंतर १९७१ साली झालेली बांगलादेशची फाळणी. सॅम डालरीम्पल लिखित या पुस्तकाचे शीर्षक आहे ‘शॅटर्ड लँड्स – फाइव्ह पार्टिशन्स अँड द मेकिंग ऑफ मॉडर्न एशिया’ सॅमचे वडील विल्यम डालरीम्पल हे प्रसिद्ध ब्रिटिश इतिहासकार लेखक आहेत. त्यांची भारतीय उपखंडाविषयी अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.

‘व्हाइट मुघल्स’, ‘द लास्ट मुघल’, ‘द अनार्की’ ही त्यांची काही गाजलेली पुरस्कारप्राप्त पुस्तके. ते दिल्लीत राहतात. गेल्या वर्षी नव्याने भारताच्या पुरातनकाळाविषयी सांगणारी अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत, त्यात डालरीम्पलच्या नव्याने आलेल्या ‘द गोल्डन रोड’ या पुस्तकाला ‘मार्क लिंटन हिस्ट्री पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे. हे पुस्तक भारताच्या प्राचीन वैभवाविषयी आहे. सॅम (२९ वर्षे) हा विल्यमचा मुलगा. डालरीम्पल हे एक उमराव आहेत. आपल्या पॉडकास्टवर विल्यम नेहमी सॅमचा उल्लेख करतात. त्यात ते विल्यम नेहमी सॅमला लेखनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत असत, विशेषत: ऐतिहासिक लेखन. पण सॅमने आपला स्वत:चा मार्ग चोखाळून पहिल्याच इतिहासविषयक पुस्तकातून ख्यातकीर्त लेखक बनून वडिलांना चकित केले.

‘शॅटर्ड लँड्स’ या आपल्या पुस्तकात भारताच्या फाळणीविषयी वर्णन करताना सॅम म्हणतो, ‘अंतराळातून तुम्हाला चीनची (ग्रेट वॉल ऑफ चायना) भिंत दिसू शकत नाही, पण भारत व पाकिस्तान यांचे विभाजन करणारी सीमारेषा मात्र नि:संशय दिसते. तीन हजार कि.मी. लांबीची, दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघणारी, सेन्सर्स आणि सुंरुग पेरलेली ही सीमारेषा म्हणजे ब्रिटिश राज्यसत्तेने भारताच्या गालावर केलेला खोल घाव होय! या सीमा आज नैसर्गिक वाटत असल्या तरी पाच प्रमुख घटनांमुळे त्या कृत्रिमरीत्या अस्तित्वात आल्या.

या पाच घटना म्हणजे, १९३७ मध्ये बर्माचे ब्रिटिश साम्राज्यातून बाहेर पडणे; त्याच वर्षी एडनची आणि १९४७ मध्ये आखाती संरक्षित प्रदेशांची विभागणी; याच वर्षी (१९४७ मध्ये) झालेली भारत-पाकिस्तानची विभागणी; त्यामुळे ५५० हून अधिक संस्थानांचे झालेले विलीनीकरण आणि नंतर १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तान वेगळा होणे. प्राचीन नसलेल्या आणि अटळही नसलेल्या या रेषा, तत्कालीन मंत्रिमंडळांमध्ये घाईघाईने आखल्या गेल्या होत्या.’ हे वाचल्यावरच फाळणीच्या इतिहासावरील इतर पुस्तकांपेक्षा ‘शॅटर्ड लँड्स’ वेगळे आहे, हे ध्यानात येते.

हे पुस्तक उल्लेखनीय ठरते, ते केवळ संशोधनामुळे किंवा बंगाली, बर्मी, उर्दू अशा विविधभाषिक देशवासीयांच्या मुलाखतींमुळे नाही, तर ज्या प्रकारे एका वेगळ्या दृष्टिकोनातून दक्षिण आशियाच्या फाळणीच्या इतिहासाला ते मांडते त्यामुळे होय. पुस्तकात सॅम यांनी आधुनिक दक्षिण आशियाचा इतिहास अशा पाच फाळण्यांच्या माध्यमातून सांगितला आहे, ज्यामुळे या प्रदेशांचे रूपच पालटले. १९२८ सालापर्यंत आशियाच्या विशाल भूभागात इंडियन एम्पायरचा भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ब्रह्मदेश (बर्मा), नेपाळ, येमेन, भूतान, ओमान, संयुक्त अरब अमिराती, कतार, बहरीन आणि कुवेत या देशांचा समावेश होता. मागे म्हटलेल्या एकाच साम्राज्यवादी छत्राखाली एकवटलेल्या या देशांचा हा प्रदेश म्हणजे एक अशी राजकीय संस्था होती जिची अधिकृत ओळख ‘इंडियन एम्पायर’ अर्थात भारतीय साम्राज्य किंवा अधिक सोप्या भाषेत सांगायचे तर ‘राज’ म्हणून होती.

ब्रिटिश साम्राज्याच्या मुकुटातील एक रत्न (ज्वेल इन द क्राऊन) असणारे भारतीय राज, लाल समुद्रापासून ते आशियाच्या घनदाट अरण्यापर्यंत विस्तारलेला एक विशाल प्रदेश होता. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश लोकसंख्या येथे वसलेली होती. पृथ्वीवरील सर्वात मोठ्या हिंदू, मुस्लीम, शीख व पारशी समुदायांचा समावेशही याच प्रदेशात होता. येथील लोक चलन म्हणून भारतीय रुपयाच वापरत होते. इंडियन एम्पायर असा शिक्का असलेला पासपोर्ट त्यांना दिला जात असे आणि बाब अल-मंदाब (येमेनजवळ) पासून ते हिमालयाच्या पर्वतरांगांपर्यंतच्या छावण्यांमध्ये तैनात असलेले सैन्य त्यांचे रक्षण करत असे.

या सर्व प्रदेशातून प्रत्यक्ष फिरून, तेथील जुन्याजाणत्यांच्या मुलाखती घेऊन सॅमने हे पुस्तक लिहिले आहे. त्याचे वडील विल्यम डालरीम्पल यांनी कोसळणार्‍या देशांच्या घसरणीविषयी क्वचितच लिहिले आहे, पण सॅम यांनी हे प्रदेश उद्ध्वस्त का झाले हे लिहिले आहे. हे पुस्तक प्रामुख्याने जरी भारत आणि ब्रह्मदेशाबद्दल असले तरी त्या पलीकडे जाऊन बृहद भारतीय उलथापालथीचे ते विस्तृत वर्णन करते. पण तरीसुद्धा सॅमचा दृष्टिकोन हा प्रस्थापितांचे निरीक्षण आणि त्यांचे निर्णय याकडे अधिक झुकलेला दिसतो. प्रस्थापितांच्या निर्णयप्रक्रियेमुळे समाजावर व गरिबांवर झालेल्या परिणामांवर हे पुस्तक अधिक चर्चा करते, पण मिथकांकडे ते फारसे लक्ष देत नाही. आपण आपली फाळणी भावनात्मक दृष्टीने पाहतो, पण इतर चार फाळण्याही त्या त्या देशांना तितक्याच उद्ध्वस्त करणार्‍या होत्या हे आपणास ठाऊक नसते. सॅमचे पुस्तक आपल्याला याची ओळख करून देते.

शॅटर्ड लँड्स – फाइव्ह पार्टिशन्स अँड द मेकिंग ऑफ मॉडर्न एशिया

लेखक : सॅम डालरीम्पल

प्रकाशन : हार्पर कॉलिन्स

पृष्ठे : ५२० किंमत : ७९९ रु.

सह-संस्थापक, संपादक, प्रकाशक, कालनिर्णय  

jayraj3june@gmail.com