प्रसंग एक – प्रशिक्षण आटोपून कल्याण डोंबिवलीतील शिंदेसेनेच्या नगरसेवकांनी परतीची वाट धरताच प्रबोधनीतील कर्मचारी व प्रशिक्षकांनी ‘सुटलो’ असे म्हणत थेट प्रमुखांकडे धाव घेतली. ‘झाले सगळे नीट?’ असे त्यांनी विचारताच कक्षात जमलेले सारे भडाभडा बोलू लागले. ‘काहीही करा पण पुन्हा या नगरसेवकांचे प्रशिक्षण इथे नको. डोक्याला किती ताप हो’ ऐकताच प्रमुख चकित झाले. मग एक प्रशिक्षक म्हणाला. ‘सर, मी नगरसेवकांची कर्तव्ये शिकवत होतो. वर्गात शांतता होती. तेवढ्यात एकाचा फोन वाजला. पलीकडे रमेश सुकर्‍या होता. चक्क कारागृहातून. नाव ऐकताच त्याने फोन स्पीकरवर टाकला. सारे त्याच्याभोवती जमले. ‘कसा हायेस तू’ असे प्रत्येक जण विचारू लागला. बरे झाले तू तिकडे आहे, बाहेर असता तर इथे यावे लागले असते. हेही काही कारागृहापेक्षा कमी नाही असेही एक जण म्हणाला. मी ‘शिस्त पाळा’ असे म्हणालो पण कोणी ऐकले नाही. ‘सुकर्‍या काळजी नको, आम्ही पाठीशी आहोत,’ असे प्रत्येक जण ओरडून सांगत होता. मग भोजनगृहाचा प्रमुख म्हणाला. ‘जेवतानाही खूप छळले हो त्यांनी. प्रत्येक जण तांबडा व पांढरा रस्सा मागायचा. कुठून देणार? हे असे मिळमिळीत जेवण जेवून आम्ही च्याऊम्याऊ होऊ,’ असे टोमणे ऐकावे लागले. ‘निवडणुकीनंतर पहिल्यांदाच वरण भात, अळूची भाजी खातोय असेही एक जण कुत्सितपणे म्हणाला.’

तेवढ्यात दुसरा प्रशिक्षक समोर आला. ‘मी अधिकार्‍यांशी सौजन्यपूर्वक कसे बोलावे हे शिकवत होतो. मला मध्येच थांबवून अनेकांनी वाद घातला. कानशिलात दोन लगावल्याशिवाय ऐकत नाही कुणी, तुम्ही हे सांगताच कशाला आम्हाला,’ असे एकाने उभे राहून सांगितले. कुणातही शिस्त नव्हती. नुसती आदळआपट व संधी मिळाली की गोंधळ. विद्याथ्र्यासारखे कुणी वागलेच नाही.’ ऐकून प्रमुखांनी कपाळावर हात मारला.

प्रसंग दोन – ‘काय गरज होती त्या प्रबोधनीतून बाहेर पडल्याबरोबर हॉटेलात बसून राडा करण्याची? अरे, किमान तुमची नाही तर माझी तरी इज्जत ठेवा’ समोर खाली मान घालून उभ्या असलेल्या ६० नगरसेवकांवर संतापलेेले शिंदे बोलत होते. ‘त्या सुकर्‍यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली म्हणून तुम्हाला मुद्दाम तिथे पाठवले तर बाहेर निघाल्याबरोबर राडा! दोन दिवसही पोटाला आराम देता येत नाही? निवडून आले म्हणजे शहराचा सातबारा तुमच्या नावावर झाला नाही हे माझे वाक्य ऐकल्यावर तीन तासांत तुम्ही धिंगाणा घातला. प्रत्येकाने काय सुकर्‍याच व्हायचे ठरवले काय? अरे, भविष्यात राज्याचे नेतृत्व करण्याची संधी आपल्याला आहे. किमान याचा विचार करून तरी नीट वागा. गोड बोलून कसे काम काढायचे हे त्या भाजपवाल्यांकडून शिका जरा. युतीचा फायदा तर दिसू द्या.’

शिंदेंच्या रागाचा भर ओसरल्यावर एक नगरसेवक धाडसाने म्हणाला. ‘साहेब, हॉटेलमध्ये जे काही घडले त्याबद्दल माफ करा, पण पुन्हा आम्हाला त्या प्रबोधनीत पाठवू नका. आमचे चुकत असेल तर दोन शिव्या हासडा. एवढे केले तरी आम्ही स्वत:ला शिस्त लावून घेऊ. मात्र ते अळूच्या भाजीसारखे असलेले प्रशिक्षण तेवढे टाळा. आमच्या डोसक्यात काही शिरलं नाही बघा ते. आम्ही रस्त्यावरची माणसं.  दोन घ्यायचे आणि दोन द्यायचे, हेच आम्हाला माहीत. त्या भाजपच्या नादाला लागून उगीच सौजन्याचा  लेप आमच्या अंगावर लावू नका.’ हे ऐकून शिंदे अस्वस्थ झाले. तेवढ्यात दुसरा नगरसेवक म्हणाला, ‘पुन्हा प्रबोधनीचे नाव काढाल तर आम्ही गुवाहाटीचा रस्ता धरू’ ऐकून चकित झालेले शिंदे जमलेल्या सर्वांकडे बघतच राहिले.