दक्षिण मुंबईतल्या एका जुन्या इमारतीच्या तळघरात कुणालाही दिसणार नाही अशा बेताने सदाभाऊ शिरले तेव्हा रात्रीचे बारा वाजले होते. दिमतीला असलेल्या रक्षकाने त्यांना सुसज्ज कक्षात सोडले. एका गोलाकार मेजाभोवती बसलेल्यांपैकी एकाने ‘क्लीन चिट कक्षात तुमचे स्वागत’ असे म्हणताच इथे का पाठवले गेले याचा उलगडा त्यांना झाला. जे घडले ते सत्य सांगा असे एकाने बजावताच त्यांनी जवळच्या पिस्तुलातून गोळी कशी झाडली ते सांगितले. ही स्वसंरक्षणार्थ व शांतता प्रस्थापित करण्यासाठी केलेली कृती होती व त्यावर मी ठाम राहायचे ठरवले असे त्यांनी सांगताच मुख्य खुर्चीतला प्रमुख बोलू लागला ‘हे बघा, आता तुम्ही राडा संस्कृती त्यागून सभ्य संस्कृतीच्या वर्तुळात आलात. त्यामुळे असे उत्तर चालणार नाही. तुम्ही यावर काहीच बोलायचे नाही. तुमच्या वतीने आम्हाला अंकित असलेल्या यंत्रणाच बोलतील. त्यांनी काय पवित्रा घ्यायचा हे आम्ही या कक्षात ठरवतो.

जगातल्या कोणत्याही दोषीला निर्दोष ठरवण्याची क्षमता आमच्यात आहे. तेही तर्कशुद्ध पद्धतीने. पर्वताने मानवासमोर नतमस्तक होणे, एका आचमनात समुद्राचे सर्व पाणी गिळंकृत करणे अशी दैवी शक्ती लाभलेला हा देश. त्याच परंपरेचे आम्ही पाईक आहोत. त्यामुळे तुम्ही निर्दोष कसे हे आता ठरवू’! ‘अहो पण मी गोळी झाडत असल्याची चित्रफीत त्यांच्याकडे आहे’ असे सदाभाऊंनी सांगताच कक्षप्रमुख हसले. ‘अशा चित्रफिती कशा हाताळायच्या हे आम्हाला चांगले ठाऊक आहे’ असे म्हणत त्यांनी कक्षातल्या भव्य पडद्यावर ‘ती’ चित्रफीत सुरू केली. त्यात सदाभाऊ गोळी झाडताना स्पष्टपणे दिसत होते. कक्षातील इतरांनी ती फीत थोडी मागे पुढे करत वारंवार न्याहाळली. मग भाऊंना वाचवायचे कसे यावरून काथ्याकूट सुरू झाला. रिकामे काडतूस जप्त झाल्यामुळे गोळी झाडलीच नाही हा दावा योग्य ठरणार नाही असे सर्वाचे मत झाले.

Shash Mahapurush Rajyog
३० वर्षांनी ‘शश राजयोग’ बनल्याने ‘या’ तीन राशी होणार प्रचंड श्रीमंत? शनिदेवाच्या कृपेने वर्षभर मिळू शकतो पैसाच पैसा
Ram Navami 2024 Shubh Yog
२०२४ च्या रामनवमीला अत्यंत शुभ योग जुळून आल्याने ‘या’ राशी होणार श्रीमंत? ‘या’ रूपात दिसू शकते श्रीरामकृपा
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…
how to control blood sugar on the occasion of holi
Blood Sugar : होळीला गोड खाताना रक्तातील साखर कशी नियंत्रणात ठेवावी? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

चित्रफितीत भाऊंच्या मागे, अगदी खेटून एक जण उभा होता. त्याचा चेहरा दिसत नव्हता हा कोण असे प्रमुखांनी भाऊंना विचारले. त्यांनाही नाव आठवेना. समोर शत्रू असल्याने मागे बघायला वेळच मिळाला नाही असे ते म्हणाले. हा बिनचेहऱ्याचा माणूसच निर्दोषत्वासाठी कामात येऊ शकतो हे लक्षात आल्यावर फीत बंद करून त्यादृष्टीने विचार सुरू झाला. याच माणसाने भाऊंच्या खिशात हात घालून पिस्तूल बाहेर काढले व गोळी झाडली अशा कथा रचली तरी त्यात धोके खूप. उद्या विरोधकांनी त्याला समोर आणले तर आपल्या कक्षाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे ठाकायचे. त्यापेक्षा तो अनोळखी व बिनचेहऱ्याचा असल्याचा फायदा घेत पिस्तूल भाऊंचेच पण गोळी कुणी झाडली ते ठाऊक नाही असा पवित्रा घेतला तर! प्रमुखांच्या या विधानावर साऱ्यांनी माना डोलावल्या. ‘यातून संदिग्धता कायम राहील’ असे भाऊंनी म्हणताच प्रमुखांनी रागाने त्यांच्याकडे बघितले. ‘तुम्ही आमच्या पक्षात पूर्णपणे सामील झालेले नाहीत. विरोधकांनाही काही काम द्यावे लागते. तेव्हा तुम्ही निघा आता. हाच  मुद्दा पटलावर ठेवला जाईल’ हे उत्तर ऐकून सदाभाऊ तिथून बाहेर पडले. तेवढय़ात त्यांना किरीटभाई आत जाताना दिसले. त्यांच्या हाती पीएचडीचा प्रबंध होता.