समग्र साहित्याच्या अकराव्या खंडातील एका दहा पानी लेखात राजवाड्यांनी शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून तयार करण्यात आलेल्या ‘राजव्यवहारकोशा’इतक्याच महत्त्वाच्या, परंतु काही कारणांमुळे दुर्लक्षित राहिलेल्या एका रचनेकडे महाराष्ट्राचे लक्ष वेधले. ती रचना म्हणजे राजपत्रांची लेखनप्रशस्ति. ‘शक १५९६मध्ये राज्याभिषेकाच्या समयी शिवाजीने अनेक मुलकी, लष्करी, धर्माधिकरणी, न्यायाधिकरणी वगैरे कायदे केले. त्यांना पद्धती म्हणत. जुने शिलशिले पाहून व तत्कालीन रीतरिवाज पाहून या पद्धति तयार केल्या गेल्या. अशा पद्धतींपैकीच लेखनप्रशस्ति म्हणून एक पद्धती शिवछत्रपतीच्या आज्ञेवरून बाळाजी आवजी चिटणीस व इतर मुत्सद्दी मंडळी यांच्या विचाराने रचली गेली’, अशी त्याबद्दलची माहिती राजवाड्यांनी लेखाच्या प्रारंभीच दिली.

पुढे त्या पद्धतीच्या गरजेची आणि थोड्याशा विलंबाने झालेल्या रचनेची पार्श्वभूमी स्पष्ट करताना त्यांनी लिहिले, ‘शक १२४०पासून शक १५९६पर्यंत म्हणजे सुमारे तीनसाडेतीनशे वर्षे महाराष्ट्रात मुसुलमानांचा अंमल होता. त्या अमलाखाली देशात इतर बाबींत मुसुलमान रिवाजांचा जसा जारीने शिरकाव झाला, तसाच लेखनप्रशस्तीतही झाला. बिल, वल्लद, मुष्फिक् मेहेरबान, हे किताबत्, तेरीख, माहे, सुरुसत्र वगैरे फारशी व अरबी शब्द पत्रलेखनात हमेशा येऊ लागले. शक १२४० पूर्वी हेमाद्रीने म्हणजेच हेमाडपंताने पत्रे व सरकारी कागद लिहिण्याच्या ज्या पद्धती घालून दिल्या होत्या, त्यांची भाषांतरे फारसीत होऊन नवीन मुसुलमानी मायने प्रचारात आले. सारांश, येथून तेथून सर्व लेखनप्रशस्ति यवनभाषामय झाली…’

ही यावनी लेखनप्रशस्ती शिवाजीने तोरणा किल्ला घेतल्यापासून म्हणजे शक १५६८पासून १५९६पर्यंत चालूच होती, कारण राजकारणाच्या विवंचनेमुळे व लढायांच्या गडबडीमुळे या ३० वर्षांत लेखनप्रशस्तिकडे लक्ष देण्यास शिवाजीला जसा अवकाश सापडावा तसा सापडलाच नाही, या वस्तुस्थितीचा उल्लेख करून राजवाड्यांनी पुढे खुलासा करीत म्हटले, ‘परंतु त्या गडबडीच्या अवधीत राजव्यवहारकोश तयार करवून यावनी शब्दांऐवजी संस्कृत शब्द प्रचारात आणण्याची व्यवस्था त्या धोरणी मुत्सद्द्याने करून ठेवली.

अशा हेतूने की, पुढे मागे व्यवस्थित रीतीने सर्व मायने शुद्ध मराठीत लिहिण्याची पद्धती सुलभतेने प्रचलित करता यावी. यावनी पद्धती आस्ते आस्ते मोडून टाकून शुद्ध निर्भेळ मराठी पद्धती चालू करण्यासाठी राजव्यवहारकोश व लेखनप्रशस्ति ही जी दोन साधने शिवाजीने निर्माण केली, त्यांपैकी राजव्यवहारकोश छापून प्रसिद्ध झाला आहे; लेखनप्रशस्ति झाली नाही… ही लेखनप्रशस्ति जशीच्या तशी सबंध सापडलेली नाही. परंतु तिच्यातील बराच मजकूर एकदोन जुन्या बाडांत लिहिलेला आढळला, त्यावरून इथे काही तपशील देतो आहे’…

राजवाड्यांनी तो तपशील देताना लेखनप्रशस्तिच्या उपोद्घाताचा आशय थोडक्यात मांडला. त्यांनी लिहिले, ‘स्वराज्य सुरू होऊन इतकी वर्षे झाली असता राज्यातील अधिकारी, मुत्सद्दी, कामगार व इतर लोक राजास व परस्परांस लिहिताना मनात येईल तो मायना योजतात; त्यामुळे शिस्त राहात नाही. सबब ही प्रशस्ति वर सांगितलेल्या सर्वांच्या उपयोगासाठी प्रसिद्ध केली जात आहे, असे उपोद्घातामध्ये म्हटले होते. नंतर हेमाडपंताच्या काळी पत्रलेखनाच्या प्रशस्त्या प्रचलित होत्या, परंतु नंतर मुसुलमानी अमलात त्यांच्यात बरेच फेरफार झाले, याची माहिती देण्यात आली होती.

आता राज्य हिंदूंचे असल्यामुळे मुसुलमान पातशहा व अधिकारी जे मायने योजीत, ते जसेच्या तसे घेणे अशक्य आहे. तेव्हा मुसुलमानांच्या पूर्वी सिलसिला काय होता, ते पाहून व मुसुलमानी मायन्यांतून घेता येण्यासारखे असेल तेवढे घेऊन, देशकालवर्तमानानुरूप नवी लेखनप्रशस्ति प्रचलित केली पाहिजे, असे स्पष्टीकरण देऊन प्रारंभाचा भाग आटोपता घेतला आहे.’

शिवरायांच्या मराठी भाषाविषयक क्रांतिकारक कार्याचा काहीसा दुर्लक्षित-उपेक्षित राहिलेला पैलू अशा रीतीने राजवाड्यांनी प्रकाशात आणला आणि पुढे अधिकाधिक तपशील सांगून जी काही धमाल उडवली, ती विलक्षणच होती. कागदावर खासगी किंवा सरकारी पत्रे लिहिताना प्रारंभी रेघ काढावीच लागे. निरनिराळे मायने लक्षात घेऊन रेषा कशा काढाव्यात, याचे नियम समजून घेणे फारच गमतीचे होते.  

anand47.hardikar@gmail.com