केंद्रीय कृषीमंत्री तथा मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान उर्फ मामाजी हे शांत, संयमी नेते म्हणून ओळखले जातात. सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या चौहान यांनी पक्षांतर्गत घडामोडींबाबत कधी वादग्रस्त विधाने वा टीकाटिप्पणी केल्याची उदाहरणे नाहीत. सतत हसतमुख असलेले मामाजी हा मध्य प्रदेश भाजपचा मुख्य चेहरा आहे. तीन वर्षांपूर्वी पक्षाने मध्य प्रदेश विधानसभेची निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली जिंकली पण नवीन चेहरा व तरुणांना संधी देण्याच्या धोरणानुसार शिवराजसिंह चौहान यांच्याऐवजी मोहन यादव यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपविले गेले. तसा शिवराजसिंह यांना हा मोठा धक्का होता. कारण भाजपसाठी परिस्थिती प्रतिकूल असतानाही त्यांनी एकतर्फी विजय मिळवून दिला होता. पण त्यांनी ना कधी उघडपणे नाराजी व्यक्त केली नाही, ना नेतृत्वावर खापर फोडले. मुख्यमंत्रीपद नाकारले गेले असले तरी पुढे केंद्रीय मंत्रिमंडळात कृषी हे महत्त्वाचे खाते सोपवून शिवराजसिंह चौहान यांचे एक प्रकारे राजकीय पुनर्वसन करण्यात आले.

शिवराजसिंह चौहान दिल्लीत स्थिरावले. त्यांनी राज्याच्या कारभारावर कधीही भाष्य केले नाही. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांची खदखद बाहेर पडू लागलेली दिसते. चौहान यांनी विधानसभेत ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते, तेथील १२ आदिवासी कुटुंबांची घरे वन खात्याने हटविली. आपल्या जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात ही कारवाई केल्याचा वन विभागाचा दावा. पण या कारवाईने शिवराजसिंह चौहान प्रचंड संतप्त झाले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदान केलेल्यांना का लक्ष्य केले जात आहे, असा सवाल त्यांनी मध्य प्रदेश सरकारला केला. एवढे बोलून ते थांबले नाहीत तर ‘या मतांमुळेच भाजपला विजय मिळाला आणि मोहनजी मुख्यमंत्री झाले’, असे खडे बोलही त्यांनी सुनावले. एकूण काय, तर शिवराजसिंह चौहान यांनी थेट मुख्यमंत्री मोहन यादव यांनाच लक्ष्य केले. विशेष म्हणजे आदिवासी कुटुंबांच्या घरांवर कारवाई करणारे वन खाते हे मुख्यमंत्री यादव यांच्याकडेच आहे. प्रश्न फक्त १२ कुटुंबांच्या घरांवरील कारवाईचा होता, पण त्या माध्यमातून चौहान यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील संतापाला वाट करून दिली.

तसाही चौहान यांनी अलीकडेच मुख्यमंत्र्यांना ‘लाडली बहना’ योजनेवरून चिमटा काढला होता. महाराष्ट्राप्रमाणेच मध्य प्रदेशमध्येही सत्ताधारी भाजपच्या विरोधात वातावरण होते व सत्ता कायम राखणे कठीण वाटत होते. तेव्हा मुख्यमंत्रीपदी असलेल्या चौहान यांनी महिलांना दरमहा एक हजार रुपये अनुदान देणारी ‘लाडली बहना’ योजना लागू केली. या योजनेमुळे भाजपला महिलांची भरभरून मते मिळाली. जिथे निवडणुका असतात, अशा राज्यामध्ये ही योजना आता राबविण्यात येते. महाराष्ट्रातही एकनाथ शिंदे यांच्या सरकारने याच योजनेचा आधार घेतला. अशी ही ‘लाडली बहना’ योजना महागडी ठरू लागल्याची टीका करून मुख्यमंत्री यादव यांनी राज्यावरचा आर्थिक बोजा वाढल्याबद्दल चौहान यांना दोष दिला. त्यावर ‘बहिणींना राग आला तर कोणाची खैर नाही, हे सर्वांना माहीत आहे. यामुळेच कोणतेही सरकार येवो, बहिणींसाठीची योजना सुरूच ठेवावी लागेल’, असे प्रत्युत्तर चौहान यांनी दिले. मध्य प्रदेशातील मूग उत्पादक शेतकर्‍यांच्या आंदोलनावरूनही या आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी परस्परांवर कुरघोडी करण्याची संधी सोडली नव्हती.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान, राजस्थानमध्ये वसुंधराराजे, छत्तीसगडमध्ये रमणसिंह या प्रस्थापित नेत्यांना डावलून नव्या चेहर्‍यांना मुख्यमंत्रीपदी संधी दिली. या तीन राज्यांबरोबरच ओदिशा, दिल्ली, हरियाणा या राज्यांमधील मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर पक्षातूनच टीका केली जाते. भाजपने नेतृत्वाची नवीन फळी पुढे आणली असली तरी राजकीयदृष्ट्या हे नेते अजून स्थिरावलेले नाहीत. वादांपासून दूर राहणार्‍या शिवराजसिंह चौहान यांच्यासारखा नेताही तुम्ही मुख्यमंत्री कशामुळे झालात, ते लक्षात घ्या असे सुनावतो तेव्हा पक्षांतर्गत सारे आलबेल नाही हेच स्पष्ट होते. मोदी-शहा या दुकलीपुढे विरोधी सूर लावण्याचे धाडस पक्षात कोणी करीत नाही. पण राजस्थानमध्ये किरोडीलाल मीना किंवा के. के. बैष्णोई, हरियाणात अनिल विज या भाजपच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी तेथील मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली. आता शिवराजसिंह चौहान हे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात गेले आहेत. भाजप नेत्यांमधील अस्वस्थता हळूहळू बाहेर पडू लागल्याची ही लक्षणे आहेत.