दाक्षिणात्त्य चित्रपट जेव्हा‘ओटीटी’वर उपलब्ध नव्हते आणि थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहाण्याचा शिरस्ता मोडला नव्हता, अशा काळात तेलुगू, तमिळ चित्रपटांचे हिंदी ‘रीमेक’ तरी होत किंवा त्यांचे केवळ संवाद हिंदी भाषेत (डबिंगद्वारे) केले जात. हा काळ १९९० पर्यंत होता, हे ज्यांना आठवेल त्यांना ‘नाचे मयूरी’, ‘पुष्पक’ आणि ‘अप्पू राजा’ हे गाजलेले चित्रपटही आठवतील- त्यांचे मूळ दिग्दर्शक सिंगीतम श्रीनिवास राव अलीकडेच (३ ऑक्टोबर) निवर्तले. गेल्या ७० वर्षांत तेलुगू, तमिळ, कन्नड, हिंदी आणि इंग्रजीत त्यांनी सुमारे ६० चित्रपटांचे दिग्दर्शन केले आणि २५ चित्रपटांसाठी पटकथा लिहिल्या. कमल हासनसह अनेक लोकप्रिय चित्रपट त्यांनी दिलेच, पण ‘पुष्पक विमाना’ किंवा ‘पुष्पक’ हा एकही संवाद नसलेला- फक्त पार्श्वसंगीत आणि पार्श्वध्वनींचा वापर करणारा चित्रपट हा त्यांच्या दीर्घ कारकीर्दीचा एक उत्कर्षबिंदू. पण वयाच्या ९५ व्या वर्षी ‘सिंग गीतम’ हा सर्व संवाद गाण्यातच असलेला चित्रपट दूरच्या सेटवर न जाता स्वत:च्या घरात बसून दिग्दर्शित करणे, सचेतीकरण तंत्राचा (ॲनिमेशन) वापर ‘सन ऑफ अल्लादीन’ आणि ‘घटोत्कच’सह अनेक चित्रपटांत करणे व त्यासाठी वयाच्या पंच्याहत्तरीनंतर हे तंत्र शिकणे, भारताचे अखेरचे ‘गव्हर्नर जनरल’ चक्रवर्ती राजगोपालाचारी (राजाजी) यांच्या कथेवर आधारित आणि त्यांच्याच थोरापल्ली या जन्मगावी २२ दिवसांत चित्रण झालेला ‘दिक्कत्र पार्वती’ (१९७४) हा दारूचे दुष्परिणाम सांगणारा तमिळ चित्रपट, ‘फिल्म फायनान्स कॉर्पोरेशन’ची मदत मिळवणारा पहिला दाक्षिणात्य चित्रपट ठरणे- असे आगळे टप्पे त्यांनी गेल्या ६० वर्षांत गाठले होते.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्यांना दोनदा मिळाले- ‘दिक्कत्र पार्वती’ला सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट म्हणून, तर ‘पुष्पक’ला ‘सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट’ म्हणून. यापैकी ‘पार्वती’ हा कमी खर्चातला, सामाजिक संदेश देणारा चित्रपट आपण ‘सत्यजित राय यांच्या ‘पाथेर पांचाली’पासून प्रेरणा घेऊन’ बनवल्याचे राव नेहमी सांगत. प्रत्यक्षात या पार्वती आणि पांचाली यांची तुलना होणार नाही- होऊही नये, कारण राव यांचा पिंड लोकांना सहज भिडेल, चटकन समजेल आणि पाहायला मजा येईल असे मनोरंजक चित्रपट बनवण्याचाच होता. चित्रपटांत गोष्ट महत्त्वाचीच, पण ती कशी सांगितली जाते हेही महत्त्वाचे- याचा संस्कार के. व्ही. रेड्डी (गुणसुंदरी कथा, मायाबाजार, पातालभैरवी आदी चमत्कृतीपूर्ण चित्रपटांचे कर्ते) यांचे १९५६/५७ पासून सहायक असताना राव यांच्यावर झाला.

दशकभराहून अधिक काळ सहायक पटकथाकार आणि सहदिग्दर्शक म्हणून काम केल्यानंतर त्यांनी स्वत: काही करण्याचे ठरवले. त्याआधीपासून हॉलिवूडचे चित्रपट पाहाण्याचा नाद होता, त्यातील तंत्राने दिपून जाण्याची सवयही होती, पण १९५० चे दशक सरताना खराखुरा ‘आंतरराष्ट्रीय’ चित्रपट राव यांनी पाहिला आणि इराणी, जपानी, मेक्सिकन चित्रपटसृष्टीही प्रगत आहे, याचा साक्षात्कार त्यांना झाला. या ‘प्रगत’पणाचे आकर्षण त्यांनी तद्दन करमणूकप्रधान चित्रपट करतानाही जपले, सांभाळले.

सिंगीतम श्रीनिवास राव यांना आदरांजली वाहाताना त्यांच्या अनुभवाचा, विनयशीलतेचा आणि हसतमुख व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख अनेकांनी केला आहेच. पण लोकांना पचेल, रुचेल अशा कलाकृतींतूनही प्रयोग करता येतात, हा मराठीत ‘प्रभात’ने घालून दिलेला वस्तुपाठ त्यांनी जपला, यासाठी ते नेहमीच आठवत राहातील.