कुणाचा विश्वासही आज बसणार नाही; पण अवघ्या ३५- ३६ वर्षांपूर्वी इस्रायली पंतप्रधान आणि लढाऊ पॅलेस्टिनी नेते यांच्यात शांतता चर्चा सुरू झाली होती आणि ती निष्फळ न ठरता, तिचे रूपांतर १९९३ च्या ‘ओस्लो करारा’त झाले होते. त्या चर्चेची सुरुवात होत असताना स्लिमान मन्सूर यांनी एक चित्र रंगवले, ते होते एका पॅलेस्टिनी शिल्पकाराचे. हातांत छिन्नी- हातोडा घेतलेला शिल्पकार पाठमोरा आहे. प्रचंड मोठ्या फत्तरातून शिल्प घडवण्याच्या कामात गर्क आहे. एवढ्या मोठ्या दगडातून काय कोरणार आहे तो?- शिल्प सुमारे ३५ टक्के पूर्ण झालेले दिसते आहे, त्यावरून प्रेक्षकाला उमगते की, प्रचंड मोठ्या दगडातून हा शिल्पकार शांततेचे कबूतर घडवू पाहातो आहे! यित्झाक राबिन आणि शिमॉन पेरेझ हे या चर्चेतले आजी/ माजी इस्रायली पंतप्रधान आणि पॅलेस्टिनी मुक्ती संघटनेचे नेते यासर अराफत या तिघांना १९९३ च्या त्या करारासाठी लगेच १९९४ मध्ये शांततेचे ‘नोबेल’ मिळाले; पण फत्तरातून कबूतर कोरून काढण्याचे काम पूर्ण झालेच नाही, याची साक्ष स्लिमान मन्सूर यांनी १९९० मध्ये रंगवलेले ते चित्र आजही देते. पण त्या शांतता चर्चेवर द्रष्टेपणाने हे भाष्य करणारा चित्रकार आता आपल्यात नाही. जेरुसलेममध्ये २४ ऑगस्टच्या सोमवारी, वयाच्या ७९ व्या वर्षी मन्सूर यांनी अखेरचा श्वास घेतला.

यहुदी समाजाने दुसर्‍या महायुद्धानंतर त्यांची ‘वचनदत्त भूमी’ (प्रॉमिस्ड लॅण्ड) देण्याचा पुकारा दोस्त राष्ट्रांनी केला आणि मोठ्या प्रमाणावर यहुदींनी पॅलेस्टाइनकडे कूच केले. परिणामी अरबांना १९४८ मध्ये आपली घरेदारे सोडून पलायन (नक्बा) करावे लागले. मग १९६७ मध्ये शेजारील अन्य (इजिप्त, जॉर्डन, सिरिया) अरब देशांशी ‘सहा दिवसांचे युद्ध’ जिंकून इस्रायलने वर्चस्व सिद्ध केले, तेव्हाही पॅलेस्टिनी अरबांना स्थलांतर करणे भाग पडले. भूमी, इतिहास यांच्याबद्दलचे इमान आणि अत्याचारांचा संताप अशी दुभंग मनोवस्था अनेक अरबांची होती. याचा परिणाम १९४७ साली जन्मलेल्या आणि जेरुसलेमच्याच (१९०६ पासून कार्यरत) कला महाविद्यालयात शिकलेल्या मन्सूर यांच्या चित्रांवरही होत राहिला. पॅलेस्टिनींचा विद्रोह पाहातच ते वाढले.
‘अख्खे गाव डोईवरल्या गाठोड्यात घेऊन कष्टाने चालणारा पॅलेस्टिनी मजूर’ असे एक चित्र त्यांनी १९७३ मध्ये रंगवले, त्याचे कौतुक ‘युनेस्को’ने केले आणि मन्सूर यांना आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली. तरीही मायदेशातच आणि शांततामय साहचर्याला साथ देत राहणे मन्सूर यांनी पसंत केले. इस्रायलींनी गावोगावी जबरदस्तीने जाऊन पॅलेस्टिनींना हुसकावणे आरंभले, तेव्हा अन्य चौघा चित्रकारांसह त्यांनी स्थापलेल्या ‘न्यू व्हिजन्स’ चित्रसमूहाने १९८७पासून इस्रायली कलासाहित्यावर बहिष्कार घातला.

मन्सूर यांनी चिखल/ पुळण, कॉफी वा तत्सम द्रव्यांचे रंग वापरूनही उत्तम चित्रे केली. आज लंडनचे ब्रिटिश म्युझियम आणि पॅरिसची अरब इ्स्टिटट्यूट इथे त्यांची चित्रे संग्रहित आहेत. अमेरिकी ‘गुगेनहाइम’ संग्रहालयाने अबू धाबीमध्ये शाखा काढायचे ठरवले, तेव्हा त्याही संग्रहात मन्सूर यांचे चित्र गेलेच. सौदी, अमिराती, कुवेत या देशांत गेल्या दशकभरात जी- जी महत्त्वाची कला संग्रहालये सुरू झाली, तिथे मन्सूर यांचे चित्र हवेच, इतकी त्यांची महत्ता मान्य झाली आहे.