फुलांचं गाव, शांतपणे जगणार्यांचं परीकथेतल्यासारखं गाव ही वर्णनं लुब्लियानाला शोभतात; पण स्लोवेनियाची ही राजधानी शिक्षणाचं गाव म्हणवून घेण्यात धन्यता मानते. गावात ठिकठिकाणी अनेकांचे चेहरे पुतळ्यांसारखे कशाकशावर बसवलेले. हे चेहरे १७७५ पासून इथं होऊन गेलेल्या शिक्षकांचे…
सकाळी लुब्लियानात पोहोचलो तेव्हा वातावरण ओलंचिंब होतं. युरोपातला अवकाळी मोठा गोड असतो. उत्साही बनवतो. बारमाही पावसाचं वरदान आहे त्या प्रदेशाला. त्यामुळे सगळं कसं हिरवंगार. धुळीचा लवलेशही नाही. पावसाच्या शिडकाव्यानं कॉफीची इच्छा शिलगवणारा गारवा वातावरणात भिनलेला आणि या सुमुहूर्तावर आम्ही शहरात शिरलो.
लुब्लियाना ही राजधानी. स्लोवेनिया या देशाची. हा देश बोस्नियाप्रमाणे अभागी नाही. चांगला श्रीमंत. त्यामुळे युरोपीय संघाचा सदस्य. त्यामुळे त्याच्या सीमा-प्रवेशावर तपासणी वगैरे काही झाली नाही. युरोपातल्या एका देशातनं दुसर्या युरोपीय देशात असा तो प्रवास. त्याची सुरुवात छानशा पावसानं झाल्यानं शहर निमंत्रण देत होतं… पायीपायी भटकण्याचं. युरोपीय शहरांची ही खासियत. चालणं किती सुंदर, आनंददायी असू शकतं हे त्या शहरांमुळे कळतं. त्यामुळे युरोपच्या प्रत्येक सहलीत अधाशासारखं चालून घेणं अपरिहार्य. असो.
तर गावाच्या मध्यवर्ती चौकात आलो तर समोर नुसता फुलांचा उत्सव. लाल, पिवळी, फ्लुरोसंट जांभळी वाटावीत अशी. मोठमोठे त्यांचे गेंद. चार-चार फुटांच्या दुकानांसमोर चकचकीत ॲल्युमिनियमच्या बादल्यांसारख्या भांड्यात मांडून ठेवलेले. तिथल्या एकाला विचारलं… काय विशेष? तर तो बघायलाच लागला. हा एव्हढा फुलांचा उत्सव का ते कळेना. तसं विचारलं तर तो प्रश्न त्याला कळेना. समजावून विचारल्यावर त्याला उलगडा झाला. त्याच्या म्हणण्याचा अर्थ इतकाच की फुलं मांडण्यासाठी, ती खरेदी करण्यासाठी आमच्याकडे काहीही विशेष वगैरे असावं लागत नाही. स्लोवेनियनांना फुलांचा, फळझाडांचा भारी शौक. समोर जे फुलवाले वाटले होते ते फुलविक्रेते नव्हते. स्थानिक नागरिक होते ते. आपापल्या परसबागेत फुललेली फुलं विकायला आलेले. केवळ हौस. पैसे मिळवणं हा अजिबात उद्देश नाही. त्यामुळे अगदी स्वस्तात ही फुलं विकायला असतात. ज्यांच्या बागेत जी नसतात ती फुलं ते घेऊन जातात आपापल्या घरातल्या फुलदाण्यांसाठी. इतका सोस फुलांचा की सकाळी कार्यालयात जातानाही स्लोवेनियन आपापले गुच्छ घेऊन जातात.
हे फारच भयंकर. खोटं वाटावं इतकं खरं. पण आम्हाला याचं आश्चर्य वाटलं याचं तो सांगणारा होता त्याला आश्चर्य वाटलं. मी तर पटकन विषयच बदलला. आता त्याला काय सांगणार मुंबईत लोकलमधनं उतरल्यावर प्रत्येक जण आपले अवयव हात लावून पहिल्यांदा तपासतो. सगळा देह आलाय ना… एखादा हात वगैरे राहिला तर नाही मागे गर्दीत याची खात्री करून घेतो.असो. पण हे स्लोवेनियन मोठे रसिक. ऑफिसमधनं सरळ घरी येतात. अन्य युरोपीय शहरांतल्या नागरिकांप्रमाणे वाटेत एखाद्या पबबिबमधे रेंगाळत नाहीत. आणि घरी घाईघाईने येऊन करतात काय?
तर आपल्याच अंगणात फुललेली भाजी खुडतात, मागच्या नदीत/डोहात गळ टाकून चार मासे पकडून आणतात आणि असा ताजा ताजा स्वयंपाक करून आजीनं/सासूनं खास बनवून पाठवलेल्या किंवा स्वत:च बनवलेल्या वाइनचे घुटके घेत निवांत जेवतात. ‘‘आमच्यासाठी संध्याकाळचं जेवण फार महत्त्वाचं. आम्ही आमचा भाजीपाला स्वत: पिकवतो…’’, असं तिथल्या यजमानबाईंनी आपल्या अंगणातल्या भाज्यांकडे कौतुकभरल्या नजरेनं पहात मोठ्या अभिमानानं सांगितलं.
शहराच्या मुख्य चौकात फुलांच्या ताटव्यांमागे एक पुतळा. खाली नाव लिहिलेलं फ्रान्स प्रेसेरेन. हा त्यांचा ‘राष्ट्रीय कवी’. खरं तर याच्या कविता रोमँटिक. पण तरी तो स्लोवेनियाचा राष्ट्रीय कवी. गंमत वाटली. आपल्याला राष्ट्रीय पक्षी, प्राणी वगैरे माहिती. राष्ट्रीय कवी म्हणजे फारच झालं. तर त्याच्याच कवितेचं राष्ट्रगीत झालंय तिथे. गंमत अशी की हा पुतळा असा उभा केलाय की त्याच्या नजरेसमोर बरोबर त्याच्या व्यक्त पण अपूर्ण प्रेमातल्या प्रेयसीची खिडकी आहे. खिडकीतनं ती डोकावतीये. असं काही. आणि तरी राष्ट्रीय कवी…!
गावात ठिकठिकाणी अनेकांचे चेहरे पुतळ्यांसारखे कशाकशावर बसवलेले. यजमानीणबाईंना विचारलं हे कोण तर त्यांचा चेहरा उत्साहानं फुलला. पर्यटकांनी असं काही विचारायची सवय नसणार तिला. मग तिनं सगळी गोष्टच सांगितली… ऐकली आणि धन्य धन्य वाटलं.
हे सर्व पुतळे गावात विविध टप्प्यांवर होऊन गेलेल्या विख्यात शिक्षकांचे होते. कोणी गणिताचा. कोणी तत्त्वज्ञानाचा. कोणी भाषा असं काही. एक तर संगीत शिक्षक होता. संगीत विद्यालयासमोरच त्याचा पुतळा. त्याची एक धून तिनं ऐकवली. एकदा असंच एका जर्मन नागरिकांना तिनं ती ऐकवली. ते म्हणाले… ही माहितीये. जर्मनीत खूप लोकप्रिय आहे ही धून. तर ती या लहानशा गावातल्या संगीतप्रेमी शिक्षकाची कलाकृती. तिथून जवळच ऑपेरा हाऊसची सुंदर दगडी इमारत. ही इमारतच जवळपास ६५० वर्षांपूर्वीची आहे. जशीच्या तशी. वर्षाला दीडेकशे संगीतिका इथे तयार होतात. युरोपातले अनेक नावाजलेले संगीतकार, कंडक्टर या संस्थेच्या मांडवाखालनं गेलेले असतात.
पण या गावाला- आणि अर्थातच देशालाही- खरा अभिमान आहे तो त्यांच्या शिक्षणाचा. इंग्लंडात ऑक्सफर्ड, केंब्रिज अनेकदा पाहिलंय. राहिलोय तिथे. पण असा लुब्लियानासारखा शिक्षण संस्थांचा ‘गर्व से कहो…’ अभिमान तिकडेही आढळत नाही. कदाचित आम्ही इतके मोठे आहोत की कसला अभिमान… असा तुच्छतादर्शक भाव असेल तिकडे. पण लुब्लियानात भेटलेला प्रत्येक जण शिक्षणाविषयी बोलतो. युरोपातल्या, आशियातल्या अनेक देशांतले विद्यार्थी इथं फक्त शिक्षणासाठी येतात. या इतकुल्या देशात तीस विद्यापीठं आहेत. आणि त्यातली २० तर सरकारी.
खरं तर आपल्याला विद्यापीठांचं काय अप्रूप? आपल्याकडच्या एखाद्या गल्लीतही यापेक्षा अधिक संख्येनं विद्यापीठं असतील आणि डझनांनी शिक्षण सम्राटही सापडतील. स्लोवेनियात शिक्षण सम्राटच नाहीत. या तिसातली २० विद्यापीठं सरकारी. आणि गहिवरूनच येईल असा भाग म्हणजे शिक्षणाचा खर्च सरकार करतं. प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी तर सरकारचीच. ही रीत कधीपासूनची? तर इ.स. १७७५ पासूनची. त्यावेळी स्लोवेनिया ऑ्ट्रिरयन साम्राज्याचा भाग होता. तेव्हाची ऑ्ट्रिरयाची सम्राज्ञी मारिया थेरेसा हिनं फर्मान काढलं आणि प्राथमिक शिक्षण प्रत्येकासाठी अत्यावश्यक – आणि मोफतही- झालं.( या मारियाची मुलगी म्हणजे नंतर (कु)विख्यात मेरी आन्त्वानेत. फ्रान्सची राणी. हिच्याविषयी ‘अन्यथा’त ‘फ्रान्सचे धडे’ मालिकेत विस्तृतपणे लिहिलंय. असो.) तर ही परंपरा तेव्हापासनं सुरू आहे. मारियानं शालेय शिक्षण सक्तीचं केलं आणि त्याआधी एक वर्ष लुब्लियानातलं भव्य ग्रंथालय उभारलं. आजही ते तसंच दिमाखात उभं आहे. आणि मुख्य म्हणजे त्याला निधीची टंचाई अजिबात भेडसावत नाहीये.
पर्यटन उद्योजकांच्या भाषेत लुब्लियाना या शहराचं वर्णन ‘परीकथेतलं गाव’ असं केलं जातं. खरं तर युरोपात असं वर्णन फिट्ट बसेल अशी अनेक गावं आहेत. तरीही लुब्लियानाचं असं कौतुक केलं जातं. त्यातलं आणखी एक कारण म्हणजे हे शहर चालणार्यांचं आहे. सगळं असं निवांतपणे हिंडत पाहावं असं. तशीही शहरं खूप आहेत युरोपात. त्यामुळे अन्य अशा शहरांप्रमाणे लुब्लियानाही आवडलं. खूप आवडलं.
पण भावलं ते त्याच्या सौंदर्यासाठी नाही. तर शिक्षणाच्या आणि त्याहीपेक्षा अधिक शिक्षकांच्या कौतुकासाठी. ज्यांचे पुतळे आहेत ते कोणी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक वगैरे नाहीत. स्थानिकच आहेत सगळे. पण हे सगळे चांगले गुरुजी होते म्हणून त्यांच्याविषयी ही कृतज्ञता.
स्लोवेनियन भाषेत ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु:…’ वगैरे आहे की नाही माहीत. नसेल. पण शिक्षण आणि गुरुजी यांच्याविषयीचा आदर मात्र वातावरणात भरून आहे. त्या सगळ्या शिक्षण, संगीत संस्था पाहताना कुमारांचं एक भजन मनात वाजायला लागलं…
गुरुजी जहाँ बैठू वहाँ छाया रे…
girish.kuber@expressindia.com
@girishkuber
