तसं पाहिलं, तर स्लोअर शहाणेला जुनंच हिंदी चित्रपटसंगीत आवडायचं. गाडीच्या आरशातून मागे पाहताना आठवणारी गाणीही जुनीच असायची. जुनी म्हणजे ६०, ७० च्या दशकातली. त्यानं याही पूर्वीची गाणी ऐकून पाहिली नव्हती असं नाही. पण, त्यातलं प्रत्येकच आवडलं, असं झालं नाही. नव्वदच्या दशकातील एकूणच तारुण्याला स्मरणरंजनाचा असा भाबडा वारसा ‘संस्कार’ म्हणून मिळाला होता. ‘आमच्या वेळी असं होतं,’ असं म्हणणारे स्लोअरच्या आधीच्या पिढीतले बरेच जण नव्या काळाला सरावले नसल्याने ‘आत्ता काय आहे,’ अशी वर्तमानकालीन चर्चा फार होत नसे. याचा अर्थ स्लोअर शहाणेला नव्वदनंतरच्या संगीताबद्दल जिव्हाळाच नव्हता का? तर, असंही ठोसपणे म्हणता येणार नाही. पण, क्षितिजावर सगळे बदलांचेच ढग आणि बदलांचेच वारे दिसत असताना, बदल करणं, बदल स्वीकारणं आणि बदल घडवणं यात ताळमेळ नसलेलं, असं नव्वदचं दशक असल्याने स्लोअरलाही पटकन नव्यातील काय स्वीकारायचं, हे कळेनासं होई.
मध्यमवर्गाला आवडेलसं आणि सहज नातं सांगता येईलसं चित्रपट संगीताचंच उदाहरण घ्यायचं, तर नवे पार्श्वगायक किशोरकुमार किंवा महंमद रफीसारखे किंवा लता मंगेशकर वा आशा भोसले यांच्यासारखे किती गातात, यावरच त्यांचं मूल्यमापन होत असल्याने आवाजांच्या ‘प्रति’ तयार होण्याचा तो काळ होता. नवा आवाज स्वीकारायला वेळ गेला किंबहुना अनेक नवे आवाज नाकारलेच गेले. एकूणच बहुतांश क्षेत्रांत मानदंड प्रस्थापित झालेले असल्याने पूर्वसुरींच्या ओझ्यालाच प्राक्तन समजलं जाऊ लागलं. स्लोअरच्या आयुष्यातही त्यामुळे ‘झपूर्झा’ऐवजी ‘जपून जा’ क्षणच अधिक येत गेले. यातली गंमत अशी, की ज्यांनी हे ओझं नाकारून किंवा नाकारू पाहून ‘बदल करणं’ या अवस्थेत जाऊ पाहिलं, ते बाह्य स्वरूपाचे बदल करत आतून तसेच राहिले आणि त्या आतल्यासकट अमेरिकेत गेले. ‘बदल स्वीकारणं’ या अवस्थेपर्यंत गेलेले बराच काळ बदलांचा अभ्यासच करत राहिले आणि जुनं सगळंच नाकारू लागले. तर, ‘बदल घडवणं’ या अवस्थेप्रति पोहोचलेले मात्र जुन्यातलं चांगलं स्वीकारत, नवे मानदंड प्रस्थापित करू पाहू लागले. तिकडे क्रिकेटमध्ये मैदानावर वा बाहेर शालीनता न सोडताही प्रतिस्पर्ध्याला प्रत्येक वेळी चारी मुंड्या चीत करण्यासाठी सरसावलेला दिसणारा सचिन तेंडुलकर अशा सगळ्यांसाठी ‘नायक’ बनला. स्लोअरला मात्र आपण कोणत्या अवस्थेत आहोत, याचं आकलन बराच काळ झालंच नाही. बदलाची प्रत्येक अवस्था उमजूनही या अवस्थांच्या ‘बदली’ प्रतिमांतच तो बराच काळ गुंतून पडला.
या गुंतून पडण्यातून स्लोअरच्या आयुष्यात अनेक गमतीजमती घडत. कॉलेज दिवसांत रेडिओवर अखंड गाणी ऐकण्यापासून दूरदर्शनवर ‘छायागीत’, ‘चित्रहार’ आणि ‘रंगोली’ची वाट बघण्यापर्यंतचा सगळा ‘वेडे’पणा स्लोअर खूप मनापासून करत असे. आवडत्या गाण्यांच्या कॅसेट तयार करून त्या टेपरेकॉर्डरवर रिवाइंड-फॉरवर्ड करण्याचा खेळही यातूनच जन्माला आला होता. त्यातून त्या कॅसेट अनेकदा अडकायच्या, अडखळायच्या. अशा वेळी मग कॅसेटच्या मध्ये पेन्सिल वा पेन घालून सुटलेल्या फिती परत जागेवर आणणं हा खेळ मनोरंजक, उद्बोधक आणि एकाग्रता वाढविण्याचा आहे, अशीच स्वत:ची समजूत स्लोअरने घालून घेतली होती. नेणिवेत ही समजूत पक्की करून टेकडीवर गेल्यावर त्याने मनातल्या मनात ही गाणी अशीच रिवाइंड-फॉरवर्ड करून पाहिली होती. त्यातून उतरणारे अर्थ सभोवतालात पसरून पाहिले, की वास्तव सुंदर दिसू लागे, असंही त्याला वाटू लागलं होतं.
एकदा टेकडीवर हाच खेळ खेळताना स्लोअरने तिथल्या धुळीत काही गिरवलं. समोर मावळता सूर्य आणि इकडे स्लोअर टेकडीच्या माथ्यावरल्या एका दगडावर बसून खाली पसरलेल्या धुळीच्या कॅनव्हासवर काढत असलेली रेखाटनं, असं साधारण ते चित्र होतं. टेकडीवरच्या या जागी येऊन बसणारा तो एकटाच होता. बूट घालून फक्त परिचित पाउलवाटांवरून रोज टेकडी पालथी घालण्याचा ‘मॉर्निंग’ वा ‘इव्हनिंग वॉक’ अजून रोजचा व्यायामप्रकार या सदरात मोडू लागला नव्हता, तेव्हाची ही गोष्ट. टेकडीवर जाण्याचा रस्ताही त्यामुळे वाटेत येतील, ती झाडे कापून सरळसोट झालेला नव्हता, तर वाटेतल्या झाडांना वळसे घालत नागमोडी वळणांनी वर जाणारा होता. अशा अनेक वळणांपैकी एक वाट स्लोअर शहाणेची होती, ज्या वाटेवरून तो टेकडीच्या माथ्यावर पोहोचून तेथील एका स्वागतशील दगडावर बसत असे. त्या दिवशी त्याने ‘ती’ चित्रकारी केली आणि त्याला उमजलं, की हीच आपल्या जाणिवांची धुळाक्षरं. यात जे दिसतं आहे, ती धूळ नसून आपण आहोत, टेकडीच्या माथ्यावर येऊनही जमिनीला पूर्ण चिकटलेले. सूर्यप्रकाशाला किंवा ढगांतून पडणाऱ्या पाण्याला आसावलेले फोफावणारे झाड आपण होऊ शकत नाही, याचा प्रत्यय स्लोअरला बहुधा याच जागी येणार होता. त्याने सरळ तेथील धूळ उचलली आणि खिशात भरून घरी आणली. घरी आल्यावर टेपरेकॉर्डरवर गाणी लावली. अनेक पिढ्यांना तरुण होतानाच्या उदास क्षणी आवडणारं गाणं लागलं, ‘कहीं दूर जब दिन ढल जायें…’ त्यात जेव्हा ती शेवटच्या कडव्यातली ओळ आली, ‘ये मेरे सपनें यही तो हैं अपने, मुझसे जुदा ना होंगे इनके ये सायें,’ तेव्हा स्लोअरच्या पटकन लक्षात आलं, की त्याने खिशात भरून जे आणलं ती धूळ नव्हती, तर त्यावर त्याने काढलेल्या चित्रांच्या त्या सावल्या होत्या…
स्लोअर नोकरीला लागून काही काळ गेल्यानंतरही स्लोअरच्या मनातून ही आठवण पुसली गेली नाही. आताशा नागमोडी वाटाच न राहिलेल्या टेकडीवर सरळसोट रस्त्याने चढतानाही त्याला ही आठवण हटकून यायचीच. लाजणारे मोर धीट झालेले त्याने अशाच काही प्रसंगांवेळी शांतपणे टेकडीचा सरळसोट रस्ता ओलांडून बाजूच्या झाडीत शिरताना पाहिले होते. इकडे स्लोअरच्याही कॅसेट रद्दीत जाऊन त्याला आवडणारी अनेक जुनी गाणी आता तो मोबाइलवरच्या अॅप नावाच्या अद्भुत पोतड्यांतून काढून कानात साठवत होता. हे करताना त्याला एक बरं वाटत असे, की आपल्या मेंदूला अजून विशिष्ट जीबी साठवणुकीची मर्यादा नसल्याने कितीही ओतलं तरी मन रितं ठेवण्याची तजवीज आपोआप होते. अस्वस्थतेला असं हुरहुरीचं कोंदण लागलं, की धुळीतील चित्रं अधिक देखणी दिसतात, याचा साक्षात्कार सूर्यास्त दिशेकडे पाहताना झाल्याचं तेव्हा स्लोअरला हटकून स्मरत असे.
एकदा मात्र पुन्हा गंमत झाली. इअरफोन नावाचं यंत्र कानात अडकवून स्लोअर टेकडीवर चालता झाला होता, तेव्हा एकविसाव्या शतकाचं दुसरं दशक सुरू असूनही त्याने चालता चालता १९५० च्या दशकातली गाणी त्या इअरफोनमधून ऐकायचं ठरवलं होतं. टेकडीच्या माथ्यावर पोहोचेपर्यंत त्याचं आजबाजूला लक्षच नव्हतं. तो गाण्यांमध्ये गुंतून पडला होता. वर पोहोचला, तेव्हा आजूबाजूला फक्त क्षितिज दिसेल, असं वाटत असताना त्याचा एका नजरेतच भ्रमनिरास झाला. टेकडीच्या त्या बाजूला एक उंच इमारत वर उगवून आली होती. आपण बरेच दिवस काय, बरेच महिने टेकडीवर आलोच नाही, हे स्लोअरला लगेचच जाणवलं. त्याचं मन खट्टू झालं. क्षितिजाऐवजी इमारत दिसली म्हणून किंवा बरेच दिवसांत आलो नाही म्हणून नव्हे, तर आपल्याला बदल कळलाच नाही, याची जाणीव होऊन. मुळात बदलच कळला नाही, तर तो करणं, स्वीकारणं किंवा घडवणं यातलं काहीच करता येत नाही, याचं आकलन तोवर स्लोअरला झालं होतं. हताशपणे मागे फिरून तो परतू लागला, तेव्हा इमारतीवरचं नाव पाहून पुन्हा क्षणभर थबकला. ‘पैल दर्शन’. इकडे स्लोअरच्या इअरफोनमध्ये सुरू असलेल्या ५०च्या दशकातल्या गाण्यात ओळ आली होती, ‘दुनिया वहीं दुनियावाले वहीं, कोई क्या जाने किसका जहाँ लुट गया…’ स्लोअर झपझप पावलं टाकत थेट आपल्या ५० वर्षं जुन्या बंगल्यातल्या भाड्याच्या घराच्या एकमार्गी जिन्यापाशी येऊन धापा टाकत थांबला. त्याला आता जुनं नवं, नवं जुनं यातला काहीच ताळमेळ लागत नव्हता…