‘चाळीस हजारांना रोजगाराची संधी देणारे डेटा सेंटर व्हायलाच हवे’, ‘या सेंटरमुळे आपलीच माहिती आपल्याच देशात साठवून ठेवण्याची सोय होणार’, ‘१७ हजार कोटींच्या या सेंटरमुळे स्थानिक रोजगाराला चालना मिळणार’ सोलापुरात डेटा सेंटरच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चातील कार्यकर्त्यांची ही विधाने ऐकून पक्षाचे समाजमाध्यम प्रमुख चक्रावले. असे लंगडे समर्थन होत राहिले तर विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत मिळेल व पक्ष तसेच सरकारची बाजू आणखी कमकुवत होईल हे लक्षात येताच त्यांनी तातडीने सोलापूरला जाण्याचा निर्णय घेतला. दुसर्‍याच दिवशी शहर प्रमुखाकडून एक संदेश सर्वत्र गेला. ‘डेटा सेंटरविषयी तातडीचे ‘मोर्चापूर्व प्रशिक्षण’ आयोजित करण्यात आले असून त्याला सर्वांनी जातीने हजर राहावे.’

प्रचंड गर्दी बघून सुखावलेले प्रमुख बोलू लागले. ‘कोणत्याही स्थितीत डेटा सेंटर या शहरात व्हायला हवे ही पक्षाची भूमिका आहे. त्याचे समर्थन करताना तुमची उडणारी तारांबळ बघून मला इथे यावे लागले. सत्ता असो वा नसो, काँग्रेसविरुद्ध मोर्चे काढण्याची आपल्याला आता सवय झाली आहे. मोर्चात सामील झाले की राहुलला पप्पू म्हणायचे, काँग्रेसला देशविरोधी, अराजकवादी, दिमागी नक्षल ठरवण्यातही तुम्ही तरबेज झाले आहात. त्यामुळे त्यासाठी वेगळ्या प्रशिक्षणाची गरज भासली नाही. मात्र हे डेटा सेंटरचे प्रकरण जरा वेगळे. म्हणूनच मी युक्तीच्या चार गोष्टी सांगणार आहे. या सेंटरमुळे रोजगारनिर्मिती होत नाही व पाणी जास्त लागते हा विरोधकांचा आक्षेप खोडून काढायचा आहे. मोर्चात घोषणा देताना वा ‘चाय बिस्कूट’वाल्या पत्रकारांना प्रतिक्रिया देताना रोजगार मिळेल असे अजिबात म्हणू नका. यातून प्रत्यक्ष रोजगार मिळणार नसला तरी शासनाला भरपूर महसूल मिळणार आहे. या महसुलातला ९० टक्के वाटा सोलापूरच्या विकासासाठी, त्यातून रोजगारनिर्मितीसाठी खर्च केला जाईल असे बिनधास्त सांगा. यासाठी तैवानचे उदाहरण द्या. डेटा सेंटरमध्ये केवळ एक सुरक्षारक्षक असेल, कुणीही कर्मचारी असणार नाही हे अजिबात सांगायचे नाही.’ यावर एक उठून उभा राहत म्हणाला, ‘भविष्यात महसुलात वाटा मिळाला नाही आणि विरोधकांनी आम्हाला कोंडीत पकडले तर,’ यावर प्रमुख संतापलेच. ‘या हुशार प्राण्याला आधी बाहेर काढा. मोर्चात आपल्याला गर्दी हवी, दर्दी नकोत.’ तो बाहेर गेल्यावर ते बोलू लागले.

‘सोलापूरच्या पाणीटंचाईची मला कल्पना आहे. तुमचे लक्ष कायम उजनीकडे असते. डेटा सेंटरला लागणारे भरपूर पाणी या धरणातून घेतले जाणार नाही असे नि:संकोचपणे सांगा. या सेंटरला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाईल व ते टँकर बेरोजगारांना कर्ज देऊन विकत घेतलेले असतील. यातून हजारो तरुणांना रोजगार मिळेल असा युक्तिवाद करा.’ हे ऐकून दुसरा उभा राहत म्हणाला, ‘पण टँकरमध्ये पाणी आणायचे कुठून’ ऐकताच प्रमुख खवळले व त्यालाही बाहेर काढले गेले. प्रशिक्षण संपताच दुसर्‍या दिवशी समर्थन मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. प्रशिक्षित कार्यकर्ते प्रतिक्रिया देण्यासाठी ‘चाय बिस्कूट’वाल्यांना शोधू लागले पण कुणीच दिसेना! सारे विरोधी मोर्चाकडे गेलेले. नंतर समाजमाध्यमावर आधी दिलेल्या चुकीच्या प्रतिक्रिया व विरोधकांनी त्याला दिलेले सडेतोड उत्तर सर्वत्र फिरू लागले. ते बघून सोलापूरवारी करणार्‍या प्रमुखांनी कपाळावर हात मारून घेतला.