फक्त चंद्रावर किंवा फक्त सूर्यावर आधारित कालगणना शक्य आहे. पण शालिवाहन शककर्त्यांनी चंद्र-सूर्याच्या स्थानाच्या फरकावर आधारित ‘तिथी’ आणि बेरजेवर आधारित ‘योग’ अशा दोन संकल्पना विकसित केल्या. कालगणनेतली ही प्रगल्भता अचंबित करणारी आहे.
पृथ्वी स्वत:भोवती फिरता-फिरता सूर्याभोवती फिरते आणि चंद्र स्वत:भोवती फिरता-फिरता पृथ्वीभोवती, आणि म्हणून पर्यायाने, सूर्याभोवती फिरतो या दोन खगोलीय घटनांवर संपूर्ण काळाचं गणित तोललेलं आहे. शालिवाहन शक पंचांगकर्त्यांनी या गोष्टींचा विविध प्रकारे आणि खुबीने उपयोग करून घेतला आहे.

त्यातला एक भाग तर आपण पाहिलाच – ‘तिथी’ ही संकल्पना. चंद्र आणि सूर्य यांच्या स्थितींमधल्या फरकावर आधारित आहे ही संकल्पना. फरक म्हणजे वजाबाकी. पण जर दोन संख्यांची वजाबाकी करता येत असेल तर त्यांची बेरीजही करता येते. मग यांच्या स्थितींची बेरीज ‘काळाचे गणित’ सोडवण्याच्या दृष्टीने वापरली आहे का? नि:संशय हो! हे अतिशय रंजक आहे. थोडं क्लिष्ट आहे, पण आपण सोपं करू शक्य तितकं.

‘योग’ हा शब्द आपल्या चांगलाच परिचयाचा आहे. पण या शब्दाचा अर्थ काय? ‘योग’ म्हणजे जोडणे, सांधणे. योगासनांमध्येदेखील जिवाशिवाचं संमीलन या अर्थानेच ‘योग’ हा शब्द वापरला आहे.

पंचांगकर्त्यांनीदेखील सूर्याची स्थिती आणि चंद्राची स्थिती यांना एकत्र करून जे एकक तयार होतं त्यासाठी ‘योग’ हाच शब्द वापरला आहे. ‘काळाचे गणित’ सोडवताना प्रत्येक गोष्ट किती विचारपूर्वक केली आहे पाहा. असो.

हा ‘योग’ समजायचा तर त्यासाठी पुन्हा एकदा सूर्य-चंद्राचं भ्रमण कसं होतं ते पाहावं लागणार. तेव्हा, थोडं जुन्या संकल्पनांचं पुनरावलोकन करू. पृथ्वीवरून पाहिलं असता सूर्य, चंद्र एका विशिष्ट मार्गावरून भ्रमण करतात असं दिसतं. या मार्गाला ‘क्रांतिवृत्त’ असं म्हणतात. या क्रांतिवृत्तावर सूर्याचं आणि चंद्राचं स्थान सांगायचं तर त्यासाठी काही तरी संदर्भ लागणार. पंचांगकर्त्यांनी त्यासाठी नक्षत्रांचा आधार घेतला. कोणत्या नक्षत्राच्या पार्श्वभूमीवर सूर्य-चंद्र दिसत आहेत यांवरून त्यांची नेमकी स्थिती निश्चित करता येते.

आता पुढचा मुद्दा. सर्वच्या सर्व २७ नक्षत्रांतून भ्रमण करायला सूर्याला सुमारे ३६५ दिवस लागतात. चंद्र हेच काम सुमारे २७ दिवसांत करतो. आता या क्रांतिवृत्तावरचा एखादा बिंदू संदर्भबिंदू म्हणून घेऊ. त्या बिंदूपासून सूर्याचं अंतर सांगणं शक्य आहे. त्या बिंदूपासून चंद्राचं अंतर सांगणंही शक्य आहे. हे अंतर अर्थातच, कोनीय असेल, त्यामुळे अमुक इतके अंश असं असेल. सोबतची आकृती पाहा म्हणजे मुद्दा स्पष्ट होईल.

संदर्भबिंदूपासून सूर्य ४५ अंश अंतरावर आहे तर चंद्र १४५ अंश अंतरावर. या दोन्ही अंतरांची बेरीज होते ४५अंश + १४५अंश = १९०अंश. ही बेरीज कमीत कमी किती होऊ शकते? ० अंश – जेव्हा चंद्र आणि सूर्य दोन्ही संदर्भबिंदूपाशीच असतील. ही बेरीज वाढता वाढता ३६०अंशांपर्यंत पोहोचली की पुन्हा शून्यापासून गणना चालू करायची. हे थोडंसं घड्याळासारखं आहे. तिथे नाही का, बारा वाजले की आपण पुन्हा एकपासून मोजू लागतो, तसंच काहीसं.

तेव्हा या पद्धतीने मोजलं तर ही बेरीज ३६०अंशाच्या वर कधीच जाणार नाही. या ३६०अंशाचे २७ समान भाग करायचे. त्यातला प्रत्येक भाग म्हणजे एक ‘योग’! तेव्हा, असे एकूण २७ योग आहेत. आणि ते चक्रनेमिक्रमाने पुन:पुन्हा येत राहतात. विष्कंभ, प्रीती, आयुष्मान, सौभाग्य, शोभन, अतिगंड, सुकर्म, धृति, शूल, गंड, वृद्धी, धृव, व्याघात, हर्षण, वज्र, सिद्धी, व्यतीपात, वरियान, परिघ, शिव, सिद्ध, साध्य, शुभ, शुक्ल, ब्रह्म, इंद्र, वैधृति ही त्या योगांची नावं.

पुढचा मुद्दा. नक्षत्रं २७. ती पार करायला चंद्राला सुमारे २७ दिवस लागतात. योगही २७! त्यांची एक मालिका पूर्ण व्हायला किती दिवस लागतात? २५ ते २६ दिवस. का बरं? योगांची मालिका पूर्ण होण्यासाठी लागणारा काळ चंद्राला क्रांतिवृत्ताची एक प्रदक्षिणा पूर्ण करायला लागणाऱ्या वेळापेक्षा काहीसा कमी का असतो? कारण योगाचं चक्र केवळ चंद्रभ्रमणावर अवलंबूवन नाही. ते चंद्र आणि सूर्य यांच्या भ्रमणाच्या बेरजेवर अवलंबून आहे म्हणून! या फरकाचं कारण सूर्याची गती हे आहे.

तिथी पाहिली, करण पाहिलं, योग पाहिला. म्हणजे पंचागाची तीन अंगं पाहून झाली. उरलेली दोन अंगं – वार आणि नक्षत्र यांच्याविषयीचा ऊहापोह आणि या भन्नाट पुस्तकाविषयीची अधिक माहिती पुढच्या लेखात.

आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा. ‘काळाचे गणित’ समजून घेण्यासाठी आपण हा सगळा खटाटोप करतो आहोत. कारण ‘काळाचे गणित’ समजून घ्यायचं तर काळाचे वेगवेगळे भाग कसे पाडले आहेत ते पाहिलं पाहिजे. आणि आपण नेमकं तेच करतो आहोत. फलज्योतिषाच्या दृष्टिकोनातून कोणतंही भाष्य या लेखात केलेलं नाही.

@KalacheGanit
kalache.ganit @gmail.com