‘वांगचुक रुग्णालयात; उपोषण स्थळावरून बळजबरीने ताब्यात’ हे वृत्त (लोकसता – १९जुलै) वाचून, या पोलिसी कृतीचा, त्यामागील वृत्तीचा संताप आला. आंदोलनात समजा दंगल, हिंसाचार, दगडफेक असे गैरप्रकार घडले असते, तर कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आंदोलनाच्या नेत्यांना तसेच समर्थकांना बळजबरीने ताब्यात घेणे समजू शकते. परंतु तसे काहीही ठोस कारण नसताना, उपचाराच्या नावाखाली रुग्णालयात नेणे व पर्यायाने त्यांचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करणे, हे सरकारसाठी शोभादायक नाही. ही तर पोलीस तसेच सरकारची दडपशाही झाली. याउलट सरकारला लाज वाटली पाहिजे. वांगचुक हे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे. अशा माणसाच्या जिवाची सरकारला काळजीच नाही.ती असती तर, मंत्रिमंडळातील एका तरी नेत्याने त्यांना भेटून, त्यांच्याशी प्रेमाने बोलून, त्यांना काहीतरी ठोस आश्वासन देऊन, उपोषण मागे घेण्यास सांगितले असते. परंतु सत्ताधार्यांना तर वेगळ्याच गोष्टीत रस दिसतो : पक्षांतर्गत फोडाफोडी करून कोणाला किती पदे मिळतील व आपण कसे सार्वभौम राजे आहोत, हे जगाला दाखवून देण्यात! सरकारने हे गलिच्छ राजकारण बंद करावे.
गुरुनाथ वसंत मराठे, बोरिवली पूर्व (मुंबई)
उपोषणाने सरकारवर दडपण आणू नये!
आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी अनेक मार्गापैकी उपोषण हाही मार्ग अनेकदा आंदोलनकर्ते अनुसरतात! ब्रिटिश काळात सत्ताधारी परकीय होते; तेव्हा पुढारी, देशातील प्रभावशाली व्यक्ती या मार्गाचा अवलंब करीत व सरकार अडचणीत येऊ नये म्हणून मग त्या व्यक्तीशी, गटाशी सरकारी प्रतिनिधी चर्चा करीत व तात्पुरता प्रश्न निकाली काढला जाई. आता आपले राज्य आहे, सरकार आपण निवडून दिलेले आहे, त्यामुळे उपोषण कोणाविरुद्ध कोण करीत आहे, हेही महत्त्वाचे आहे! दडपण आणून उत्तर कोणी द्यायचे? सरकार ही एक यंत्रणा आहे. व्यक्ती नव्हे! त्यामुळे अन्य रास्त मार्गाने प्रश्न सोडविणे राज मार्ग आहे. त्यामुळे उपोषणास (निदान प्राणांतिक उपोषणास तरी) कायद्याने बंदी घालावी असे माझे मत आहे.
राहता राहिला विषय मंत्र्यांचा राजीनामा, पण तो विषय /धोरण ती व्यक्ती ठरवत नसते. ते शासनाने ठरवलेले असते! मंत्री त्या खात्याचा प्रतिनिधी म्हणून काम करतो. तेव्हा त्याचा राजीनामा मागून मूळ प्रश्न कसा सुटेल? उलट राजीनामा देऊन ती व्यक्ती नामानिराळी होईल त्याचे काय? हाही विचार करणे गरजेचे आहे.
दिगंबर घैसास, नाचणे (रत्नागिरी)
न्यायालयाआडून राज्यातही दडपशाही
सत्तेचा किंवा अधिकाराचा गैरवापर करून लोकांचे हक्क डावलणे, अन्याय करणे किंवा बळाचा वापर करून आवाज दाबून टाकणे म्हणजे सरकारने चालवलेली दडपशाही. राज्यातही शिक्षकांचे आझाद मैदानावरील आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला. शाळा बंद ठेवल्यास पगार कपातीचा शिक्षण विभागाने इशारा दिला आहे. सरकारच्या विरोधात आवाज केल्यास तो ‘देशद्रोह’ होतो. आंदोलन करणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याने शांततापूर्ण मार्गाने आणि सार्वजनिक सुरक्षिततेला बाधा न पोहोचवता निषेध नोंदवणे गुन्हा ठरत नाही. सरकार केवळ ‘आंदोलकांची गैरसोय होत आहे’ या सबबीवर दडपशाही करू शकत नाही. लोकशाहीत दडपशाहीचा वापर करुन आवाज दाबून टाकणे हा उपाय न ठरता अपाय ठरणार आहे. लोकशाहीचा गळा न्यायालयाच्या निर्देशाआडून निर्लज्जपणे आणि बळाचा वापर करून घोटला जात आहे. लोकशाहीत आंदोलने शांततेत हाताळली जावीत ही अपेक्षा कोणत्याही काळात रास्त आहे.
विवेक तवटे, कळवा (ठाणे)
स्वातंत्र्य धोक्यात येण्याची भीती
चिन्मय गवाणकर यांचा ‘टोपीवरचे कॅमेरे, तुमच्या घराचे रेकॉर्डिंग आणि रोबोंचे प्रशिक्षण’ हा लेख (रविवार विशेष- १९ जुलै) खासगीपणाची किंमत आणि विदा (डेटा) सुरक्षा या मुद्द्यांवर नवा प्रकाश पाडतो. न्या. के. एस पुट्टास्वामी वि. भारत सरकार या २०१७ सालच्या खटल्याने खासगी गोपनीयता मूलभूत अधिकाराच्या कक्षेत आणूनदेखील आजही भारतीयांच्या गोपनीयतेला संरक्षण मिळालेले नाही. कोणीही कोणाचा व्हीडिओ बनवून समाजमाध्यमांवर टाकतो. ज्यांचा व्हीडिओ समाजमाध्यमांवर जात असतो त्यातील बहुतांश लोकांना त्यांच्या खासगीपणाच्या अधिकारांची जाणीवही नसते. आंतरजालावर जाणार्या आपल्या विदेचे काय होत असते याची त्यांना सोयरसुतक नसते. ही अतिशय गंभीर बाब आहे. कोणाही व्यक्तीच्या संमतीशिवाय त्याचे फोटो आणि चित्रफीत विशेषत: समाजमाध्यमांचा वापर करून आंतरजालावर टाकली जाते, त्याच्या खासगीपणाच्या अधिकारांचे काय? सामान्य माणसाने जर याची तक्रार फेसबुकादींकडे केली तर, त्यांच्या पॉलिसीनुसार हे आक्षेपार्ह नाही असे उत्तर येते. हे असे होते कारण भारतात कायदे खासगीपणा संरक्षित करण्यास पुरेसे कठोर नाहीत आणि नागरिकही याबाबत जागरूक नाही. जणू, खासगीपणा वगैरे श्रीमंतांच्या गोष्टी आहेत. आता तरी सर्वांनीच खासगी गोपनीयतेच्या अधिकारांविषयी सजग होणे ही काळाची गरज आहे. अन्यथा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात नागरिकांचे स्वातंत्र्य धोक्यात येण्याची भीती कायम राहील.
जयदीप भोसले, सातारा</strong>
भाडेवाढीपेक्षा, भ्रष्टाचार थांबवा…
एसटीची ‘हंगामी’ असणारी १३.५६ टक्के प्रवासी भाडेवाढ १७ आणि १८ जुलैच्या मध्यरात्रीपासून पुढे कायम करण्यात आली (बातमी : लोकसत्ता- १८ जुलै) आणि सर्वसामान्य प्रवाशांचे कंबरडे खरोखर मोडले. एसटीचा तोटा कमी करण्यासाठी भाडेवाढ हा पर्याय असू शकत नाही. एसटी ही प्रवाशांना सुरक्षित आणि किफायतशीर दरात दिलेली राजमान्य सेवा आहे.अजूनही ग्रामीण भागातीलच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राची ती जीवनधारा आहे. नफा कमवण्याचे ते साधन नव्हे किंवा तो धंदा नव्हे.
तिकीट दर कसले वाढवता, गाड्यांची आसनक्षमता वाढवून तिकिटाचे दर निम्मे करावेत नाहीतरी प्रवाशांपैकी ४० ते ४२ प्रकारच्या घटकांना तिकीट दरात सवलत दिलेली आहेच, जशी त्याची १०० टक्के प्रतिपूर्ती शासनाकडून केली जाते तशीच तिकीट दर कमी करून होणार्या तोट्याची प्रतिपूर्ती सरकारने करावी. तर दुरावलेला सामान्य प्रवासी पुन्हा एसटीकडे वळेल.
अभ्यासपूर्ण नियोजन, पूर्ण स्वायत्तता असल्यास आणि राजकीय हस्तक्षेप, अंतर्गत भ्रष्टाचार बंद केल्यास एसटी पुन्हा रस्त्यावर रुबाबात धावेल… त्यासाठी एसटीच्या मोक्याच्या जागा विकणे किंवा भाडेवाढ करणे हा पर्याय नाही.
रविकिरण रघुनाथ शेरेकर, (निवृत्त आगार व्यवस्थापक)
विद्यार्थी आंदोलनाच्या ताकदीचा काळ!
‘ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन’ हे वृत्त (लोकसत्ता- १९ जुलै) वाचले आणि त्यांनी मराठवाड्यातील दुष्काळ व त्यानंतर १९७३-७४ मध्ये सुरू झालेल्या मराठवाडा विकास आंदोलनामध्ये दिलेले योगदान आठवले. तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाच्या एका कुलगुरूंच्या (आर. पी. नाथ) गैरवर्तनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या आंदोलनामुळे तत्कालीन मराठवाड्यातील पाचही जिल्ह्यत ‘विद्यार्थी कृती समिती’ स्थापन झाल्या होत्या. पुढे याचेच रूपांतर ‘मराठवाडा विकास आंदोलना’त झाले. या आंदोलनात डॉ कुमार सप्तर्षी यांनी युवक क्रांती दलामार्फत सक्रिय योगदान दिले. त्यांच्याबरोबर डॉ. भालचंद्र कांगो, नरेंद्र जाधव, विजय गव्हाणे यांसारखे आताचे नामवंतही होते. शेवटी शेवटी बीड जिल्ह्यत बीडमध्ये निघालेल्या विद्यार्थ्यांच्या एका मोर्चात लाठीहल्ला झाला आणि अहिंसक मार्गाने जाणार्या या आंदोलनास हिंसेचे गालबोट लागले. मात्र सरतेशेवटी याच आंदोलनामुळे पैठण येथे जायकवाडी धरण मंजूर झाले. आंबेजोगाई येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. यावेळी मी बीएससीच्या द्वितीय वर्षात शिकत होतो. विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन असल्याने माझाही आंदोलनात सक्रिय सहभाग होता, त्यामुळे ओघवत्या भाषेत युवकांना मार्गदर्शन करणारे डॉ. कुमार सप्तर्षी यांची जवळून ओळख झाली. त्यांना भावपूर्ण आदरांजली! डॉ राजेंद्र कांकरिया, चिंचवडगाव (पुणे)
