एखादा देश आपल्या संस्कृतीच्या ‘निर्याती’तून अर्थव्यवस्थेला कसा भरभक्कम हातभार लावू शकतो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ची प्रतिमा किती उंचावू शकतो याचं उदाहरण दक्षिण कोरियाने गेल्या सुमारे तीन दशकांत जगासमोर मांडलं. ‘के-पॉप’, ‘के-ड्रमा’ घरोघरी पोहोचले. त्यापाठोपाठ कोरियनांचं सौंदर्य आकर्षणस्थळ ठरलं. त्याचा लाभ तिथल्या सौंदर्य प्रसाधनं, वस्त्रप्रावरणांच्या उद्योगांना झाला. के-ड्रामातून तिथल्या खाद्यसंस्कृतीविषयी कुतूहल निर्माण झालं. कोरियन थीमची उपाहारगृहं इन्स्टाग्रामच्या रील्समधून खाद्यप्रेमींना साद घालू लागली. तिथल्या संगीत आणि मालिकांमागे वेड्या झालेल्या तरुणांनी कोरियन भाषा शिकण्यास सुरुवात केली. ड्रामामध्ये दाखवलेल्या शांत-सुंदर ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देणार्‍यांचं प्रमाण वाढलं. हे सारं झाल्यानंतर आता दक्षिण कोरियाचं साहित्यही जगभर पोहोचवण्यासाठी तिथल्या सरकारने नियोजनबद्ध प्रयत्न सुरू केल्याचं दिसतं. ‘के-बुक्स’कडे आता नव्या निर्यातयोग्य उत्पादनाच्या स्वरूपात पाहिलं जाऊ लागलं आहे.

दक्षिण कोरियाची राजधानी सोलमध्ये दरवर्षी ‘के-बुक कॉपीराइट मार्केट’ या शीर्षकाखाली प्रकाशन व्यवसायाशी संबंधित कंपन्या आणि व्यक्तींची एक परिषद आयोजित केली जाते. भाषांतराचे अधिकार आणि बौद्धिक संपदेसंदर्भातले व्यवहार यांना चालना देणं तसंच स्थानिक प्रकाशकांना साहित्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडणं हा त्यामागचा उद्देश असतो. यंदा परिषदेचं आठवं वर्ष होतं. ३१ देशांतील प्रकाशक आणि चित्रपट, मालिकांसारख्या माध्यमांत कार्यरत कंपन्यांचे अधिकारी परिषदेत सहभागी झाले. यात ‘पेंग्विन रँडम हाऊस’, ‘हार्पर कॉलिन्स’ आणि ‘हॅशेट’ यांसारख्या प्रकाशन क्षेत्रातील बड्या संस्था तर सहभागी झाल्याच, पण विशेष म्हणजे ग्वाटेमाला, झेक प्रजासत्ताक आणि लेबनॉनसारख्या उदयोन्मुख बाजारपेठांतील नवोदितांनीही या परिषदेला उपस्थिती लावली. या वर्षीच्या परिषदेचं खास वैशिष्ट्य हे की त्यात केवळ प्रकाशकच नव्हेत, तर ‘ओटीटी स्ट्रीमिंग’ क्षेत्रातील मोठ्या कंपन्या आणि ‘वेबटून सिंडिकेट्स’ही सहभागी झाले. आधुनिक मनोरंजन अर्थव्यवस्थेत पुस्तक ही कपाटात मांडण्याची, वाचून तिचं रसग्रहण करून वा त्यातून हवी ती माहिती मिळवून पुन्हा कपाटात ठेवून देण्याची वस्तू राहिलेली नाही. विविध माध्यमांत परिवर्तित होऊ शकेल अशी पायाभूत बौद्धिक संपदा म्हणून पुस्तकांकडे पाहिलं जाऊ लागलं आहे. विविध माध्यमांतल्या रूपांतरासाठीचा मूळ आशय ही त्यांची ओळख होऊ लागली आहे. ‘के-बुक कॉपीराइट मार्केट’च्या माध्यमातून कोरियन सरकार तिथल्या साहित्य क्षेत्राचा जागतिक स्तरावर विस्तार करण्यास प्रोत्साहन देत आहे.

‘मांगा’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या जपानी ‘ग्राफिक नॉव्हेल्स’चा सध्या किशोरवयीन मुलं आणि तरुणांवर मोठा पगडा आहे. याच स्पर्धेत आता कोरियाही उतरू पाहत असल्याचं दिसतं. गेल्या चार-पाच वर्षांत तिथल्या काही मोजक्या ग्राफिक नॉव्हेल्सना आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आलं आहे. २०२२ मध्ये, चित्रकार ली सुझी या ‘हॅन्स ख्रिश्चन अँडरसन अवॉर्ड’ जिंकणार्‍या पहिल्या कोरियन ठरल्या. त्यांच्या कलाकृतींचा अनुवाद होऊन त्या जपान, तैवान आणि फ्रान्समध्ये प्रकाशित झाल्या. २०२० मध्ये, ‘वेव्ह’ या पुस्तकाची तैवानच्या ‘ओपनबुक गुड बुक अवॉर्ड्स’साठी निवड झाली होती. २०२५ मध्ये, गुडोल आणि हेरंग यांचे ‘बॉर्डर्स’ आणि चोई योन-जू यांचे ‘मो स्टोरी’ ही फ्रान्सचा ‘प्रिक्स सोर्सियर्स’ ही पुरस्कार जिंकणारी पहिली दोन कोरियन पुस्तके ठरली होती. हा प्रतिसाद पाहून तिथे २०२५ हे वर्ष ‘सचित्र पुस्तकांचे वर्ष’ घोषित करण्यात आलं होतं. तिथलं सरकार अशा प्रकारे नेहमीच लोकप्रिय ‘उत्पादनां’ना नवनव्या बाजारपेठा शोधून देण्याचा प्रयत्न करताना दिसतं. या ‘उत्पादनां’च्या यादीत आता के-बुक्सना स्थान देण्याचा हा प्रयत्न असावा.