– डॉ. अंजली प्रकाश कुलकर्णी

अंतराळातील व्यावसायिक वर्चस्वावर आरूढ झालेल्या इलॉन मस्क या उद्योगपतीवर जगातील पहिला ट्रिलियानियर असे नुकतेच शिक्कामोर्तब झाले. वैश्विक पातळीवर हे त्यांचा नवनिर्मितीचा ध्यास, संशोधनातील नवीन वाटा शोधण्याची त्यांची जिद्द, जोखीम घेण्याचे धाडस आणि तंत्रज्ञानातील त्यांची बौद्धिक उंची यांचे फलित मानले जाते. परंपरागत स्पर्धेच्या पलीकडे जाऊन नवीन क्षितिजावर स्वत:च्या नवनिर्मितीचा ठसा उमटवून वेगळे साम्राज्य (कॉस्मिक कॅपिटॅलिझम) उभारण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

उद्योगपती इलॉन मस्क यांच्या या ‘पराक्रमा’ची तुलना व्यवस्थापन शास्त्रातील ‘ब्ल्यू ओशन रणनीती’शी केली जाते. निळा महासागर सिद्धांत हा डब्ल्यू चॅनकिम आणि रेणेमॉ मॉबॉर्न (Wchankim and Renee Mauborgne) यांनी मांडलेला व्यावसायिक रणनीतीचा क्रांतिकारी दृष्टिकोन आहे. या प्राध्यापकांनी १०० वर्षांच्या कालावधीतील (१८८०-२०००) ३० वेगवेगळ्या उद्योगांमधील १५० धोरणात्मक घडामोडींचे विश्लेषण करणारा एक अनुभवाधारित अभ्यास केला. त्यात त्यांना असे आढळले की, सर्वांत यशस्वी कंपन्या आपल्या प्रतिस्पर्ध्यांना हरविण्याची चिंता करत नव्हत्या, त्याऐवजी त्यांनी बाजारात पूर्णपणे नवीन मागणी निर्माण करून स्पर्धेला अप्रासंगिक ठरविले. त्यातूनच अंतरिक्ष भांडवलशाहीचा उदय झाला. ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी हा केवळ सिद्धांत नसून ती एक शक्तिशाली कार्यपद्धती मानली जाते. ती पारंपरिक स्पर्धेची बंधने तोडून, विविध व्यवसायांत(अस्तित्वात नसलेल्या पण उमलू शकणार्‍या) सध्याच्या मागणीच्या पलीकडे पहाण्याचे धाडस करून बाजारपेठेच्या सीमांची पुनर्रचना करण्यास, मूल्यवर्धन करण्यास उद्युक्त करते. ब्ल्यू ओशन ही संकल्पना स्पर्धाविरहित बाजारपेठेसाठी वापरली जाते. ही संकल्पना, हा सिद्धांत अशा उद्योगांचे प्रतिनिधित्व करते जे अजून अस्तित्वातही नाहीत.

इलॉन मस्क यांच्या नवीन उत्पादनांमुळे (‘स्पेस एक्स’ आणि ‘टेस्ला’) भांडवलशाहीतील एकाधिकारशाहीच्या एका नवीन पर्वाचा उदय झाला असे म्हटले जाते. स्पेस एक्सने अंतराळ यात्रेस शासकीय एकाधिकारातून बाहेर काढून मुक्त बाजारपेठेत रूपांतरीत केले. पूर्वी शीतयुद्धाच्या काळात अंतरिक्ष अन्वेषण ही शासनाच्या विविध अभिकर्त्याची (एजन्सीज) एकाधिकारशाही मानली जात होती. (उदा. नासा, इस्रो इ.) स्पेस एक्सने त्यांत बदल करून खासगीकरणाच्या नव्या युगाची केवळ सुरुवात न करता त्यात आमूलाग्र क्रांती केली.

स्पेस एक्सने अंतराळात हजारो उपग्रहांचे जाळे उभारले आहे. ज्याद्वारे जगभरात अतिवेगवान इंटरनेट सेवा दिली जाते. स्पेस एक्सच्या यशामुळे जागतिक अर्थव्यवस्थेने नवीन ऐतिहासिक टप्पे गाठले असले, तरी त्यमुळे एका नव्या वादास तोंड फुटले आहे.

स्पेस एक्सचे ‘स्टारशिप अंतराळयान’ आणि ‘सुपर हेवी रॉकेट’ ही एक पूर्णपणे पुनर्वापर करण्यायोग्य वाहतूक प्रणाली आहे. ती पृथ्वीच्या कक्षेत चंद्रावर, मंगळावर आणि त्या पलीकडे अंतराळात मालवाहतुकीसाठी तयार केली आहे. मानवास ‘बहुग्रहीय’ निवासी बनविणे हा त्यामागचा उद्देश आहे.

स्पेस एक्स आणि ब्ल्यू ओरिजिनसारख्या खासगी अंतराळ संस्थांनी पुनर्वापर करता येण्याजोगी रॉकेट्स (उदा. फालकन हेवी) विकसित केल्यामुळे अवकाश मोहिमेचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. तसेच खासगी पर्यटनाची सुरुवात आणि स्टारलिंकसारख्या उपग्रहांच्या माध्यमातून इंटरनेट कनेक्टिव्हिटी शक्य झाली आहे.

चौथी औद्योगिक क्रांती आणि अवकाश भ्रमण यांचे एक सकारात्मक, परस्परपूरक नाते आहे. वैज्ञानिक प्रगती आणि तंत्रज्ञानाच्या संगमामुळे अवकाश संशोधनात प्रगती होत आहे तर अवकाशातील प्रगतीमुळे नवीन तंत्रज्ञान आणि प्रयोगांची निर्मिती होत आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञान, एआय, थ्रीडी प्रिंटिंग, पदार्थ विज्ञान, नॅनोटेक्नॉलॉजी व बायोटेक्नॉलॉजीमधील प्रगतीमुळे लहान उपग्रहांच्या क्षमतेत वाढ होत आहे आणि प्रक्षेपण खर्चात घट होत आहे. परिणामी संशोधनातही सुलभता व नवीन क्षमता निर्माण झाली आहे.

अंतरिक्ष भांडवलशाही ही बाह्य अवकाशाचे व्यापारीकरण, अवकाश संशोधनाचे खासगीकरण (न्यू स्पेस) आणि खगोलीय संसाधनांचे उत्खनन याद्वारे चालविली जाणारी एक उदयोन्मुख आर्थिक प्रणाली आहे. ती पृथ्वी आधारित उद्योगांकडून ‘भांडवल संचया’चे ‘अंतिम सीमे’कडे स्थानांतरण करते. पृथ्वीवरील संसाधनांच्या मर्यादांवर मात करून अवकाश आधारित मालमत्ता, कक्षीय उत्पादन व लघुग्रह खाणकामाचा उपयोग जागतिक विकासासाठी करणे हा त्यामागील उद्देश आहे.

वैश्विक भांडवलशाही दुर्मीळ धातू, हेलियम-३, आणि पाण्याने समृद्ध असलेल्या खगोलीय उपग्रहांना लक्ष्य करून पृथ्वीवरील संसाधनांची कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. अंतराळ संस्था आणि खासगी संस्था दुर्गम अंतराळ पदार्थांचे व्यापारयोग्य, लाभप्रद, वस्तूंमध्ये रूपांतर करण्यासाठी लघुग्रहांचा पट्टा आणि चंद्राचे अन्वेषण करत आहेत. तसेच अंतराळ भांडवलशाहीत ‘अवकाश पर्यटन आणि पायाभूत सुविधा’ या बाजारपेठेचे वेगाने व्यापारीकरण होत आहे. खासगी कंपन्या (उदा. स्पेस एक्स, ब्ल्यू ओरिजिन) अवकाश पर्यटन आणि व्यावसायिक कक्षीय स्थानकांसाठी पायाभरणी करत आहेत.

उपग्रह डेटा अर्थव्यवस्थेलाही अंतरिक्ष भांडवलशाहीमुळे बरीच चालना मिळाली असून त्यामुळे जागतिक दळणवळण, शेती आणि हवामान निरीक्षणास आधार मिळाला आहे. आर्थिक लाभ होत असले तरी अंतरिक्ष भांडवलशाहीच्या सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय परिणामांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ऐतिहासिक वसाहतवादाची पुनरावृत्ती होत आहे, त्याच्या कक्षा आता रुंदावत आहेत, असे म्हटले जाते. काही अब्जाधिशांच्या नेतृत्वाखालील अंतराळ कंपन्यांच्या हातात प्रचंड संपत्ती एकवटण्याचा धोका (इलॉन मस्क हे उदाहरण) निर्माण झाला आहे. त्यामुळे पृथ्वीवरील सामाजिक-आर्थिक विषमता अधिकच वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वैश्विक भांडवलशाहीमुळे विविध कायदेशीर आणि सामाजिक नियंत्रणाबद्दल नवीन ऊहापोह, वादविवाद सुरू झाला आहे. संयुक्त राष्ट्रांचे बाह्य अवकाश करार अस्तित्वात आहेत. ते तांत्रिकदृष्ट्या खगोलीय वस्तूंच्या खासगी मालकीला प्रतिबंध करतात. परंतु वेगाने वाढणार्‍या खासगी उद्योगांच्या अंतरिक्षातील विस्ताराला ते चालना देत आहेत. बाह्य अवकाशात राहण्याचा आणि त्यातून नफा मिळविण्याचा अधिकार कोणाला आहे, याची व्याख्या पुन्हा करण्याचा दबाव नियामक संस्थांवर येत आहे. त्यामुळे यासंदर्भातील कायद्यांचे संपूर्ण नूतनीकरण, विवेकीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.

उपग्रह तंत्रज्ञानाच्या व्यापारीकरणामुळे भूगोल आणि निसर्गाशी असलेले मानवाचे नाते बदलत आहे. ‘कॉमन प्रॉपर्टी रिसोर्सेस’ ही संकल्पना अंतराळाच्या संदर्भात नवीन आयाम निर्माण करत आहे. अंतरिक्ष भांडवलशाहीमुळे सामान्य मालमत्ता संसाधनांबद्दल (ग्लोबल कॉमन्स) अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ग्लोबल कॉमन्स म्हणजे अशी नैसर्गिक संसाधने जी कोणत्याही एका देशाच्या किंवा व्यक्तीच्या मालकीची नसून त्यांवर संपूर्ण मानवजातीची सामायिक मालकी मानली जाते. अंतरिक्ष भांडवलशाही त्यास छेद देते. खासगी कंपन्या किंवा व्यक्तींद्वारे अंतराळातील संसाधनांचा (उदा. लघुग्रह, चंद्रावरील खनिजे) नफ्यासाठी वापर करण्याचे तिचे उद्दिष्ट आहे.

अवकाश भांडवलशाहीअंतर्गत खासगी कंपन्या (उदा. स्पेस एक्स) अंतराळातील खासगी वापरासाठी आणि चंद्रावर खासगी मालकी हक्क मिळविण्यासाठी कायदेशीर चौकटीचा (उदा. Artemis Accords) आग्रह धरत आहेत. अंतराळ भांडवलशाहीमुळे खासगी उपग्रहांचा अंतराळातील कचरा (स्पेस डेब्रिज) वाढत आहे. तसेच अवकाशातील कचरा आणि वाढत्या प्रक्षेपणांच्या पर्यावरणीय परिणामांची तसेच परिस्थितीजन्य परिणामांची मीमांसा करणे आवश्यक ठरले आहे. त्यामुळे ‘ट्रॅजेडी ऑफ कॉमन्स’ किंवा सामायिक अंतराळाचा वापर सर्वांसाठी धोक्यात येत आहे.

अंतरिक्ष भांडवलशाहीच्या आणखी एका पैलूची सद्य:स्थितीत चर्चा करणे आवश्यक आहे. आपले अंतरिक्षातील महत्त्व वाढवून पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेचे लष्करीकरण करण्याची सत्तापिपासू देशांची प्रवृत्ती असल्याचे दिसते. पृथ्वीच्या भ्रमणकक्षेत अणुशस्त्रांचा (न्यूक्लिआर वेपन्स) साठा करणे किंवा त्यांचा युद्धासाठी, सत्ताप्राप्तीसाठी उपयोग करण्याची वृत्ती बळावत आहे. जागतिक कायद्यानुसार त्यावर प्रतिबंध असला तरी त्या कायद्यांत सुधारणा करण्याकडे अणुशस्त्र निर्मिती करणार्‍या देशांचा कल दिसत असून अंतरिक्षभ्रमण कक्षेचे लष्करीकरण होण्यास फारसा विलंब लागणार नाही. ‘ग्लोबल स्पेस गव्हर्नन्स’ ही एक महत्त्वाची बाब असल्याने त्यादृष्टीने वैश्विक स्तरावर धोरणात्मक पावले उचलून ‘वसुधैव कुटुंबकम्’ची भावना जोपासणे अत्यंत आवश्यक ठरत आहे. यासाठी जागतिक स्तरावर धोरणात्मक पावले उचलणे अपरिहार्य झाले आहे.

dranjalikulkarni@rediffmail.com