‘शास्त्रज्ञांचे मतदान’ हा अग्रलेख (२० जुलै) वाचला. एखादे उद्योगक्षेत्र देशात जेव्हा अस्तित्वातच नसते, तेव्हा सरकार त्यात प्रचंड भांडवली गुंतवणूक करते. प्रशासनातील अनेक हुशार, कल्पक अधिकारी, अभियंते, सरकारी कर्मचार्‍यांच्या अनेक ध्येयासक्त पिढ्या त्या संस्थेत मोलाचे योगदान देऊन त्या क्षेत्राला देशात आणि देशाला जगात, मोठ्या उंचीवर घेऊन जातात. मग ते क्षेत्र खासगी कंपन्यांकरता खुले होते. ज्यांचे नावही कधी ऐकले नव्हते अशा कंपन्या त्यात अचानक चमकू लागतात आणि यशस्वितेचे नवनवे मापदंड प्रस्थापित करून जातात! खासगी क्षेत्राकरिता हे सारे खरेच इतके सहजसाध्य होते तर त्यांनीच ते आधी स्वत:च्या जोखमीवर का साध्य केले नाही असा प्रश्न पडतो.

गुंतवणुकीला गोमटी फळे येऊ लागली की(च!) संबंधित सरकारी संस्थेची आर्थिक प्रकृती खंगण्यास सुरुवात होते आणि खासगीकरण हा कसा योग्य उपाय आहे याची चर्चा सुरू होते! इस्रोमधील शास्त्रज्ञांचे ‘मतदान’ नेमके खासगीकरणाच्या मुहूर्तावर सुरू झाले हा योगायोगही खूपच बोलका आहे. नफ्यात चाललेल्या टाटांच्या विमान कंपनीचे सरकारीकरण होणे आणि नंतर तोट्याचे डोंगर सावरेनासे झाल्यावर परत खासगीकरण होणे हा बरोबर उलटा घटनाक्रम इथे लक्षात घेतला पाहिजे. या घटनाक्रमाचा संबंध कुठल्याही एका विशिष्ट राजकीय पक्षाशी वा आर्थिक विचारसरणीशी जोडता येत नाही हे यातून समजते.

एखाद्या नवीन क्षेत्राला स्वत:च्या पायावर उभे करण्यात सरकारने पुढाकार घ्यावा आणि योग्य वेळ येताच स्वत: बाजूस होऊन त्या क्षेत्राला स्वत:चे पुढील भविष्य स्वत:च घडवण्याची संधी द्यावी यातही तत्त्वत: काही चूक आहे असे नाही. परंतु करदात्यांच्या पैशातून आकारास आलेल्या त्या क्षेत्राकडून आजवर केलेल्या गुंतवणुकीवर परतावा कसा मिळाला हेही पारदर्शकपणे त्याच करदात्यांना समजले पाहिजे. अवकाश संशोधन क्षेत्र आता त्या टप्प्यावर आहे. त्या निमित्ताने आजवर झालेला खर्च सरकार कसा वसूल करणार आहे याचा आराखडा प्रसिद्ध केला जावा. त्यातून एक चांगला पायंडा पडेल असे वाटते. नाही तर खर्चाचे वा तोट्याचे सरकारीकरण आणि नफ्याचे मात्र खासगीकरण केले जाते, अशीच धारणा पुढेही सुरू राहील.

प्रसाद दीक्षित, ठाणे</strong>

खरोखरच गरज आहे का?

‘शास्त्रज्ञांचे ‘मतदान’!’ हा अग्रलेख वाचला. कोणत्याही क्षेत्रात उत्पादन वेगाने वाढत असेल तर त्यासाठी नवनव्या बाजारपेठा शोधणे गरजेचे असते. हेच सध्या पाश्चिमात्य अवकाश संशोधन संस्थांचे झाले आहे. त्यातूनच मग तिसर्‍या जगातील देशांना आणि त्यातील नवीन उद्योजकांना ही असली गरज दाखवली जाते. मागील काही दशकांत या देशांनी या क्षेत्रात भरमसाट गुंतवणूक करून ठेवली आहे. शेतीसाठी उपयुक्त उपग्रह तंत्रज्ञान विकसित करणार्‍या कंपन्या काही वर्षांत खूपच वाढल्या. त्यांचा पसारा पाहिला, तर पाश्चिमात्य देशांच्या पाच-दहा वर्षे जुन्या डेटाच्या भरवशावर हे लोक शेतकर्‍यांना उत्पादनवाढीचे गाजर दाखवतात. देशात नवनवीन उद्योग सुरू व्हावेत यात काडीमात्र शंका नाही, पण ते पूर्णपणे बाह्य घटकांवर अवलंबून नसावेत. ते खरोखरच आपल्यासाठी उपयुक्त आहेत का, याचीही शहानिशा करण्यात यावी.

निखिल ढोले, वाशीम

संशोधन स्वातंत्र्यावर मर्यादा?

‘शास्त्रज्ञांचे ‘मतदान’!’ हा अग्रलेख वाचला. सरकारी संस्थांमध्ये वैज्ञानिकांना संशोधनासाठी स्थिर वातावरण मिळत असते. परंतु पूर्ण खासगीकरणामुळे नोकरीची सुरक्षितता आणि संशोधनाचे स्वातंत्र्य यावर मर्यादा येऊ शकतात. खासगीकरण इतर क्षेत्रांसाठी उपयुक्त असले तरी इस्रोसारख्या वैज्ञानिक संशोधन क्षेत्रात खासगीकरणाची काहीच आवश्यकता नव्हती. खासगी क्षेत्रांचा महत्त्वाचा उद्देश नफा मिळवणे हाच असतो.

अनेक दीर्घकालीन संशोधन प्रकल्प त्वरित आर्थिक फायदा देतीलच, असे नसतात. त्यामुळे खासगी क्षेत्र इस्रोसारख्या संस्थेला संशोधनात न्याय देऊ शकेल का, हा प्रश्न निर्माण होतो. खासगी क्षेत्राच्या हस्तक्षेपामुळे संवेदनशील माहितीच्या गोपनीयतेलाही धोका निर्माण होऊ शकतो. इस्रोमधील शंभर जणांनी एकत्रित राजीनामे देणे यामागे कदाचित खासगी क्षेत्राचा दबाव व संशोधन स्वातंत्र्यावर येणारी मर्यादा ही कारणे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिक्षण व संशोधनावरील खर्चाची तरतूद वाढविल्यास या समस्या सोडविल्या जाऊ शकतात.

प्रा. रवींद्र पाटील, कमला कॉलेज (कोल्हापूर)

आवाज दाबून लोकशाही टिकेल?

‘सरकारला वांगचुक भोवणार?’ हा ‘लाल किल्ला’ सदरातील लेख वाचला. लोकशाहीची ओळख केवळ निवडणुकांमधून होत नाही, तर सत्ताधारी सरकारविरोधी मतांच्या नागरिकांशी कसा संवाद साधते यावरही ती ठरते. शांततापूर्ण आंदोलनांवर कठोर निर्बंध, आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेणे किंवा त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणे, यातून लोकशाही संस्थांबाबत प्रश्न उपस्थित होतात. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या संदर्भात आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर दडपशाहीचे आरोप केले आहेत, तर सरकारने कायदा-सुव्यवस्था आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या कारणास्तव कारवाई केल्याचे स्पष्ट केले आहे. अशा प्रसंगी लोकशाहीत संवादाला प्राधान्य मिळणे अधिक हितावह मानले जाते. इतिहासात ब्रिटिश सत्तेने जालियनवाला बाग हत्याकांड आणि मिठाच्या सत्याग्रहादरम्यान अटकसत्र आरंभले, जनआंदोलने दडपण्याचा प्रयत्न केला. परंतु अशा कारवायांमुळे लोकांचा असंतोष वाढला आणि स्वातंत्र्यलढा अधिक व्यापक झाला. महात्मा गांधी यांनी सांगितले होते, ‘अहिंसक आवाज दाबून सत्य दडपता येत नाही.’ आजच्या भारतातही कोणत्याही सरकारने संविधानातील अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकाराचा आदर राखणे आवश्यक आहे. कायदा-सुव्यवस्था राखणे ही शासनाची जबाबदारी असली, तरी संवाद, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांद्वारेच लोकांचा विश्वास टिकून राहतो. सशक्त लोकशाही ही विरोधी मतांना शत्रू मानत नाही; ती विरोधी मते ऐकून घेऊनच अधिक सक्षम होते.

अर्जुन वाळवंटे, हिंगोली</strong>

लोकशाहीसाठी धोक्याची घंटा

‘सरकारला वांगचुक भोवणार?’ हा ‘लाल किल्ला’ सदरातील महेश सरलष्कर यांचा लेख वाचला. गेंड्याच्या कातडीच्या केंद्र सरकारने आता मनमानीची परिसीमाच गाठली आहे! नीट पेपरफुटीप्रकरणी जंतर-मंतरवर गेले २० दिवस बेमुदत उपोषणाला बसलेले पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या स्वत:ला पणाला लावून सुरू केलेल्या आंदोलनाची कणभरही दखल सरकारने घेतली नाही. उलट त्यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा बळी घेऊन त्यांना जबरदस्तीने आंदोलन स्थळावरून उचलून नेण्यात आले. सरकारचीही बळजबरी लोकशाहीसाठी धोक्याची घंटाच होय! आजवर या सरकारने अनेक आंदोलने असंवेदनशीलपणे अशीच मोडून काढली आहेत अथवा चिरडली आहेत. हे सरकार लोकांचा आवाज कधी तरी ऐकणार आहे की नाही? उपोषणकर्त्यांची सहृदयतेने, संवेदनशीलतेने दखल घेणे ही नैतिक जबाबदारी असताना थेट ‘उचलण्या’ची कृती बेकायदा तर आहेच, शिवाय सरकारला नैतिकतेची काही चाड उरली नसल्याचेच हे द्योतक आहे.

श्रीकांत जाधव, अतीत (सातारा)

आयुष्यभर खिलाडूवृत्ती जपलेला खेळाडू

‘क्रिकेटचा ‘ब्लॅक पर्ल’!’ हा गारफिल्ड सोबर्सविषयीचा ‘अन्वयार्थ’ वाचला. उत्कृष्ट फलंदाजी, मध्यम, फिरकी गोलंदाजी, चपळ क्षेत्ररक्षण आणि आक्रमक कर्णधार या गुणांमुळे सोबर्स क्रिकेटचे जागतिक आदर्श ठरले. ठासून भरलेल्या नैसर्गिक गुणवत्तेला पुरेपूर न्याय देताना सोबर्स यांनी ५९ च्या सरासरीने ८०३२ धावा करताना २६ शतके ठोकली आणि गोलंदाजीतील चुणूक दाखवताना २३५ बळी घेतले. एका कसोटी डावातील नाबाद ३६५ धावांचा विक्रम वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी प्रस्थापित केला आणि पुढे तो कित्येक वर्षे अबाधित राहिला. त्यांच्या काळी पैसा कमी मिळत असला तरी त्यांचे देशप्रेम मात्र लाखमोलाचे होते. प्रसिद्धीच्या वलयात असतानादेखील त्यांनी कायम विनम्रता राखली, खिलाडूवृत्ती जपली आणि कोणत्याही वादात ते अडकले नाहीत. इंग्लंडच्या राणीकडून सर ही पदवी मिळविणारा हा अष्टपैलू खेळाडू ‘वेस्ट इंडिजचा कोहिनूर’ म्हणून क्रिकेटविश्वात कायम लखलखत राहील! हेमंतकुमार मेस्त्री, मनोर