चित्ततोष खांडेकर
लोकसंस्कृतीतल्या आदिम शहाणपणाला आधुनिकतेचे बांध बसले तरी, समतोल- सुखी जगण्यासाठी आधुनिक ज्ञानपरंपरांतून पुन्हा नव्यानं तीच शहाणीव वाहू लागते, हे स्पेनमध्ये १९९५-९६ पासून दिसलं. ‘नदी हक्कां’ची आणि नदीशी असलेल्या आध्यात्मिक नात्याची जाणीव दशकभराच्या विचारमंथनातून जिवंत झाली… प्रबोधनकाळ (रेनेसाँ) आणि आधुनिकता (मॉडर्निटी) यांमुळे लोकसंस्कृतीचा लवलेशच युरोपात उरला नाही. पण याच आधुनिकतेच्या आणि प्रबोधनवादी पुनरुत्थानाच्या संकल्पनांतून एखादी नवी लोकसंस्कृती जन्म घेऊ शकते? त्यातून नदीधोरणाला काही दिशा मिळू शकते? स्पेनमधल्या ‘न्यू वॉटर कल्चर’ची (नव जलसंस्कृतीची) कथा काय सांगते हे आजच्या लेखातून समजून घेऊ.

पिढ्यानुपिढ्या जगाच्या अनुभवातून मिळालेलं ज्ञानाचं संचित म्हणजे लोकसंस्कृती.  हे ज्ञान कोणत्या पुस्तकांमध्ये लिहिलं जात नाही. रोजच्या जगण्यामध्ये आचरलं जातं.  कथा आणि गीतांमधून, पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवलं जातं.  हे ज्ञान चांगलं की वाईट, उपयोगी की  टाकाऊ यावर साधक-बाधक चर्चा  होऊ शकते. पण विद्यापीठातून आलेल्या ज्ञानपरंपरापेक्षा ही ज्ञानपरंपरा वेगळी!  आधुनिकतेमुळे तयार झालेली विद्यापीठीय ज्ञानपरंपरा, ही प्रयोगांतून आणि अभ्यासातून येते. ती पुस्तकांमध्ये लिहिली जाते, पाठ्यक्रमातून शिकवली जाते आणि औद्योगिक क्षेत्रात वापरली जाते. मग आधुनिकतेतील ज्ञानपरंपरा आणि लोकसंस्कृतीतल्या ज्ञानपरंपरा यांचा संयोग कसा साधावा? त्यातून ‘नवलोकसंस्कृती’ उदयास येऊ शकते का?  आणि मुख्यत्वे या दोहोंच्या साहाय्यानं नदीधोरण कसं उभं करावं?  याच प्रश्नांची उत्तरं आजच्या लेखात शोधू.

समकालीन नदीधोरणं किंवा जलधोरणं (वॉटर पॉलिसी) ही आधुनिकतेतल्या ज्ञानपरंपरेवर अवलंबून आहेत. आधुनिकतेतून आलेली सगळ्यात महत्त्वाची संकल्पना म्हणजे राष्ट्र (नेशन).  समान भूगोल, संस्कृती आणि अस्मिता असणार्‍या लोकांचा समूह म्हणजे राष्ट्र. हा मानवी समूहच त्याच्या सामाजिक आणि राजकीय धारणांनुसार राज्यसंस्था (स्टेट) निर्माण करतो, असं बेनेडिक्ट ॲण्डरसनसारख्या अभ्यासकांचं मतं. ते युरोपातल्या राष्ट्रांना लागूही पडतं. आधी स्पॅनिश अस्मिता- त्यातून स्पॅनिश समूह, मग त्यातून स्पॅनिश राष्ट्राची संकल्पना जन्माला आली. याचीच परिणती स्पेनच्या आधुनिक राज्यसंस्थेत (स्टेट) झाली. 

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला आपलं राष्ट्र हे वैभवाच्या शिखरावर जावं यासाठी युरोपीय राष्ट्रांमध्ये एक स्पर्धाच सुरू झाली. उद्योग वाढवून, जास्तीतजास्त भूभाग आपल्या   साम्राज्याखाली आणून आणि देशातल्या समस्या संपवून आपल्या राष्ट्राला महान बनवण्याची ही स्पर्धा होती. मग स्पेन या राष्ट्रासमोर त्याकाळी कोणत्या समस्या होत्या? पूर आणि दुष्काळ! या दोन्ही समस्या त्याकाळी स्पेनसमोर ‘आ’ वासून उभ्या होत्या. इतक्या की, दुष्काळ आणि पूर यांचा आलटून-पालटून लपंडाव स्पेनमध्ये चालत असे. 

यामुळे स्पेनमध्ये  शेतकरी तुलनेने गरीब होते. त्यांच्या पिकांचं उत्पादन आणि उत्पन्न कमी होतं. जर या दोन समस्या सोडवल्या तर शेतीतून येणारं उत्पन्न वाढेल, गरिबी दूर होईल आणि स्पेनचं गतवैभव पुन्हा प्राप्त होईल हे तत्कालीन राजकीय नेत्यांचं मत. पण हे करायचं कसं? जोवाकिन कोस्टा या स्पॅनिश राजकीय विचारवंतानुसार, या प्रश्नाचं उत्तर खूपच सोपं होतं.  स्पेनमधल्या नद्यांचं पाणी अडवलं, त्यातून सिंचनाचे कालवे बनवले, मोठी धरणं बांधून सरोवरं तयार केली आणि ती व्यवस्थित साठवली, तर पूरही थांबतील आणि दुष्काळात पाणीही उपलब्ध होईल. हीच धरणं आणि सिंचन कालवे शेतीचं उत्पादन वाढवून स्पेनला गतवैभव प्राप्त करून देतील.  त्यामुळे धरणं पुन: राष्ट्रनिर्मितीची प्रतीकं झाली.

 धरणं आणि कालवे बांधण्याचा सपाटा तब्बल शंभर वर्षं स्पेनमध्ये सुरू होता. यातून काही काळ शेतीचं उत्पन्न वाढलं असेलही, पण नद्यांना दीर्घकालीन फटका बसला.  एकतर ठिकठिकाणी पाणी अडवलं गेल्यामुळे  भूजलाच्या स्रोतांचा नदीशी असलेला संपर्क तुटला. एकाच नदीवर अनेक ठिकाणी बांध बांधले गेले. नंतर शहरीकरणामुळे, अनेक ठिकाणी माती टाकून त्यांची पात्रं अरुंद केली गेली. यामुळे इसेरा आणि नोगुएरा रिबागोरझाना सारख्या महानद्या पाइपमध्ये लुप्त झाल्या. खरंतर नद्या, त्यांच्या खोर्‍यांतल्या दर्‍या आणि खिंडी, त्यांच्या पुरांमुळे जन्माला आलेल्या हरित मैदानी प्रदेशांचा सुंदर देश म्हणजे स्पेन. पण धरणांनी हा सारा भूगोलच बदलला.

नद्यांच्या खिंडी किंवा निंदरी (इंग्रजीत कॅनियन), धबधबे, मैदानं, सारंच पाण्याखाली गेलं. नद्यांच्या परिसंस्था उद्ध्वस्त झाल्या. एकेकाळी मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेली एब्रो नदी- तिच्यात मासेच उरले नाहीत. स्पेनवर तीस वर्षं राज्य करणार्‍या  फ्रॅन्को या हुकुमशहाने तर वीज आणि शेतीच्या उत्पन्नामागे लागून स्पेनमधले सगळेच सुंदर प्रदेश उद्ध्वस्त केले. यातच राष्ट्रीय जलशास्त्रीय नियोजन (नॅशनल हायड्रॉलॉजिकल प्लॅन) घोषित झालं. त्यासोबतच १९८५ मध्ये सरकारनं लागू केलेल्या जलकायद्यांमुळे ‘पाण्यासंदर्भातील समस्या कायमच्या  संपवण्यासाठी’ आणखी धरणं बांधण्याचा उतारा शोधण्यात आला.  एका एब्रो नदीवरच शंभरहून अधिक बांध आणि छोटी-मोठी धरणं बांधण्याचं धोरण आखण्यात आलं. उरलेल्या ठिकाणी सिंचन कालवे बांधून तिला नियंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

‘नद्या म्हणजे फक्त पाण्याचा स्रोत नाही, तर आमच्या पूर्वजांचे घाम, रक्त आणि अश्रू वाहणार्‍या जीवनदायिनी आहेत…’ असं अनेक स्पॅनिश लेखक आपल्या कादंबर्‍यामध्ये लिहितात. धरणांमुळे स्पेनमध्ये  पाण्याखाली गेलेली गावं, त्यांचा लुप्त झालेला गावगाडा आणि  शहरात येऊन या गावकर्‍यांची झालेली वाताहत हा अनेक १९६० नंतरच्या  स्पॅनिश कादंबर्‍यांचा मुख्य विषय. नद्यांची होणारी वाताहत आधुनिक ज्ञानपरंपरेतून शिकून येणार्‍या अनेक जीवशास्त्रज्ञ (बायॉलॉजिस्ट), जलशास्त्रज्ञ (हायड्रॉलॉजिस्ट) आणि तत्त्वज्ञांना (फिलॉसॉफर्स) पाहावत नव्हती. या सार्‍याला नदीला फक्त एक जलशास्त्रीय साधन (हायड्रॉलॉजिकल रिसोर्स) समजणारं  धोरण जबाबदार आहे, असं त्यांचा अभ्यास सांगत होता.

नद्यांची वाताहत थांबवायची असेल तर हे पाण्याचं धोरण बदलावं लागेल. नदीधोरण बनवताना अनेक गोष्टी विचारत घ्याव्या लागतील. त्यासाठी फक्त आधुनिक ज्ञानपरंपरेवर अवलंबून चालणार नाही तर नदीकाठच्या  लोकांच्या जीवनसंस्कृतीला, त्यांच्या व्यवसायांनाही विचारात घ्यावं लागेल असं त्यांना जाणवलं. यातूनच या सार्‍या तज्ज्ञ व्यक्तींनी ‘कोअरगेट’ नावाची एक पर्यावरणीय  संस्था स्थापन केली. स्पेनच्या शाश्वत विकासासाठी त्यांनी  १९९५-१९९६ मध्ये एक काँग्रेस  (परिषद) भरवली. या परिषदेत युरोपातील अनेक अभ्यासक सहभागी झाले.  हे सगळेच आधुनिक ज्ञानपरंपरेतून शिकून आले होते. आपल्या अभ्यासातून त्यांचं एकच मत पडलं- स्पेनचे सध्याचं जलधोरण हे फक्त जलशास्त्रीय विचार करतं आहे.

नदीच्या भूगर्भशास्त्राचा (जिऑलॉजी), पर्यावरणशास्त्राचा (इकॉलॉजी) ,  हवामानशास्त्राचा (क्लायमेटॉलॉजी) आणि सामाजिक विज्ञानाचा (सोशल सायन्स) कोणताही विचार हे धोरण करत नाही. जर जलनियोजनाचं धोरण बनवायचं असेल तर त्यात या सगळ्याच शास्त्रांचा अभ्यास अंतर्भूत व्हायला हवा. नाही तर, नद्या आणि त्यांच्या परिसंस्था पन्नास वर्षांत पाहता पाहता नष्ट होतील. जर पुढील अनेक शतकं नद्या आणि पाण्याचे स्रोत जपायचे असतील तर या सगळ्या शास्त्रांचा विचार करून एक सर्वसमावेशक धोरण तयार करायला हवं. तसंच ते धोरण फक्त तांत्रिक बाबींचा विचार करणारं नको; तर नदीसोबतचं सामाजिक जगणं समृद्ध करणारं हवं.

नदीकाठी राहणार्‍या लोकांचं नदीशी एक आध्यात्मिक नातं असतं. हे आध्यात्मिक नातं मासेमारी, नौकानयन, नदीकाठी रोज फेरफटका मारणं अशा अनेक दैनंदिन कृतींमधून जपलं जातं पण त्यातून जगण्याचं समृद्ध तत्त्वज्ञान बनत असतं. हेच तत्त्वज्ञान शिक्षणातून रुजवलं आणि धोरणात समाविष्ट केलं, तर नदीचं कोणत्याही प्रकारे नुकसान करण्याआधी लोक हजारदा विचार करतील.  लोकसंस्कृती नसली, तरी स्थानिकांचं एब्रो नदीशी  हे आध्यात्मिक नातं अजूनही आहे. त्याला केंद्रस्थानी ठेवून, इतर शास्त्रं विचारात घेऊनच एक सर्वांगीण (होलिस्टिक) नदीधोरण बनवायला हवं –  असा ठराव या काँग्रेसनं मंजूर केला. पुढच्या दहा वर्षांत अनेकदा ही काँग्रेस भरली आणि त्यात या पर्यायी नदीधोरणाचा आराखडा मजबूत करण्यात आला.

हे नदीधोरण सरकारनं स्वीकारावं म्हणून स्पेनमध्ये अभ्यासकांनी उभी केलेली मोठी मोहीम म्हणजे ‘न्यू वॉटर कल्चर’. यातूनच  स्पेनमधल्या अनेक शहरांतल्या छोट्या नद्यांसाठी नदीहक्कांच्या मागणीनं जोर धरला. मार मॅनॉरला नदीहक्क मिळणं हा याचाच परिणाम. एब्रो आणि इतर काही नद्यांमधलं प्रदूषण थांबवण्याची पावलं सरकारला उचलावी लागली. हे नदीधोरण कसं आमलात आणता येईल यावर तिथलं जलसंसाधन मंत्रालय विचार करू लागलं. काही धरणांचे प्रकल्प बंद झाले.

आधुनिकता आणि लोकतत्त्वज्ञानाच्या सुंदर संगमाच्या आधारेही नवीन लोकसंस्कृती, त्यातून नदीधोरणं आणि नदीकारण उभं करता येतं, हेच ही कथा सांगते. जर स्पेनसारख्या-  रूढार्थानं लोकसंस्कृती नसलेल्या देशातही हे होऊ शकतं, तर लोकसंस्कृतीत ओतप्रोत नाहून निघालेल्या दक्षिण आशियाई देशांत का नाही?…स्पेनप्रमाणेच युरोपातल्या इतर देशांत कसं नदीकारण उभं राहातं आहे हे पुढल्या लेखांत समजून घेऊ.

नदी विषयक संशोधक अभ्यासक

chittatoshresearch@gmail.com