स्पेनच्या परिवहन मंत्र्याने गेल्या जानेवारीत झालेल्या रेल्वे अपघातानंतर सर्वांना आश्वस्त केले होते, की अशा प्रकारचा अपघात पुन्हा होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. या विधानानंतर नऊ महिन्यांतच स्पेनमध्ये दुसरा भीषण रेल्वे अपघात झाला. दोन्ही अपघातांचे स्वरूप जवळपास सारखेच. दोन्ही अपघात द्रुतगती रेल्वेंचे.

जानेवारीतील अपघातांत रुळांवरून घसरलेल्या एका रेल्वेवर दुसरी वेगवान रेल्वे येऊन आदळली. परवाच्या अपघातात रुळांवर उभ्या असलेल्या रेल्वेस मागून एका रेल्वेने धडक दिली. या दोन्ही अपघातांतील रेल्वे कंपन्याही त्याच आहेत. अशा प्रकारच्या अपघातांत तिसर्‍या जगातल्या देशांची ‘मक्तेदारी’ असल्याचे मानण्याचा प्रघात आहे. तो स्पेनसारख्या विकसित देशात झाल्याने नाही म्हटले तरी अनेकांच्या भुवया वर गेल्या. या अपघाताविषयी येत असलेल्या समाजमाध्यमी प्रतिक्रियांतूनही, युरोपीय महासंघात असे कसे काय घडू शकते, असा प्रच्छन्न प्रश्न दिसतो. 

या दुर्घटनेची काही प्राथमिक कारणे पुढे आली आहेत. एक रेल्वे रुळावर उभी होती. तिला संगणकीय समस्येमुळे पुढे जाता येत नव्हते. अशा परिस्थितीत त्या रुळावर मागून येणार्‍या रेल्वेंना तसा संदेश जायला हवा. तो गेला नाही. उलट रेल्वे ‘सर्वसाधारण’ वेगाने – म्हणजे सुमारे २०० किमी प्रति तास – धावू दे, असे नियंत्रणकक्षातून रेल्वेचालकांस सांगण्यात आले.

यातून दिसते, की मानवी आणि तांत्रिक चूक या दोन्हींचा हा परिणाम आहे. हे का व कसे घडले हा पुढच्या तपासाचा प्रश्न. एखादी मोठी घटना, दुर्घटना घडते, तेव्हा त्यांचा नेमका अर्थ लावणे हे अनेकांच्या क्षमतेपलीकडचे असते. त्या घटनांचे काही तरी साधे, भावनांचे समाधान करील असे स्पष्टीकरण त्यांना हवे असते. चिंता आणि भयमुक्ती हवी असते. कटकाल्पनिका जन्मतात त्या या गरजेतून.

या अपघाताबद्दलचा सध्याचा एक लोकप्रिय षड्यंत्र सिद्धांत आहे तो ‘सायबर युद्धा’चा आणि त्यात इस्रायलचा हात असल्याचे सांगण्यात येते. स्पेन आणि इस्रायलमधील ताणलेले संबंध, या अपघातातील सरकारी रेल्वेकंपनीने इस्रायलच्या एका माजी गुप्तचराशी संबंधित असलेल्या कंपनीस दिलेले सुरक्षासेवा कंत्राट अशी काही टिंबे जोडून हे कटकाल्पनिकेचे चित्र तयार केले जात आहे. त्यात किती तथ्य हे कालांतराने कळेलच. पण आजचे जग हे कृत्रिम प्रज्ञेचे आहे. सायबर युद्ध हा अनेक देशांच्या रणनीतीचा प्रमुख भाग बनलेला आहे. असे असताना या अशा बाबी दुर्लक्षिता येत नसतात.

आणि म्हणूनच या अपघाताने दिलेल्या धड्यांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. आपल्याकडे सध्या बुलेट ट्रेनचे काम कासवगतीने सुरू आहे. तशा प्रकारच्या आणि खरे तर मुंबई-अहमदाबाद या ‘आता सुरू – आता संपला’ अशा मार्गावरच्या अतिद्रुतगती रेल्वेची आवश्यकता काय, हा वेगळा मुद्दा. त्याची आर्थिक, राजकीय आणि सामाजिकही गणिते हा भाग वेगळा. येथे प्रश्न बंदुकीच्या गोळीइतक्या वेगाचा आहे. तो झेपण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा, यंत्रणा, कौशल्य आणि त्या यंत्रणांची सुरक्षा हा खरा चिंतेचा घटक आहे. याच आठवड्यात मुंबईत झालेला ‘लोकल-राडा’ सर्वांनी पाहिला. २०११ मध्ये आपल्याकडे रेल्वे धडकरोधक यंत्रणेवर काम सुरू झाले. पुढे त्याचे ‘कवच’ असे छानसे नामांतर झाले.

ही ‘स्वयंचलित रेल्वे सुरक्षा’ प्रणाली अद्याप सर्व रेल्वे मार्गांवर आलेली नाही. याची कारणे आर्थिक असोत वा अन्य काही. यातून दिसतो तो रेल्वे सुरक्षेबाबतचा आपला दृष्टिकोन. या अशा सुरक्षा यंत्रणा संगणकाधारित असतात. त्यामुळे त्यांची सुरक्षा हा पुन्हा एक वेगळा मुद्दा. कृत्रिम प्रज्ञेच्या विकास आणि विस्तारामुळे या सुरक्षेची शंभर टक्के खात्री तर कोणासही देता येणार नाही. आणि त्यामुळेच अतिवेगवान प्रवास हा द्रुतगती मार्गावरील त्या ‘अति घाई – संकटात नेई’ या सुविचारास प्रत्यक्षात आणणारा तर ठरणार नाही ना, अशी शंका निर्माण होते.

प्रगतीसाठी वेग हवा, हे खरे. पण तो किती? त्याची मर्यादा काय? पुरेसा वेग म्हणजे काय? त्याचा वृथा हव्यास कशाला म्हणावयाचे, असे काही प्रश्न एकदा धोरणकर्त्यांनीच नव्हे, तर सामान्य नागरिकांनीही गांभीर्याने घ्यायला हवेत. स्पेनच्या अपघाताचा हा मुख्य धडा आहे.