पुरुषांची मक्तेदारी असलेली अनेक क्षेत्रे गेल्या काही दशकांत महिलांनी पादाक्रांत केली. अनेक क्षेत्रांत स्वत:ची ओळख निर्माण केली, तरी आजही भारतीय वायुदलाच्या विविध श्रेणींत सर्वोच्च स्थानी पोहोचणार्या महिलांचे प्रमाण तुलनेने मर्यादितच आहे. स्क्वाड्रन लीडर सान्या यांनी वायुदलातील विमान उड्डाण प्रशिक्षकांच्या सर्वोच्च श्रेणीत स्थान मिळवणे हे कौतुकाचे आणि अभिमानाचे ठरते, ते त्यामुळेच. त्यासाठी आवश्यक ‘कॅट- ए क्वालिफाइड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर’ (‘क्यूएफआय’) पात्रता संपादन करणार्या त्या पहिल्याच भारतीय महिला ठरल्या आहेत.

स्क्वाड्रन लीडर सान्या एक कुशल वैमानिक आहेत. अधिकृत सेवा नोंदीनुसार त्या फ्लाइंग ब्रान्चमध्ये अधिकारी असून २० जून २०१५ रोजी ४२व्या एसएससी (डब्ल्यू) एफपीचा भाग म्हणून त्या सेवेत रुजू झाल्या. त्यांना २०१७ मध्ये फ्लाइट लेफ्टनंट आणि २०२१ मध्ये स्क्वॉड्रन लीडर म्हणून पदोन्नती मिळाली आणि आता त्यांनी ‘कॅट- ए’ श्रेणी प्राप्त केली आहे. इथवर पोहोचण्यासाठी वायुदलातील अधिकार्यांना चेन्नईजवळच्या तांबरम हवाई तळावरील ‘फ्लाइंग इन्स्ट्रक्टर्स स्कूल’मध्ये (एफआयएस) २२ आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. यात जमिनीवरील अभ्यासक्रम आणि उड्डाण प्रशिक्षणाच्या २०० तासांहून अधिक कालावधीचा समावेश असतो.

भारतीय वायुदलात वैमानिकांना प्रशिक्षण व सूचना देणार्यांच्या प्रावीण्याचे मूल्यांकन करण्यासाठी त्यांची विभागणी तीन श्रेणींत करण्यात आली आहे. ‘कॅट- ए’, ‘कॅट- बी’ आणि ‘कॅट- सी’. यातील ‘कॅट- सी’ प्रावीण्य प्राप्त केलेले वैमानिक प्रशिक्षणार्थी किंवा परिवीक्षाधीन (प्रोबेशनरी) वैमानिकांना प्रशिक्षण देण्यास पात्र असतात. ‘कॅट- बी’ श्रेणीचे वैमानिक नियमित उड्डाण प्रशिक्षणास पात्र ठरतात, तर ‘कॅट- ए’ श्रेणीप्राप्त अधिकार्यांना इतर वैमानिकांना आणि वैमानिकांच्या प्रशिक्षकांनाही प्रशिक्षण देण्याचा आणि त्यांच्या प्रावीण्याचे मूल्यमापन करण्याचा अधिकार असतो. या श्रेणीपर्यंत पोहोचणार्या व्यक्तीच्या विमान उड्डाणाच्या कौशल्यांबरोबरच संयम, अचूकता आणि सखोल तांत्रिक ज्ञानाचाही कस पाहिला जातो.

भारतीय वायुदलात महिलांना तुलनेने अगदी अलीकडे म्हणजे १९९४च्या सुमारास स्थान प्राप्त झाले. मात्र आज हे स्थान केवळ प्रतीकात्मक राहिले नसून महिला लढाऊ

विमाने उडवणे, युद्धनौकांवर काम करणे, आघाडीवरील युनिट्सचे नेतृत्व करणे यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदार्या पुरुषांएवढ्याच कार्यक्षमतेचे पार पाडत आहेत. वायुदलासारख्या शारीरिक, मानसिक कणखरतेची, तांत्रिक कौशल्यांची आणि निर्णयक्षमतेची कसोटी पाहणार्या क्षेत्रातही सर्व प्रकारची कामे करत आहेत. लढाऊ विमाने उडवणे, विमान वाहतुकीचे व्यवस्थापन करणे, हेलिकॉप्टर युनिट्समध्ये सेवा देणे, उड्डाणाची चाचणी आणि प्रशिक्षकापर्यंत सर्व भूमिका त्या बजावू लागल्या आहेत. सात महिन्यांपूर्वीच स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग या ‘क्यूएफआय’ बॅज मिळवणार्या भारतीय वायुदलातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या होत्या. असे असले, तरीही वायुदलातील वैमानिकांच्या प्रशिक्षकांचीही प्रशिक्षक म्हणून एक महिला पात्र ठरण्याची ही पहिलीच वेळ आहे. स्क्वाड्रन लीडर सान्या यांचा ‘कॅट- ए’ श्रेणीतील समावेश हा भारतीय वायुदलाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यांची ही कामगिरी वायुदलात येऊ इच्छिणार्या आणि या दलात सर्वोच्च स्थान प्राप्त करू इच्छिणार्या अनेक तरुणींसाठी प्रेरक ठरू शकते.