प्रदीप रावत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वत:चा ठसा असलेला वंश निर्माण करत, स्वत:च्या प्रतिकृती तयार करत जगण्या-तगण्याचा खटाटोप करणारी जनुके अजरामर म्हणावीत इतकी लाख वर्षे हयात आहेत..

डीएनएचे दुपदरी सर्पिल गोल जिने असे चित्र आपण वारंवार बघतो. पण ते त्यांच्या रचनेचे आकलन व्हावे म्हणून! रचना तशी असते खरी, पण पेशीच्या केंद्रात त्यांची भली मोठी गर्दी असते. तिथल्या चिमुकल्या जागेत एवढी भेंडोळी मावतात तरी कशी? तर या दुपदरी सर्पिलांचे धागे हिस्टोन नावाच्या प्रथिनाभोवती लोकरीचा गुंडा केल्यागत घट्ट गुंडाळलेले असतात. या हिस्टोनभोवतीच्या गुंडाळय़ांना केंद्रदेही ऊर्फ न्यूक्लिओसोम म्हणतात. कल्पना करता येणार नाही इतक्या सूक्ष्म जागेत भरभरून असलेल्या गुंडाळय़ा त्यात सामावलेले डीएनएचे लटांबर यातून जीवांची दुनिया उभी राहिली! या डीएनए नामक दुहेरी पेडातला एका पेडावरचा तुकडा उचलला जातो. त्याला म्हणायचे जनुक! अडेनाइनशी थायमिनऐवजी युरेसिलची सांगड घालून असा तुकडा विलग केला जातो. तो केंद्रकी फटीतून बाहेर पडतो. त्याला म्हणतात संदेशी आरएनए. त्या संदेशातल्या तीन अक्षरी माळा पारखत नव्या लिखाणाचा आरंभ होतो. त्याला म्हणतात परिलेखन. पेशीद्रवातले आवश्यक ते अमिनो आम्ल घेऊन संदेशातील संकेतानुसार अमिनो आम्लांची साखळी तयार केली जाते. त्यातून प्रथिने तयार होतात. उदा. हिमोग्लोबिन किंवा संप्रेरके बनतात. उदा. इन्सुलिन एस्ट्रोजेन. रंगसूत्रांमध्ये गठडी वळल्यागत दिसणाऱ्या पेडांमध्ये अशा अनेक करामती चाव्या असतात. लिंगसंबंधी रंगसूत्रे वगळता उरलेल्या सगळय़ा रंगसूत्रांच्या दोन दोन अशा जोडय़ा असतात. एक आईकडून आणि दुसरी वडिलांकडून असे ही जोड बनत असतात. उदा. आईवडिलांकडून मनुष्यप्राण्याला एकूण ४६ रंगसूत्रे मिळतात. त्यांच्या सरमिसळीने जरा नवीन गुणधर्माचा मनुष्यप्राणी तयार होतो. इतर जीवांमध्ये साधारणत: असेच घडत असते. मेंडेलच्या शोधप्रयोगांमुळे निरनिराळय़ा रंगसूत्रांनी जीवांची इमारत घडते, वैविध्य उपजते हे ढोबळपणे उमगले होते. पण त्याचे कामकाज चालविणारा कारखाना आणि त्याचे आराखडे ठरवणाऱ्या क्लृप्तींचा सुगावा लागला नव्हता. डीएनएची रासायनिक रचना सापडली आणि एकेका रहस्याचा उलगडा होऊ लागला.

जीव आपल्यासारख्या इतर जीवांची निर्मिती करतात! पण हे मर्यादित अर्थाने खरे आहे! यातला खरा निर्मिक घटक कोण? तर रंगसूत्रात आटोकाट गुंडाळून ठेवलेल्या डीएनएमधील छोटे तुकडे म्हणजे जनुके. प्रत्येक जनुकामध्ये कोणत्या ना कोणत्या गुणधर्माची पोथी लिहिलेली असते. ती कधी पूर्ण असते तर कधी नसते. कारण एका जनुकाने एक गुणधर्म ठरतो असेही नाही. कोणता दृश्यगुण कसा साकारतो याबद्दलच्या अनेक शक्यता असतात. कधी एका जनुकाचे काम दुसऱ्या जनुकाखेरीज भागत नाही. कधी अनेक जनुके मिळून एक गुणधर्म साकार होतो. तर कधी एकाच जनुकाने अनेक गुण साकारले जातात. त्याचबरोबरीने एक जनुक इतर जनुकांच्या परस्पर सहकार्यामुळे दृश्यगुण ठरविते. याखेरीज जनुकांच्या सभोवतालची आणि पेशींमधील परिस्थिती किती अनुकूल आणि किती प्रतिकूल यावरदेखील जनुकांच्या गुणांचा आविष्कार अवलंबून असतो.

या जनुकांची स्वत:ची पुन:पुन्हा आवृत्ती करण्याची क्रिया ही जीवांच्या जगण्याचे आणि लाखो वर्षे तगण्याचे रहस्य आहे. या आवृत्ती करताना कधी अक्षरे गळून पडतात, कधी चुकीची लिहिली- छापली जातात. त्यातूनही वैविध्याची आरास फुलत जाते. वरपांगी दिसायला आपण ज्याला जीव प्रकार म्हणतो (उदा. माणूस, मासा, डुक्कर, पिंपळ इ.) ते या जनुकांचा वाहता यंत्रसमूह आहेत. यंत्र येते आणि जाते, पण या ना त्या रूपाने तगून राहतात ती जनुके. तगून राहण्याचे मूळ एकक (युनिट) कुठले तर जनुक! तगून राहण्याची प्रक्रिया जनुकांची आहे. तगण्यामधील यशापयश जनुकांचे आहे. आपली पुढची पिढी पैदासण्याच्या भरात अक्षरे पालटतात, चुका होतात. छपाईतल्या मुद्राराक्षसाच्या विनोदासारख्या! काही चुका भलत्या लाभकारक ठरतात तर काही जनुकांचे तगणे दुबळे करतात.

दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जनुके आपली पुनराआवृत्ती घडावी यासाठी धडपड करत असतात. त्यायोगेच तर ती पिढय़ान्पिढय़ा तगतात! या अर्थानेच जनुके अमर म्हणावी इतका दीर्घकाळ जगली आणि तगली आहेत.

त्यांच्या तगून राहण्याच्या खटाटोपातूनच इतके विविध जीव प्रकार निष्पन्न झाले. जीव प्रकार हे जनुकांच्या पुनर्निर्मितीचे थोराड यंत्र आहे. जनुकाची ठेवण बदलली की या यंत्र प्रकाराची ठेवण बदलते. जनुक स्वत:ची छबी तयार करतात. असे करताना स्वत:च विनासायास ईप्सित नसलेले बदलदेखील करून बसतात. सभोवताल अनुकूल की प्रतिकूल यानुसारसुद्धा त्या बदलांचे यशापयश जनुकांचे तगण्याचे प्रमाण ठरवते!

या मर्यादित अर्थाने प्रतिकृती तयार करत तगतात ती जनुके! स्वत:चा ठसा राहिलेला वंश निर्माण करतात ती जनुके! स्वत:चा वंश स्वत:च्या प्रतिकृती बनवत जगण्या- तगण्याचा खटाटोप करतात ती जनुके! ही जनुके अजरामर म्हणावीत इतकी लाख वर्षे हयात आहेत. निरनिराळय़ा जनुकयंत्ररूपाने तगून राहिलेली आहेत! छपाई यंत्रागत सर्व जीव त्यांची पैदास आणि जोपासना करत आले आहेत. या तगण्यासोबतच छपाईतील वैविध्य छपाई करणाऱ्या यंत्रात सामावलेले आहे. त्याकडे आपण सृष्टीच्या इतिहासात उपजलेले जीव म्हणून बघतो. जनुकांमध्येही स्वत:चा वंश आणि वेश टिकविण्याची असोशी आहे. त्यांचे वागणे, जगणे, तगणे या अर्थाने स्वकेंद्री आणि स्व-रत आहे. एवढय़ाच अर्थाने जनुके स्वार्थी आहेत! विसाव्या शतकातील उत्क्रांती सिद्धांताच्या विस्ताराचा हा दृष्टिकोन आहे.

हॅमिल्टनसारख्या वैज्ञानिकांमध्ये तो अधिक उघड दिसतो. त्याचे अधिक स्पष्ट सखोल निखळ रूप रिचर्ड डॉकिन्सने मांडले. त्याचा ‘सेल्फिश जीन’ हा ग्रंथ या कल्पनेचे सुभाषित आहे. मागच्या लेखामध्ये यंदाच्या वैद्यकीय नोबेल पारितोषिक विजेत्या संशोधनाचा उल्लेख केला होता. या संशोधनानुसार आजचा आधुनिक मानव प्रथम आफ्रिका खंडामध्ये उत्क्रांत होऊन अवतरला. त्याला शहाणा मानव म्हणतात. हा काळ सुमारे लाखभर वर्षांपूर्वीचा! त्या आधीच्या कालखंडात मानवाचे जे इतर प्रकार उपजले होते त्यांची हजेरी होतीच. पण ती पृथ्वीच्या निरनिराळय़ा भागांत निरनिराळी होती. युरोपीय व अन्य भूभागांमध्ये निअँडरथल मानवाचा वावर होता. आफ्रिकेत उत्क्रांत झालेले मानवप्राणी आफ्रिका खंडातून भटकत बाहेर पडले. अन्यत्र पसरले. आफ्रिकेबाहेरील बऱ्याच भागांमध्ये असलेल्या आधुनिक मानवात निअँडरथलची जनुके आढळतात. म्हणजे शहाणा मानव आणि निअँडरथल यांचा संकरी संपर्क झाला होता! खुद्द आफ्रिकेत मात्र तसे आढळत नाही. म्हणजे असा संकरी संपर्क आफ्रिका खंडात घडल्याचा पुरावा अजून मिळालेला नाही. लाखभर वर्षांपूर्वी मनुष्य प्रकारांच्या विखुरलेल्या वस्ती, त्यांचे स्थलांतर, त्यांचा संकर याचा माग काढता येतो, तो जनुकांच्या हजेरीमुळे! डॉकिन्स म्हणतात जनुके अमर म्हणावी इतकी प्राचीन आहेत. ती आपला वंश आणि अंश अजून टिकवून आहेत! ‘शतायुषी भव’ असा तोंडभर आशीर्वाद देणाऱ्या माणसातले जनुक मात्र सहस्र शतायुषी आहेत! ऐसीगती (एसीजीटी) ही चार अक्षरे आणि वीस अमिनो आम्लांवर उभारलेला जीवसृष्टीचा संसार आपले वय विसरून अजून सुरूच आहे! ‘अशी अक्षरे येती आणि साधित जीवरहाटी!’ दुसरे काय?

pradiprawat55@gmail.com

लेखक माजी खासदार आणि ‘रावत’स नेचर अ‍ॅकॅडमी’चे संस्थापक आहेत.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Srushti drushti discovery of the structure of dna function of dna zws
First published on: 21-10-2022 at 02:00 IST