युरोपमध्ये ऑलिम्पिक चळवळीचा उत्साह सुरुवातीस होता नि त्यातून गेला बाजार दोन ऑलिम्पिक घडूनही गेली. पण नंतरच्या काळात आणि विशेषत: विसाव्या शतकाच्या सुरुवातीस ही स्पर्धा भरवणे ‘चैन’ समजली जाऊ लागली होती. आधुनिक ऑलिम्पिक चळवळीचे प्रणेते पिअर द कुबर्ता यांना त्यांच्या देशातूनच विरोध होऊ लागला होता. ज्या उत्साहाने कुबर्ता आणि मोजक्यांनी ऑलिम्पिक चळवळ जन्माला घातली, त्या उत्साहास ओहोटी लागली होती हे नक्की. ग्रीस आणि फ्रान्समधून काही प्रमाणात दिसून आलेली इच्छाशक्ती ब्रिटन, जर्मनी, रशिया, ऑस्ट्रिया-हंगेरी या इतर बड्या सत्तांमध्ये दिसून आली नाही. त्याच दरम्यान रशिया आणि जपानदरम्यान युद्धाचे ढगही जमू लागले होते. त्यामुळे ऑलिम्पिक आयोजनाचा मुद्दा बाजूला पडला होता. पण समिती उत्साहात होती. ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच यजमानपदासाठी बोली लावण्याचे ठरले. बर्लिन, कोपनहेगन आणि स्टॉकहोम यांनीही यजमानपदाची इच्छा व्यक्त केली. ती अल्पजीवी ठरली. कारण ऑलिम्पिक समितीच्या चौथ्या अधिवेशनात म्हणजे १९०१ मध्ये शिकागोची बोली दाखल झाली होती. अधिवेशन सुरू होण्याच्या जरा आधी सेंट लुईस शहराचा प्रस्तावही दाखल झाला. ही दोन्ही शहरे अमेरिकेतली. पण शिकागोमधील धुरीणांचा उत्साह अधिक दांडगा होता. शिकागोवाल्यांनी यजमानपदासाठी त्या वेळी घसघशीत एक लाख डॉलर्स कबूल केले. आताच्या काळात या रकमेचे मूल्य जवळपास ३८ लाख ७० हजार डॉलर्सच्या आसपास येते. ती रक्कम पाहून बाकीच्या देशांतील शहरांचे अवसानच गळाले. त्यामुळे यजमानपदाच्या शर्यतीत शिकागो आणि सेंट लुईस अशी दोनच शहरे राहिली. पण शिकागोने देऊ केलेल्या रकमेकडे पाहून डोळे विस्फारलेल्या समिती सदस्यांनी त्या शहराची निवड ‘एकमता’ने करण्यात आली. ‘न्यू कॉण्टिनंट’मधले पहिले ऑलिम्पिक भरवण्याचा सन्मान शिकागोला मिळणार होता. त्यानंतर घडले ते भलतेच.

शिकागोकडून सेंट लुईसकडे

वर्ल्ड एक्स्पोझिशन किंवा विश्वजत्रा किंवा महाप्रदर्शने भरवण्याची संस्कृती त्या काळात महासत्ता आणि आकांक्षी सत्तांमध्ये रूढ होती. अशी प्रदर्शने म्हणजे औद्योगिकीकरणातील प्रगती सादर करण्याचे आणि तंत्रसंकल्पनांची देवाणघेवाण होण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ मानले जायचे. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून अशा जत्रा युरोप आणि अमेरिकेत भरवल्या जाऊ लागल्या. ऑलिम्पिक स्पर्धाही अशा प्रदर्शनांमध्ये भरवल्या जाऊ शकतात असा विचार त्या काळी मूळ धरू लागला होता. एकतर अटलांटिक ओलांडणे किंवा खुष्कीच्या मार्गाने प्रवास वेळखाऊ आणि खर्चीक होता. प्रदर्शनाच्या निमित्ताने अनेक देशांतील मंडळी एखाद्या ठिकाणी जमतात तर होऊन जाऊ दे खेळ महोत्सवही, अशी व्यावहारिक भूमिका घेतली जायची. ती पिअर दा कुबर्ता यांच्या मूळ संकल्पनेशी काहीशी प्रतारणा घेणारी होती. शिकागोच्या यजमानपदाचा घात या संकल्पनेनेच केला. तो कसा?

सेंट लुईस शहरात १९०३ मध्ये एक्स्पोझिशन होऊ घातले होते. ‘लुईिझआना पर्चेस’ या ऐतिहासिक खरेदी कराराला त्या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत होती. मध्य अमेरिकेचा मोठा भूभाग फ्रेंचांकडून खरीदण्याचा तो करार १८०३ मध्ये पूर्णत्वाला गेला. त्यामुळे एक्स्पोझिशनचे नावही ‘लुईिझआना पर्चेस एक्स्पोझिशन’ असे निश्चित झाले होते. काही कारणांस्तव हे प्रदर्शन १९०४ पर्यंत पुढे ढकलले गेले. ‘जत्रेतल्या ऑलिम्पिक’चा अनुभव पॅरिस १९०० च्या निमित्ताने ताजा होता. आपणही प्रदर्शनाच्या निमित्ताने क्रीडास्पर्धांचे आयोजन करावे असे एक्स्पोझिशनच्या आयोजकांनी ठरवले. ही स्पर्धा प्रस्तावित ऑलिम्पिक स्पर्धांना समांतर भरवली जाणार हे स्पष्टच होते. यातून ऑलिम्पिक स्पर्धा झाकोळल्या जाण्याची भीती ऑलिम्पिक समितीला वाटू लागली. दरम्यानच्या काळात आणखी एक घडामोड घडली, जी सेंट लुईस शहराच्या पथ्यावर पडली. शिकागोमध्ये ७५ हजार प्रेक्षक क्षमतेचे स्टेडियम उभारण्याचे घाटत होते. त्यास स्थानिक राजकीय नेत्यांनी कडाडून विरोध केला. ऑलिम्पिकला अपप्रसिद्धी मिळण्याच्याच घडामोडी घडू लागल्या, त्या वेळी ऑलिम्पिक समितीमध्ये घबराट उडाली. दोन्ही शहरांच्या प्रभारींना न विचारताच, ‘शिकागो की सेंट लुईस?’ असा प्रश्न समिती सदस्यांना टपालाने पाठवण्यात आला. मतांच्या चिठ्ठ्यांची मोजदाद झाली आणि शिकागोतून ऑलिम्पिक स्पर्धा सेंट लुईसला हलवण्यात आल्याची शुभवार्ता प्रसृत करण्याची जबाबदारी पिअर द कुबर्ता यांच्यावर सोपवण्यात आली! असा बदल करण्याचा आदेश अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट यांनी दिला असेही मांडले जाते. खुद्द कुबर्ता यांना हा बदल अजिबात आवडला नव्हता. एक्स्पोझिशनच्या बरोबरीने ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यास त्यांनी पॅरिस १९०० च्या वेळीही विरोध दर्शवला होता. त्यांच्या स्वप्नातले ऑलिम्पिक अशा प्रकारे ‘साइड-शो’ रूपात भरवणे कुबर्ता यांना मान्य नव्हते. पण करतात काय?

अमेरिकेचे अमेरिकनांसाठीचे…

पॅरिसप्रमाणेच सेंट लुईस ऑलिम्पिकही सहा महिन्यांचा प्रदीर्घ काळ चालले. या ऑलिम्पिकमध्येच पहिल्यांदा सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके दिली जाऊ लागली. पण सहभागी देशांची आणि खेळाडूंची संख्या नगण्य होती. केवळ १२ देशांचे ६५१ खेळाडू सहभागी झाले, त्यांतील ५२३ अमेरिकेचेच होते! अटलांटिक ओलांडून खेळांसाठी अमेरिकेत येण्याची ऐपत फार थोड्या लोकांची होती. आयोजकांचे सारे लक्ष एक्स्पोझिशनकडे असल्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धांची फारशी प्रसिद्धीही झालेली नव्हती. ऑलिम्पिक समितीने तरीही जातीने लक्ष घालून किमान खेळांच्या स्पर्धा नियम व अटींशी बांधील राहून भरवल्या जातील याची दक्षता घेतली. गमतीशीर प्रकार तरीही घडलेच. उदा. एका मॅरॅथॉन विजेत्याचे पदक रद्द ठरवले गेले. कारण स्वारी बहुतेक काळ मोटारीने प्रवास करत होती आणि स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात दौडत आली! पण ही स्पर्धा सेंट लुईस एक्स्पोझिशनमधील अमानुष प्रकारांसाठीच पुढे ओळखली गेली.

एक्स्पोझिशनमध्ये वंशद्वेषाचा ‘खेळ’

गुलामगिरीच्या मानसिकतेमधून अमेरिका – विशेषत: तेथील दक्षिणकेडील राज्ये – अब्राहम लिंकनोत्तर काळातही पूर्ण बाहेर पडली नव्हती. वास्तविक या ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेतील दोन कृष्णवर्णीय खेळाडूंनी भाग घेतला. पण एक्स्पोझिशनमध्ये एका विभागात ‘सॅव्हेज’ मंडळींचे प्रदर्शन मांडले गेले. त्यांचे खेळही सादर केले गेले. सॅव्हेज म्हणजे रानटी. त्या काळात फिलिपिन्समधील ग्रामीण भागातून, प्युर्टोरिकोतून, आफ्रिकेतून अलास्काच्या हिमप्रदेशातून आदिवासी, ग्रामीण जीवांना एक्स्पोझिशनमध्ये आणले गेले. कित्येक तेथे येईपर्यंत प्रवासातच मरण पावले. हे फिलिपिनो किंवा आफ्रिकेतील पिग्मी अक्षरश: एखाद्या रिंगणात प्राणिसंग्रहालयातील पशूंप्रमाणे उभे केले जायचे. ऑलिम्पिक स्पर्धांच्या झाल्या नाहीत इतक्या जाहिराती या प्रदर्शनांच्या झाल्या. त्यांना गोर्‍या अमेरिकनांनी गर्दीही केली. सेंट लुईस ऑलिम्पिक अशा रीतीने कायमचे डागाळले गेले. यांतील एका पिग्मीची ‘रवानगी’ पुढे एका ‘झू’मध्येही केली गेली. तेथील स्थानिक नागरिकांनी या अघोरी प्रकाराला संताप, शिसारीयुक्त विरोध केला आणि संबंधित झूला माघार घ्यावी लागली.

सेंट लुईसचा धडा

येथून पुढे कधीही कोणतेही ऑलिम्पिक वर्ल्ड एक्स्पोझिशनच्या बरोबरीने घ्यायचे नाही असा निर्धार ऑलिम्पिक समितीने यानंतर केला. तसेच एखाद्या स्पर्धेला ऑलिम्पिक ठरवण्याचा अंतिम अधिकार ऑलिम्पिक समितीचाच राहील, हेही ठरवले गेले. ऑलिम्पिक हेच केंद्रस्थानी राहील या दृष्टीने आयोजन करण्याची अट घालण्यात आली. सेंट लुईसच्या एरवी सर्वस्वी विस्मरणीय अशा स्पर्धेने इतके भान तरी आणून दिले.