‘‘मस्क’वाल इलॉन!’ हा अग्रलेख वाचला. जागतिक पटलावर अमेरिकेचा महाशक्ती म्हणून उदय होण्यामागे तिथल्या औद्योगिक लॉबीचा सिंहाचा वाटा आहे. लष्करी- औद्योगिक- राजकीय हितसंबंध हातात हात घालून चालतात, हेही लपून राहिले नाही. एन्रॉन प्रकल्प अरबी समुद्रात बुडवण्यापासून ते अवकाशात स्टारलिंकचे साम्राज्य उभारण्यापर्यंत अमेरिका लष्करी हितांना प्राधान्य देत आली आहे.
गूगल, लॉकहीड मार्टिन, एक्झॉनमोबील ते आता स्टारलिंक अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. मग या औद्योगिक लॉबीला लागणारी संसाधने ओरबाडण्यासाठी उद्योगांनीच तयार केलेली लष्करी साधने अमेरिकी सरकार अन्य देशांतील सरकार उलथवण्यासाठी वापरते. तर कधी ती संसाधने वाहून नेण्यात कोणी अडथळा आणला तर त्यांची थेट हत्याच घडवून आणत असल्याचेही आरोप होतात. (उदा. इजिप्तचे नासर, पनामाचे नोरिगा). तांबे खाणकामातील हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी निक्सन प्रशासनाने चिलीवर केलेला हल्ला, व्यापारी, बँकिंग आणि कृषिविषयक हितसंबंधांसाठी होंडुरास, निकारागुआ, क्युबा, मेक्सिको, पनामा यांसारख्या देशांमध्ये केलेला हस्तक्षेप, मानवाधिकाराच्या नावाखाली मध्यपूर्वेत केलेला हस्तक्षेप अशी कितीतरी उदाहरणे अमेरिकेची ओरबाडण्याची प्रवृत्ती दर्शवितात.
भविष्यात डेटाचे महत्त्व वाढणार असल्याने स्टारलिंककडून भारताच्या डेटा सार्वभौमत्वाच्या हमीची अपेक्षा करणे मूर्खपणाचे ठरेल. याचे कारण रशिया-युक्रेन युद्धात स्टारलिंकने नागरिकांच्या रिअल टाइम डेटाच्या माध्यमातून युक्रेनच्या सैन्याला ड्रोन हालचालींसाठी मदत केली. म्हणूनच स्टारलिंक भारताच्या आर्थिक आणि लष्करी सार्वभौमत्वाला धोका ठरण्याची शक्यता आहे. चीनची डायरेक्ट एनर्जी वेपन तसेच मायक्रोव्हेव एनर्जी वेपनच्या माध्यमातून मस्कच्या स्टारलिंकला टक्कर देण्याची रणनिती आहे.
म्हणूनच भविष्यात भारतात स्टारलिंक आले तर, भारताला अमेरिकेकडून आर्थिक व लष्करी धोका तर आहेच परंतु चीनच्या ‘डायरेक्ट एनर्जी वेपन्स’मुळे नेटवर्क बंद पडण्याचा दुहेरी धोकाही आहे. म्हणूनच मस्क यांचा निकोप स्पर्धेचा दावा खोटा असून स्टारलिंकच्या आडून लष्करी- औद्योगिक हित साधणे हाच मुख्य हेतू असण्याची दाट शक्यता दिसते. त्यामुळे परराष्ट्र धोरणाच्या भूमिकेतून ‘मस्क’वाल्या इलॉनच्या स्टारलिंकबाबत भारताने सावध राहून योग्य रणनिती आखण्याची वेळ आली आहे. दादासाहेब व्हळगुळे, कराड</p>
समान संधी हाच मूळ प्रश्न
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १४ नुसार राज्याला कोणत्याही व्यक्तीशी किंवा संस्थेशी मनमानी व भेदभावपूर्ण व्यवहार करण्यास सक्त मनाई आहे. याची व्याप्ती केवळ भारतीय नागरिकांपुरती मर्यादित नसून ती ‘कोणत्याही व्यक्तीस’ म्हणजेच परदेशी नागरिक किंवा संस्थांनाही तितकीच लागू होते. कर्नाटक उच्च न्यायालयाने ‘एक्स कॉर्प’ प्रकरणात (२०२५) यावर स्पष्ट शिक्कामोर्तब करत परदेशी संस्थांनाही प्रशासकीय मनमानी आणि भेदभावाविरुद्ध अनुच्छेद १४ चे संरक्षण उपलब्ध असल्याचे मान्य केले आहे. इलॉन मस्क यांच्या विधानांवर, त्यांच्या वैयक्तिक वर्तनावर आणि अमेरिकेतील राजकीय संबंधांवर भिन्न मते असू शकतात. परंतु, या प्रकरणातील खरा आणि मूळ प्रश्न ‘भारतातील प्रशासकीय पारदर्शकता आणि समान संधी’ हा आहे.
उपग्रह दळणवळण क्षेत्रात काम करू इच्छिणार्या सर्वच कंपन्यांना प्रशासकीय पातळीवर समान आणि निकोप संधी मिळणे आवश्यक आहे. जर सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनदेखील परवानग्यांच्या प्रक्रियेत विलंब होत असेल किंवा असमानता जाणवत असेल तर त्यावर बोट ठेवणे हा कोणत्याही व्यवसाय संस्थेचा नैसर्गिक हक्क ठरतो. अमेरिकेत उद्योग आणि राजकारण यांतील जवळीक कितीही खुली असली, तरी भारतीय संविधानाची चौकट ही निष्पक्षता, तटस्थता आणि पारदर्शकतेची मागणी करते. सत्य मग ते कोणत्याही माध्यमातून किंवा कोणाकडूनही समोर आले तरी ते नाकारता येत नाही. संविधानाची खरी ताकद ही केवळ छापील अनुच्छेदांमध्ये नसून त्यांची अंमलबजावणी किती निष्पक्षपणे होते यात असते. त्यामुळे या विषयाकडे वैयक्तिक दृष्टिकोनातून न पाहता, आपल्या प्रशासकीय प्रक्रियेत पारदर्शकता राखली जात आहे की नाही या मूलभूत सांविधानिक मुद्द्यावर गंभीर आणि निष्पक्ष चर्चा होणे हीच काळाची गरज आहे. परेश बंग, मूर्तिजापूर (अकोला)
लोकशाही हेच राष्ट्रीय स्मारक
‘धम्मक्रांतीचे साक्षीदार श्याम हॉटेलला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा कधी मिळणार?’ हे ‘विश्लेषण’ (१५ ऑक्टोबर) वाचले. घटनेच्या अनुच्छेद ३२५ नुसार मतदार यादी असणे आवश्यक आहे. परंतु अनुच्छेद ३२५चे उल्लंघन केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयदेखील याबाबत व्यक्त होताना दिसत नाही. लोक लोकशाही वाचण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला विनंती करण्यासाठी गेले होते. त्याला राजकीय आंदोलन संबोधणे चुकीचे होते. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग यांना राज्यघटनेने लोकशाहीच्या संरक्षणासाठी अधिक अधिकार दिले आहेत, याची जाणीव निवडणूक आयोगाने आणि सर्वोच्च न्यायालयाने ठेवणे आवश्यक आहे. एसआयआरमधील अटी या भेदभाव करणार्या असल्याचे दिसते. एसआयआर फक्त मृत व्यक्तींची नावे कमी करण्यासाठी असावी. नागरिकांमध्ये भेदभाव करून त्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे धोरण लोकशाहीविरोधी असल्याचे दिसते. अनुच्छेद ३२५ कायम ठेवण्यासाठी नागरिकांना आंदोलन करावे लागावे. ही गोष्ट लोकशाहीसाठी धोकादायक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून सर्वत्र उभारलेले दिसतात, मात्र या देशातील लोकशाही व्यवस्था हेच डॉ. आंबेडकरांचे खरेखुरे राष्ट्रीय स्मारक आहे. तेच स्मारक आपण सर्वांनी जपणे आवश्यक आहे. युगानंद साळवे, पुणे
विश्वास पुन्हा निर्माण करता येईल?
‘एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन थांबले, पण प्रश्नांचे काय?’ हा लेख (लोकसत्ता- १५ ऑक्टोबर) वाचला. गेल्या १५ दिवसांपासून राज्यात दोन आंदोलनांची जोरदार चर्चा सुरू होती. दोन्ही आंदोलने तरुण पिढीचे भविष्य निर्धारित करणारी आहेत, राज्यातील एमपीएससी पेपर फुटीविरोधातील आंदोलन हे केवळ तुकाराम मुंढे यांच्या नावाने स्थगित झाले. न्यायची अपेक्षा हे नाव पूर्ण करेलच, मात्र भविष्यात ‘भय इथे संपत नाही’ अशीच स्थिती असण्याची भीती अधिक. आज फक्त राजीनामा आणि दोषींना कठोर शिक्षा या भोवतीच चर्चा दिसते, समस्या एवढ्यावर संपेल का? किंबहुना आजचा संघर्ष थांबला तरी भविष्यात पुन्हा अशीच अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. भरती परीक्षांची निष्पक्षता, प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांना न्याय्य संधी मिळणे हा विश्वास पुन्हा निर्माण करावा लागेल, तो केवळ एका राजीनाम्याने किंवा सध्याच्या दोषींना होणार्या शिक्षेने कितपत मिळविता येईल? व्यवस्था आतूनच पोखरली तर त्यासाठी प्रभावी उपाययोजना काय आहेत? या प्रश्नांचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. – आकाश एस.
हौसेपोटी पाण्याचा अपव्यय अयोग्यच!
‘कुंभ ध्वजारोहणासाठी कोरड्या गोदावरीत पाणी’ ही बातमी (लोकसत्ता- १५ ऑक्टोबर) वाचली. कुंभ पर्वानिमित्त महाध्वज प्राणप्रतिष्ठा आणि ध्वजारोहण सोहळा राष्ट्रपती द्रोपदी मुर्म, केंद्रीय नेते तसेच प्रमुख महंताच्या उपस्थितीत नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे संपन्न होणार आहे. ध्वजारोहण सोहळ्यात केवळ गोदावरीचे सौंदर्य फुलविण्यासाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. यावर्षीचा अभूतपूर्व दुष्काळ व पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेता शासनाने सर्व धरणांतील पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे.
अशा परिस्थितीत कुंभ ध्वजारोहणासाठी पाण्याची नासाडी करणे संयुक्तिक ठरणार नाही. दुष्काळी भागातील पिण्याच्या पाण्यासाठी तडफडणारी जनता आणि पशुधन वाचविण्यासाठी चिंतातुर शेतकरी केंद्रस्थानी असताना केवळ ध्वजारोहणाच्या हौसेपोटी पाण्याचा अपव्यय करणे शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे ठरेल. कुंभमेळ्यानिमित्ताने नाशिकमध्ये महाकाय वृक्षांवर कुर्हाड चालविण्यात आली. त्यामुळे निर्माण झालेल्या रोषात आता दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या असंतोषाची भर पडण्याची भीती आहे. हे टाळण्यासाठी कुंभ ध्वजारोहणाचा सोहळा प्रतीकात्मकरीत्या संपन्न होणेच उत्तम. सतीश मालेगावकर, नांदेड</p>
