पॅरिस १९०० आणि सेंट लुईस १९०४ मधील निरुत्साहामुळे घरंगळत जाणारी ऑलिम्पिक चळवळ लंडन १९०८ च्या नेटक्या आयोजनामुळे पुन्हा रुळांवर आली. ऑलिम्पिकचे पालक, चालक पिअर द कुबर्ता त्यामुळे समाधानी होते. ग्रीसने सुरुवातीपासूनच स्पर्धा भरवण्याविषयी बर्यापैकी उत्साह दाखवला होता. बिचार्‍यांनी नंतरही आयोजनाची तयारी चालवली होती आणि मुदतमध्य (इंटरकलेटेड) ऑलिम्पिकची संकल्पना जवळजवळ रेटून नेली होती. ती कुबर्तांनी हाणून पाडली, कारण मूळ ऑलिम्पिकला हे समांतर ऑलिम्पिक झाकोळेल आणि संपवेल अशी रास्त भीती त्यांना वाटली.

ऑलिम्पिकसाठी यशस्वीरीत्या अनेक घटक जुळून यावे लागतात याची जाण ऑलिम्पिकच्या कर्त्या-धत्र्यांना होऊ लागली होती. सरकारी पुढाकाराचे अधिष्ठान प्रधान ठरत होते. त्यानंतर खासगी निधीची मदत हाही घटक महत्त्वाचा सिद्ध होऊ लागला होता. युरोपातील अनेक महासत्तांचे लक्ष महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लागलेले होते.

सन १९०५ मध्ये जपानने युद्धात रशियाचा पराभव केला. आधुनिक जगात एखाद्या आशियाई देशाने युरोपीय देशाचा युद्धात पराभव करण्याची ती पहिलीच वेळ. त्या पराभवाचा हादरा इतर युरोपीय देशांनाही बसला. वसाहतींना अधिक लुबाडून धन करावी नि शस्त्रसज्ज, सावध राहिलेले बरे अशी विचारधारा प्रबळ होती. त्यात ही ऑलिम्पिक भरवण्याची हौस म्हणजे खूळ वाटणार्यांचे प्रमाण लक्षणीय होते. शिवाय त्या काळी ऑलिम्पिकच्या माध्यमातून नव्हे, तर जत्रा, प्रदर्शनाच्या माध्यमातून सामर्थ्य मांडणार्यांचा वर्गही प्रभावी होता.

खेळ, खेळाडू, त्यातून तंदुरुस्ती, त्यातून क्रीडा स्पर्धा, त्यातून निकोप आंतरसांस्कृतिक आदानप्रदान आणि अखेरीस यातूनच शाश्वत क्षेत्रीय, जागतिक शांतता आणि बंधुभाव ही बहुसूत्री ओळखून ती रेटणारे कुबर्ता यांचे महत्त्व या परिप्रेक्ष्यात अधोरेखित होते. ब्रिटिश सरकार आणि ब्रिटनमधील क्रीडा संघटकांनी अल्पसूचनेतूनही लंडन ऑलिम्पिकचे यशस्वी आयोजन करून ‘कुबर्ता स्कूल’वर पसंतीची मोहोर उमटवली होतीच. कदाचित त्यावेळची प्रमुख महासत्ता असलेल्या ब्रिटनला ते शक्य झाले.

पण केवळ सांपत्तिक ताकदीवरच ऑलिम्पिक भरवणे शक्य असते हा समज खोटा ठरवणारी कृती त्या काळापासूनच अलिप्त तरी विलक्षण उद्यमशील असलेल्या स्वीडनने करून दाखवली. लंडन ऑलिम्पिकपाठोपाठ हे ऑलिम्पिक झाल्यामुळे चळवळीची प्रतिष्ठा आणि तिचे महत्त्व वाढण्यास मदतच झाली. संपर्कक्रांतीच्या पहिल्या टप्प्यावर असलेल्या बहुतांश जगताने याची नोंद घ्यायला सुरुवात केली होतीच.

स्टॉकहोम ऑलिम्पिक १९१२

वैज्ञानिक, उद्योजक आल्फ्रेड नोबेलच्या देशात झालेले ते ऑलिम्पिक आजही स्पर्धेच्या इतिहासातले पहिले परिपूर्ण ऑलिम्पिक मानले जाते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अधिवेशन १९०९ मध्ये बर्लिनला झाले. त्या वेळी स्टॉकहोमच्या दावेदारीस फारसे आव्हान मिळाले नाही. बर्लिनच्या शिष्टमंडळाने सुरुवातीस इच्छा दाखवली, पण नंतर माघार घेतली.

स्टॉकहोममध्ये त्या ऑलिम्पिकसाठी उभारण्यात आलेले लाल विटांचे स्टेडियम आजही उभे आहे. नेटके आयोजन करूनही स्वीडनला नंतर कधीही ऑलिम्पिक भरवता आले नाही किंवा भरवावेसे वाटले नाही. नॉर्डिक देशांपैकी केवळ फिनलंडने १९५२ मध्ये हेलसिंकीला ऑलिम्पिक भरवून दाखवले. परंतु स्थैर्य आणि समृद्धीच्या निकषांवर सतत वरचे स्थान मिळवणारे हे देश ऑलिम्पिकचा पसारा उचलण्यास मात्र नंतर तितकेसे उत्सुक दिसले नाहीत.

स्वीडनने १९५८ मध्ये विश्वचषक फुटबॉल या आणखी एका मोठ्या आणि खर्चीक स्पर्धेचे आयोजन केले, त्यानंतर मोठ्या स्पर्धांच्या आयोजनाकडे हा देश कधी वळला नाही. कदाचित ऑलिम्पिकचा आकारच अवाढव्य होऊ लागल्यामुळे ती चंगळ या देशांना मानवली नसावी. तरी स्टॉकहोम ऑलिम्पिकमध्ये काही बाबी स्वीडनने प्रथमच सादर केल्या.

महिलांना जलतरण आणि डायव्हिंगमध्ये सहभागी करून घेतले गेले. ट्रॅकवरील धावण्याच्या स्पर्धांसाठी फोटो-फिनिश उपकरण मैदानावरील पंचांसाठी साह्यकारक म्हणून वापरले गेले. घोषणांसाठी ध्वनिक्षेपकाचा वापरही पहिल्यांदाच झाला. लंडन ऑलिम्पिकचे आयोजन सुरळीत पार पडले, तरी त्या स्पर्धेस राजकीय रंग होता.

विशेषत: ब्रिटिश आणि अमेरिकी खेळाडूंमध्ये धुमश्चक्रीची वेळ आली होती. अमेरिकी ॲथलीट्सनी उद्घाटनात संचलनाच्या वेळी ब्रिटिश सम्राटाचा केलेला कथित अपमान जुन्या वळणाच्या (म्हणजे त्या काळच्या बहुतेक) ब्रिटिशांना अजिबात आवडला नव्हता. तसले काही राजकीय पेच घडूच नयेत याची दक्षता स्वीडनच्या आयोजकांनी घेतली. हिंसावृत्ती टाळण्यासाठीच बहुधा बॉक्सिंग स्पर्धा त्यावेळच्या ऑलिम्पिकमधूनच वगळण्यात आली! स्वीडिश सम्राट गुस्ताव पाचवे यांनी आयोजनात उत्साहाने भाग घेतला. त्या स्पर्धेत पहिल्यांदाच पाचही खंडांतील खेळाडू सहभागी झाले.

ऑलिम्पिकमध्ये झळकणारा जपान हा पहिला आशियाई देश ठरला. त्या स्पर्धेत ब्रिटिश संघाची पीछेहाट झाली. त्यातही अमेरिकी संघाला सर्वाधिक सुवर्णपदके मिळाल्याचे वास्तव विशेष झोंबले असावे. सर आर्थर कॉनन डॉइल नामे महानुभावांनी एका दैनिकात त्याबद्दलच्या निराशेला वाट मोकळी करून दिली होती. स्टॉकहोममध्ये ६ जुलै ते २२ जुलै अशा थोडक्या मुदतीत स्पर्धा पार पडल्या. त्या वेळी हवामानही आल्हाददायक होते. स्थानिकांच्या मते त्या वेळी उष्णतेची लाट आली होती! सर्वाधिक कमी तक्रारी आणि बहुतेकांना आलेले आनंददायी अनुभव हा त्या स्पर्धेचा अमीट ठसा होता.

ती स्पर्धा गाजवली जिम थॉर्प या अमेरिकन वल्लीने. तो अर्धा गोरा नि अर्धा रेड इंडियन असा मिश्रवंशी, मिश्रवर्णी होता. त्याने डेकॅथलॉन आणि मॉडर्न पेंटॅथलॉन अशा दोन स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले. अमेरिकेत तो बेसबॉल, बास्केटबॉल अमेरिकन फुटबॉल, ॲथलेटिक्स असे सर्व खेळ खेळायचा. तो कधीकाळी फुटकळ बेसबॉल लीग पैशासाठी खेळला अशी चुगली कोणी तरी ऑलिम्पिक संघटनेकडे केली, नि दुसर्याच वर्षी त्याची सुवर्णपदके रद्द ठरवण्यात आली. कारण त्या काळी ऑलिम्पिकमध्ये खेळणारे हौशीच असले पाहिजेत असा दंडक होता. पुढे कित्येक वर्षांनी थॉर्पच्या वारसांना ती पदके परत करण्यात आली, यात ऑलिम्पिक संघटनेचीच त्या प्रसंगातून गेलेली पत कशीबशी परत मिळाली.

दशकातील एकमेव ऑलिम्पिक

पिअर द कुबर्तांनी ज्या मूल्यांवर ऑलिम्पिक खेळांचा डोलारा उभा करण्याचा प्रयत्न चालवला होता, त्या मूल्यांच्या स्टॉकहोम १९१२ नंतर दोन वर्षांतच ठिकर्या उडाल्या. प्राचीन ऑलिम्पिक स्पर्धांच्या काळातही लढाया व्हायच्या. परंतु त्या काळात नगरराष्ट्रे ऑलिम्पिकच्या काळात त्या थांबवून क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी व्हायची.

ऑलिम्पिक ट्रूस किंवा ऑलिम्पिक युद्धविराम ही संकल्पना त्या काळातलीच. शस्त्रे खाली ठेवली जायचीच. यजमान शहरात रक्तपात नको, स्पर्धेसाठी जाणार्यांच्या जीविताला हानी नको, असा साधा विचार त्या काळी असायचा. विसाव्या शतकाच्या दुसर्या दशकातील युरोपला ऑलिम्पिक ट्रूसशी देणेघेणे नसावे.

ऑलिम्पिक संपल्यानंतर बरोबर दोन वर्षांनी म्हणजे जुलै १९१४ मध्ये पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली. ते १९१८ पर्यंत चालले. त्यामुळे १९१६ मधील ऑलिम्पिक होऊ शकले नाही. ते थेट १९२० मध्ये अँटवर्प येथे पार पडले. मूळ ऑलिम्पिक संकल्पना आणि पिअर द कुबर्ता यांनी त्याच संकल्पनेवर बांधलेले आधुनिक ऑलिम्पिक यांच्यासाठी ते युद्ध म्हणजे मोठा धक्का होता.

यातून एक बाब स्पष्ट झाली. आधुनिक ऑलिम्पिक प्राचीन ऑलिम्पिकसारखे स्वप्नाळूपणे चालवता येणार नाही, हा तो धडा. पण त्याचबरोबर, ऑलिम्पिकची अव्यक्त अपरिहार्यता आणि गरज अँटवर्प १९२० आणि पुढे लंडन १९४८ या युद्धोत्तर ऑलिम्पिक स्पर्धांच्या निमित्ताने दिसून आली. ऑलिम्पिक ही सवय बनू लागली होती.

siddharth.khandekar@expressindia.com