आशुतोष उकिडवे
आपले नित्य जीवन जगताना, भोवतालचे म्हणजे अगदी रस्त्यावरच्या पीडित-वंचितांपासून ते सिनेस्टार्स, समाजसेवक आणि यशस्वी उद्योजक यांचे जग, त्यातल्या घटनांचा विस्तृत परीघ आपल्याशी कळत-नकळतपणे जोडला जातो. मात्र आपण त्याकडे बारकाईने बघतोच असे नाही. पण पेशाने गेली ३० वर्षे पत्रकार व समुपदेशक आणि वृत्तीने संवेदनशील असलेली शेफाली वासुदेव ही लेखिका मात्र डोळस नजरेने आणि सजग मनाने प्रत्येक घटना आणि त्यात गुंतलेली माणसे यांचे निरीक्षण करते. भावूक होऊन धाडकन निष्कर्षावर न येता, संबधितांना, तज्ज्ञांना प्रत्यक्ष भेटून, त्यासंदर्भात भरपूर वाचन, संशोधन करूनच या सत्य कहाण्या ती अतिशय तरलपणे पेश करते. या तिच्या धडपडीचाच एक स्तुत्य परिपाक म्हणजे तिचे दहा लेखांचे, अर्थवाही शीर्षक लाभलेले पुस्तक ‘स्टोरीज वी वेअर’.

‘कर्तव्यपथ’ हा दिल्लीतला प्रसिद्ध व ऐतिहासिक हमरस्ता. पुस्तक तिथेच सुरू होते. नोकरदार, नेतेमंडळी, खाद्यटपर्‍या चालवणारे पोटार्थी, भिकारी तसेच उच्चभ्रू, स्वास्थ्यदक्ष जॉगर्स असा सर्वस्तरीय समाज, लेखिका इथे न्याहाळते, त्यांना बोलते करते. सिग्नलवर थंड पाण्याच्या बाटल्या विकणार्‍या अवघ्या ७ वर्षांच्या कार्तिकची कहाणी आतड्याला पीळ पाडणारी. त्याच्या बहिणीची छेड काढणार्‍या गुंडांबरोबर त्याची झटापट होते ज्यात पोलीस त्यालाच बेदम मारतात. लेखिकेशी बोलताना भेदरलेल्या कार्तिकचे लक्ष मात्र इंडिया गेटजवळील पोलीस चौकीकडे असते. आणि ओटीटीवरच्या एका तद्दन फिल्मी शॉटचा संदर्भ देत लेखिका लिहून जाते ‘फिल्ममध्ये दहशतवाद्यांच्या बॉम्ब ब्लास्टमधून रस्त्यावरच्या मुलाला वाचवताना हिरो त्याला बॉम्ब फुटायच्या आत पळून जायला सांगतो. मात्र कर्तव्यपथावरच्या कार्तिकच्या दृष्टिपथात प्रचंड दहशत आहे ती पोलिसांचीच आणि त्यांच्यापासून सतत पळ काढणे हेच त्या सातवर्षीय मुलाच्या आयुष्याचे एकमेव उद्दिष्ट आहे.’’

स्वत: फॅशन आणि संस्कृती भाष्यकार असलेल्या शेफाली यांनी ‘वेअरिंग पॉलिटिक्स’, ‘हाऊ खादी बीकेम अनकूल’, ‘मसाबा : लव्हचाइल्ड ऑफ द इन्स्टाग्राम एरा’ आणि ‘द डेव्हिल वेअर्स ग्रीन’ असे या विषयावर चार लेख लिहिले आहेत. आज तमाम भारतीय जनतेचा पेहराव आधुनिक असूनही, त्यांचेच प्रतिनिधित्व करणारी राजकारणी मंडळी मात्र पारंपरिक व देशी पोशाखातच सदैव का वावरतात हा तिला प्रश्न पडतो. कितीतरी नेत्यांच्या वस्त्रनिवडीची खुमासदार उदाहरणे ती देते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कांजीवरम, मधुबनी साड्या, इंदिरा आणि सोनिया गांधीच्या हातमागावरच्या साड्या, पंजाबी ड्रेसनी दुपट्ट्यातल्या मायावती अशांचे दाखले येतात. ‘कंगना राणावतनेसुद्धा लोकांमध्ये मिसळताना, अभिरुचीपूर्ण साडी जवळ केली असली तरी त्यावर अधून मधून खोल गळ्याचे आणि बिन बाह्यांचे ब्लाउज घालण्यास ती कचरत नाही,’ अशी मिश्कील टिप्पणीही लेखिका करते. त्याचबरोबर गळाबंद सूट, कुर्ता पायजमा, शाली नी जाकीट घालून हिंडणार्‍या नेत्यांच्या गटात पांढरा टीशर्ट आणि जीन्स घालून वावरणार्‍या राहुल गांधींचाही उल्लेख येतो. नरेंद्र मोदी यांचे पोशाख हे चोखंदळ आणि भारतीय प्रादेशिकता दाखवणारे असतात असे निरीक्षण लेखिका नोंदवते.

खादी म्हटलं की स्वातंत्र्यलढा आठवतो, परंतु आज खादीचे आणि ते निर्मिणार्‍या खुद्द विणकरांचे भारतात काय भविष्य आहे? मोठ्या ब्रँड्सने आणलेले खादीचे कपडे आज उच्चभ्रू समाजाची ओळख झाली असली तरी ग्रामीण भागांतून मात्र खादीने काढता पाय घेतला आहे. स्थानिकांना आकर्षण आहे ते कृत्रिम धाग्या-ताग्यातून तयार केलेल्या फॅन्सी कपड्यांचे. विदारक असा हा विरोधाभास लेखिका विविध आकडेमोडी आणि मान्यवरांच्या मुलाखतींतून नजरेस आणून देते. पश्चिम बंगालमधील सोनारूंडी इथल्या खादी केंद्रावर, चिकट-दमट हवेत तासनतास हातमागावर काम करणार्‍या नि अभावग्रस्त जीवन जगणार्‍या विणकरांशी ती बोलते. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या ब्रँड्सच्या वातानुकूलित शोरूममध्ये ४५ हजार रुपयांना विकल्या जाणार्‍या खादीच्या साडीवरचा, संबधित कारागिरांना मिळालेला मेहनताना मात्र जेमतेम एकतृतीयांश इतकाच असतो. वस्त्रप्रावरण क्षेत्रातील हे अनोखे ताणेबाणे लेखिकेने पोटतिडकीने सादर केले आहेत.

‘आयडेंटीटी क्रायसिस’ची व्यथा जगलेल्या ‘मसाबा’ या सुप्रसिद्ध फॅशन डिझायनरची कथाही पुस्तकात येते. मसाबा ही अभिनेत्री नीना गुप्ता आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सर विवियन रिचर्डस यांची विवाहबाह्य संबंधांतून जन्मलेली मुलगी. मिश्रवंशीय असल्याने तिचे रंगरूप हे अन्य देशी मुलींपेक्षा वेगळे, ज्याचा त्रास लहानग्या मसाबाला सहन करावा लागतो. पण आई नीना गुप्ता खंबीरपणे तिच्या पाठीशी उभी राहते. ‘माय मदर हॅज बीन माय मिरर अँड माय स्पाइन,’ असे मसाबा आवर्जून आपल्या आईिवषयी सांगते. फॅशन वर्ल्डची श्रीमंत उद्योजिका, कॉस्मेटिक तज्ज्ञ, इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स बाळगणारी मसाबा आज स्वत:च एक ब्रँड झाली आहे. मसाबा म्हणजे स्वाहिली भाषेत ‘राजकन्या’. आपले हे बिरुद सर्वार्थाने सार्थ ठरवणार्‍या मसाबाची ही अनोखी कहाणी अतिशय प्रेरणादायी आहे.

‘द डेव्हिल वेअर्स ग्रीन’ असे सूचक शीर्षक असलेला लेख, आपण पर्यावरणस्नेही आणि मानवतापूरक असल्याचे पोकळ दावे अर्थात ‘ग्रीनवॉशिंग’ करणार्‍या फॅशन जगताचा दांभिकपणा उघड करतो. अशा मिथ्या कंपन्यांविरुद्ध शड्डू ठोकून उभ्या राहिलेल्या ‘ओरसोला द कॅस्ट्रो’ ‘अर्नेस्ट वासवानी’ यांसारख्या प्रसिद्ध पर्यावरणवादी मंडळीची, नव्हे तर जागल्यांची, लेखिका सखोल मुलाखत घेते. दुर्दैवाने खोटे हरित दावे करणार्‍या स्वयंघोषित पर्यावरणस्नेही वस्त्रोद्योग कंपन्यांना, ना कायद्याचा धाक असतो ना दंड-शिक्षेची पर्वा. अशा लबाड कंपन्यांनी त्यांच्या जाहिरातबाजीत वापरलेली ‘ऑरगॅनिक’, ‘इको पॉझिटिव्ह’, ‘हॅन्डमेड सस्टेनेबल’, ‘झिरो वेस्ट’ अशी फसवी दिखाऊ भाषा म्हणजे एकप्रकारचा शब्दच्छलच असतो असे म्हणताना शेफाली लिहिते ‘अशी भाषा ब्रँड्सना मूल्यांचे पालन न करता केवळ त्यांची विक्री करण्याची संधी देते’.

‘द एअर पोर्ट लूक’ हा लेख विमानतळाची सुरक्षाव्यवस्था चोखपणे सांभाळणार्‍या ‘सीआयएसएफ’ या यंत्रणेचे, तिच्या कामकाजाचे आणि तिथल्या महत्त्वाच्या अधिकार्‍यांचे थेट प्रक्षेपण करतो. नेपथ्य आहे दिल्लीचा इंदिरा गांधी विमानतळाचा अंतस्थ भाग, जिथे लाखांहून अधिक प्रवाशांची रोज ये- जा असते. त्यांच्यावर साध्या वेशातल्या स्टाफचे बारीक लक्ष असते. शिवाय तासागणिक सहा हजार बॅग्ज, सीआयएसएफच्या अतिदक्ष नजरेखालून जातात. अशा सावधतेमुळे ड्रग्ज, प्राण्यांची कातडी, शस्त्रे, सोने तत्सम गोष्टींची तस्करी पकडली जाते. या अधिकार्‍यांना भेडसावणारी आव्हाने, त्यासाठी त्यांना मिळणारे खास प्रशिक्षण, त्यांचे विविधरंगी अनुभव अशा आतापर्यंत फारशा ऐकिवात नसलेल्या गोष्टी रंजकपणे समोर येतात.

भारतातल्या कॉफी कल्चरचा प्रत्यक्षदर्शी लेखाजोखा मांडणारा एक लेख पुस्तकात आहे. भारतातील लोकप्रिय पेय जरी चहा असले तरी दक्षिणेकडे मात्र पहिल्यापासून कॉफीचेच प्रस्थ होते. पुढे कालौघात, संपूर्ण भारतभर कॉफी हे नुसते पेयच नव्हे तर एक ‘संकल्पना’ म्हणूनही कशी रुजली हे लेखिकेने ‘लज्जतदार’ शैलीत सांगितले आहे. शिवाय सीसीडी, बरिस्ता, स्टारबक्स यांच्यापल्याड जाऊन आपापल्या ब्रँड्सची स्वतंत्र ओळख जपणार्‍या कितीतरी कॉफी उद्योजकांचे मन ‘तरतरीत करणार्‍या’ विजयगाथासुद्धा लेखात येतात. लेखिकेची वर्णनक्षमता कौतुकास्पद आहे. कॅफे हाऊसच्या अंतर्गत सजावटीचे वर्णन करताना ‘लाल विटकरी भिंती, कॉफीचा स्वर्गीय सुवास, किरमिजी-काळ्या कॉफीवर दुधाच्या शुभ्र फेसाची नक्षी, कॉफी मशिन्सची खटखट, लॅपटॉप घेऊन बसलेली तरुणाई, पंचेंद्रियांना आपल्या अस्तित्वाची नोंद घ्यायला लावणारी कॉफी शॉप्स’ असे चित्रदर्शी शब्दचित्रण यात येते. पण याही व्यवसायाला एक काळी बाजू आहेच. बाजारात अव्वल दर्जाची कॉफी २० हजार रुपये किलोने विकली जात असली तरी कॉफीमळ्यावर राबणार्‍यांकडून मात्र ती फक्त ३०० रुपये किलोने खरेदी केली जाते, ही अन्याय्य तफावतसुद्धा लेखिका निदर्शनास आणून देते.

पुस्तकात येणारी काही व्यक्तिमत्त्वे त्यांच्या विशेष कार्यामुळे अत्यंत रोचक आणि नोंद घेण्याजोगी ठरतात. ‘बरेली की बर्फी’ या लेखातील २४ वर्षीय, पुरुषी थाटाची, अनाथ पण बंडखोर ‘चुमकी’ ही बंगालमधून आलेली गृहकामगार लेखिकेला भेटते. ‘मी हिजडा नाही, पण स्त्रियांबरोबर संबंध ठेवायला मला आवडतं. शिवाय स्त्रियांवर अत्याचार करणार्‍या पुरुषांना मी चांगलं बदडून काढते.’ असे सांगणार्‍या चुमकीला आपली समलिंगी/ लेस्बियन अशी खास लैंगिक ओळख आहे किंवा आपण स्त्रीवादी आहोत हेही ठाऊक नाही. ती फक्त आपल्या अंत:प्रेरणेशी प्रामाणिक आहे. तर ‘द फायर एग्झिट’ या लेखात आगीत होरपळलेल्यांच्या कहाण्या आहेत. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात भाजलेल्या रुग्णांवर उपचार करण्यार्‍या खास विभागाच्या प्रमुख डॉ. सुजाता साराभाई यांच्याकडून लेखिका, मती कुंठीत करणारे सत्य जाणून घेते. हुंड्यासाठी जाळलेल्या नवविवाहिता, तसेच गॅसगळती, विजेचा शॉक, रस्ते अपघातात जायबंदी झालेले असंख्य रुग्ण इथे येतात. अशा वेळी भाजलेल्या शरीराबरोबरच होरपळलेल्या मनावर उपचार करणेही तितकेच गरजेचे असते. ॲसिड हल्ल्याच्या बळी ठरलेल्या हसीना, अफगाणिस्तानची मुमताज, रेश्मा कुरेशी यांच्या करुण कहाण्याही यात आहेत. ‘जे औषध साध्य करू शकत नाही, ते करुणेतून साध्य होते,’ या वाक्याने लेखाचा समारोप होतो.

शेवटचा लेख मृत्यूविषयक आहे. भूमिगत गटारे आणि मैल्याच्या टाक्या साफ करणारे सफाई कामगार हे अत्यंत अपुर्‍या वेतनावर, विषारी वायू आणि दुर्गंधीयुक्त विवरात जीव धोक्यात घालून उतरतात. हैदराबादमधल्या एका गुदमरलेल्या आणि जखमी अवस्थेतील सफाई कामगाराला रुग्णालयात कुणी हातही लावत नाही आणि उपचारांविना तो तसाच मरतो. लेखिका उद्वेगाने लिहिते, ‘जे सार्‍या जगाच्या स्वच्छतेची जबाबदारी पेलतात त्यांना हात लावण्यासाठी कोणताही डॉक्टर वा परिचारिका तयार नव्हती.’ सफाई कामगारांचा प्रश्न धसास लावण्यासाठी जिवाचं रान करणार्‍या, मॅगसेसे पुरस्कारप्राप्त बेझवाडा विल्सन यांची मुलाखत तर यात आहेच, परंतु मृत्यूपश्चात लागणार्‍या सार्‍या सेवा पुरवणार्‍या एका अनोख्या महिलेचाही परिचय आहे. प्रेताचा मेकअप, अंत्यसंस्कारादी क्रियाकर्मे, कायदेशीर कागदपत्रांची तयारी ते वृत्तपत्रे व समाजमाध्यमांवरून प्रसारित करायचे शोकसंदेश, अशा सार्‍याची तजवीज ही महिला करते. मृत्यूनंतर करायचा इत्थंभूत खटाटोप, एक महिला, तटस्थ व्यावसायिकपणे पार पाडते.

शेफाली वासुदेव एका सुविद्य कुटुंबात वाढल्या. त्यांचे प्राध्यापक वडील आणि आई दोघेही सिंधी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक. शिवाय दोघेही निरीश्वरवादी. भरपूर पुस्तके आणि ता्त्विवक चर्चा अशा बौद्धिक वातावरणात वाढलेल्या शेफाली यांचे सामाजिक भान शाबूत असल्याचे दिसते. त्यांच्या बहुश्रुततेचा अंदाज त्यांच्या लेखनातून येतो. समकालीन आणि बहुमुखी समाजाचे आरस्पानी प्रतिबिंब झळकवणार्‍या पुस्तकाचे मुखपृष्ठसुद्धा मूळ कल्पनेला साजेसेच आहे.

पण नुसते विषयांचे वेगळेपण वा भरजरी भाषाशैलीच नव्हे, तर विविध पुस्तके, सिनेमे आणि लघुपटांच्या अनुरूप आणि विपुल संदर्भांमुळे, सदर पुस्तकातून घेतला गेलेला व्यक्ती, वृत्ती आणि घटनांचा हा व्यापक मागोवा वाचकाला एकाचवेळी ज्ञानसमृद्ध आणि अंतर्मुख करतो. म्हणूनच शेफाली वासुदेव लिखित ‘स्टोरीज वुई वेअर’ हे पुस्तक संग्राह्य ठरते.

स्टोरीज वुई वेअर
लेखिका : शेफाली वासुदेव
प्रकाशक : वेस्ट लँड नॉन-फिक्शन
पृष्ठे : २७०, किंमत : ६९९ रु.