भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सेनादलांच्या वैद्यकीय सेवा महासंचालकपदी गेली सुमारे पावणेदोन वर्षे राहून सर्जन ॲडमिरल आरती सरीन सोमवारी (३१ ऑगस्ट) निवृत्त झाल्या. या पदावरील पहिल्या महिला म्हणून इतिहासात त्यांची नोंद कायमची राहील. सेनादलांच्या वैद्यकीय सेवेत महिलांना संधी तुलनेने बरी असते हे खरे; पण ‘आर्म्ड फोर्सेस मेडिकल स्व्हिहसेस’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या सेवेत उच्च पदांवर पोहोचलेल्या महिला कमीच. अशाही परिस्थितीत सर्जन ॲडमिरल सरीन यांनी सर्वोच्च पद गाठले होते. 

आरती सरीन यांचे वडील आणि भाऊही नौदलात होते. नौदलाच्या वसाहतीत, विशाखापट्टणम् येथे त्यांचे शिक्षण झाले. वैद्यकीय शिक्षणासाठी त्या पुण्याच्या ‘एएफएमसी’मध्ये (आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, खडकी) आल्या. तिथे किरणोत्सारशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेऊन १९९२ मध्ये त्या लष्कराच्या वैद्यकीय सेवेत स्थिरावल्या. शिक्षण न थांबवता वैद्यकशास्त्रातील ‘एमडी’नंतरची ‘डीएनबी’ पदविका मुंबईच्या टाटा कर्करोग संशोधन संस्थेतून त्यांनी मिळवली, पुढे अमेरिकेतील पीट्सबर्ग येथे गॅमा नाइफ सर्जरीचेही विशेष प्रशिक्षण त्यांनी घेतले आणि नौदलाच्या वैद्यकीय सेवेत कार्यरत झाल्या. ही नौदलाची रुग्णालये जमिनीवरच असली तरी इंडियन नेव्ही हॉस्पिटल शिप (आयएनएचएस) म्हणवली जातात. पोर्ट ब्लेअरचे ‘धन्वंतरी’, विशाखापट्टणमचे ‘कल्याणी’, मुंबईचे ‘अश्विनी’ आदींमध्ये काम केल्यावर त्यांची बदली हवाई दलाच्या रुग्णालयांत झाली. लष्करात लेफ्टनंट ते कॅप्टन, नौदलात सर्जन लेफ्टनंट ते सर्जन व्हाइस ॲडमिरल; तर हवाई दलात एअर मार्शल अशा तीन्ही सेनादलांत कार्यरत राहिलेले अधिकारी फार कमी असतात, त्यांपैकी आरती सरीन होत्या. 

जिथे शिकल्या, त्याच ‘एएफएमसी’चे प्रमुखपद त्यांना मिळाले. या पदावर त्यांच्याआधी एकच महिला (लेफ्टनंट जनरल राजश्री रामसेतु) होत्या. नौदलाच्या दक्षिण विभागाच्या (सदर्न कमांड) प्रमुख वैद्यकीय अधिकारी हे सर्जन रिअर ॲडमिरलच्या हुद्द्याचे पद सरीन यांच्याआधी निर्मला कण्णन या एकाच महिलेने भूषवले होते. तीन्ही सेनादलांचा विचार केल्यास, ‘रिअर ॲडमिरल’च्या समकक्ष हुद्द्यावर पोहोचलेल्या आरती या अवघ्या सहाव्या महिला ठरल्या होत्या. भारतीय सेनादलांची संस्थात्मक व्यवस्था बर्‍याच अंशी लिंगभावनिरपेक्ष असू शकते, पण ही व्यवस्था तशी नसल्याचा अपसमजही कदाचित महिलांना या पदांवर येण्यापासून रोखण्यास कारणीभूत ठरला असावा. 

ऐन युद्धप्रसंगी काम करण्याची वेळ (डिसेंबर १९८५ पासून कार्यरत असल्यामुळे) सरीन यांच्यावर आली नाही, परंतु कोविडच्या आणीबाणीचा सामना त्यांनीही केला. तेव्हा त्या नौदलाच्या पश्चिम विभागाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी होत्या. महाराष्ट्राची ‘प्राणवायू कोंडी’ झाल्याच्या काळात ‘आयएनएस अश्विनी’साठी त्यांनी जामनगरहून ऑक्सीजन मागवला होता. सेनादलांची वैद्यकीय क्षमता वाढवण्यासाठी, संशोधन संस्थांतील समन्वयासाठी महासंचालक पदावरून (ऑक्टोबर २०२४ पासून) त्यांनी विशेष प्रयत्न केले. हे पद थेट संरक्षण मंत्रालय आणि संरक्षण दल प्रमुखांना (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) उत्तरदायी असते. अलीकडेच (जून २०२६) त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘परम विशिष्ट सेवा मेडल’ने गौरवण्यात आले. सरीन यापुढेही अन्य प्रकारे कार्यरत राहातील, पण सेनादलांतील त्यांची कारकीर्द कुणालाही प्रेरणादायी अशीच ठरते.