डॉ. जयदेव पंचवाघ

आयुष्याचीच व्यथा ठरणारी वेदना ज्या आजारांमुळे उद्भवते, त्यांपैकी ‘ट्रायजेमिनल न्यूराल्जिया’ तरी शस्त्रक्रियेनं बरा होतो..

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?

७ ऑक्टोबर हा जागतिक ‘ट्रायजेमिनल न्यूराल्जिया दिवस’ मानला जातो. गेल्या शुक्रवारीच हा दिवस होता. या आजाराबद्दल मी या लेखमालेत आत्तापर्यंत अनेकदा लिहिलं आहे, त्यामुळे त्याची पुनरुक्ती करण्याचा माझा मानस नाही, पण ज्या आजारांमध्ये प्रलंबित काळ वेदना होत राहते अशा आजारांचं प्रतिनिधित्व करणारी ही व्याधी असल्याने अनेक वर्षांच्या या वेदनेचा मेंदूच्या रचनेवर, आकारावर आणि कार्यावर कसा परिणाम होत जातो याचा थोडा मागोवा घेण्याची गरज मला वाटली.

अशा प्रलंबित काळासाठी चालू राहणाऱ्या वेदनेला ‘क्रॉनिक पेन डिसॉर्डर’ म्हणतात. ही वेदना शरीराच्या कुठल्याही भागातली असू शकते. उदाहरणार्थ वर्षांनुवर्ष चालणारी कंबरदुखी, विशेषत: ऱ्हुमॅटॉइड प्रकारात बसणारी सांधेदुखी, डायबेटिसमुळे किंवा इतर कारणांमुळे शरीराच्या निरनिराळय़ा भागांत होणारी न्यूरोपथी, निरनिराळय़ा प्रकारचे न्यूराल्जिया.. ही लांब यादी आहे.

ट्रायजेमिनल न्यूराल्जिया या आजाराबद्दल मी (२७ जूनच्या लेखात) नमूद केलं की, हा आजार ‘आत्महत्या प्रेरक आजार’ म्हणून ओळखला जातो. ‘एखाद्या वेदनेमुळे आजच्या काळातही लोक आत्महत्या करण्याचा विचार खरंच करू शकतात का?’ असा एक प्रश्न यावर विचारला गेला. त्यातला ‘साशंकतेचा’ सूर बघून प्रलंबित काळासाठी होणाऱ्या वेदना व्यक्तीच्या मनावर व शरीरावर काय परिणाम करू शकतात हे थोडं विस्तारानं लिहावं असं मला वाटलं.

कुठलीही वेदना ही फक्त दुखण्याची संवेदना समजण्यापुरती मर्यादित नसते. कसं ते बघू. कोणत्याही वेदनेचे तीन भाग असतात. पहिला म्हणजे संवेदनक्षम नसांच्या टोकांना वेदनेची जाणीव होणं. उदाहरणार्थ पायाला एखाद्या गरम वस्तूचा चटका बसणं. वेदनेचा दुसरा भाग म्हणजे ही संवेदना नसांमधून मज्जारज्जूपर्यंत किंवा चेहऱ्याच्या भागात बोलायचं झालं तर ‘ब्रेन-स्टेम’पर्यंत पोहोचणं. पुढे, मेंदूपर्यंत मज्जारज्जूतून विद्युत संदेशांप्रमाणे वाहून नेली जाणं आणि त्यानंतर मेंदूतल्या विविध भागांपर्यंत या वेदनेचा संदेश पोहोचणं.

आता वेदनेचा तिसरा भाग म्हणजे या वेदनेच्या संदेशांचं योग्य पृथ:करण करणं आणि त्यानुसार शरीराचं, मनाचं किंवा दोन्हींचं या वेदनेच्या अनुभवावर आधारित प्रत्युत्तर ठरवणं. म्हणजे या उदाहरणात चटका बसलेला पाय झटकन तापलेल्या वस्तूपासून दूर नेणं आणि ती तप्त वस्तू लवकरात लवकर शरीरापासून दूर करणे. त्याचबरोबर ज्या व्यक्तीमुळे किंवा घटनेमुळे या तप्त वस्तूचा पायाला स्पर्श झाला त्या व्यक्तीविषयी राग, घृणा किंवा इतर परिस्थितीला सुयोग्य भावना निर्माण होऊन पुढची वर्तणूक ठरवली जाणे. हे झालं मेंदूचं वेदनेला दिलेलं प्रत्युत्तर. पण वेदनेच्या व्याख्येत याचासुद्धा समावेश आहे.

वेदनेच्या संवेदनेविषयी जेवढं संशोधन आजतागायत वैद्यकशास्त्रात झालं असेल तेवढं या क्षेत्रातल्या इतर कशाबद्दलही झालं असेल असं मला वाटत नाही. कारण कुठल्या ना कुठल्या प्रकारची वेदना, मग ती शारीरिक असो वा मानसिक, दूर करणं हाच वैद्यकशास्त्राचा मूळ उद्देश असतो नाही का? जी वेदना अनेक महिने आणि वर्ष परत-परत होत राहते (म्हणजेच क्रॉनिक पेन) त्याविषयीसुद्धा गेल्या काही वर्षांमध्ये भरपूर संशोधन झालं आहे. नसा, मज्जारज्जू आणि मेंदूचं चित्रांकन करू शकणारा उत्कृष्ट दर्जाचा ‘एमआरआय’ आल्यापासून तर याविषयीचं संशोधन विशेष झपाटय़ानं झालं आहे. या संशोधनातून, प्रलंबित वेदनेच्या आजारांबाबत कळलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

पहिली गोष्ट म्हणजे वारंवार व प्रलंबित काळापर्यंत होणाऱ्या अशा दुखण्यांमुळे व्यक्तीच्या मेंदूतल्या काही विशिष्ट भागांत रचनात्मक बदल होतो. वेदनेची संवेदना ज्या मेंदूच्या भागांमध्ये पोहोचवली जाते त्यात प्रामुख्यानं बदल होत जातात. प्रलंबित काळापर्यंत वेदनेच्या संवेदना मेंदूपर्यंत पोहोचत असतील तर हळूहळू मेंदूचा आकार कमी होत जातो हे ‘एमआरआय व्हॉल्युमेट्री’ या तपासणीद्वारे सिद्ध झालेलं आहे. ग्रे मॅटर किंवा ‘चेतापेशी असलेल्या मेंदूच्या भागाचं’ आकारमान विशेषत: कमी होतं. वेदनेच्या संवेदना ज्या ठिकाणी भावनांच्या केंद्राशी संपर्क करतात आणि ज्या ठिकाणी स्मृतीविषयक चेतापेशी असतात तिथं मोठय़ा प्रमाणात हे बदल होतात. मनाची एकाग्रता साधण्याची क्षमता, विविध विषयांच्या आठवणी आणि त्या आठवणींचा अन्वयार्थ लावणारी सर्किटरी, वेदनेतून निर्माण होणाऱ्या भावना.. एवढंच नाही तर विचार करण्याची क्षमतासुद्धा यामुळे बदलत जाते.

प्रलंबित काळच्या वेदना सहन करणाऱ्या व्यक्तींमध्ये मेंदूतल्या या व इतर क्षमताही गडबडलेल्या असतात. म्हणूनच अशा व्यक्तींचं व्यक्तिमत्त्व बदललेलं आपल्याला दिसतं. एवढंच नव्हे तर जितका काळ या वेदनेवर उपचार न होता तिचं दुष्टचक्र चालू राहील तितके खोलवरचे बदल मेंदूत होत जातात. मेंदूमध्ये स्वत:त गरजेप्रमाणे थोडय़ा प्रमाणात बदल करण्याची क्षमता असते. या क्षमतेला किंवा लवचीकतेला ‘न्यूरोप्लास्टिसिटी’ म्हणजेच रचना व कार्यात बदल होण्याची क्षमता म्हणतात. ही क्षमता जशी सकारात्मक असू शकते तशी ती वेदनेच्या आजारांसारख्या काही प्रसंगांत नकारात्मकतेकडेसुद्धा जाऊ शकते. यालाच निगेटिव्ह प्लास्टिसिटी म्हणतात.

प्रलंबित वेदनेमध्ये आणखी एक महत्त्वाचा बदल घडतो तो म्हणजे मेंदूत शरीराच्या विविध भागांतल्या संवेदनांचं आकलन होण्यासाठी जो भाग (सेन्सरी कॉर्टेक्स) असतो  त्या भागाचं आकारमान आणि मेंदूच्या पृष्ठभागावरील क्षेत्रफळ वाढत जातं. याचाच अर्थ असा की प्रलंबित वेदना झाल्यामुळे आणि त्या वेदनेची वारंवारता वाढत गेल्यामुळे ती वेदना जाणून घेणाऱ्या पेशींच्या आकारात आणि कदाचित काही प्रमाणात संख्येतसुद्धा वाढ होत जाते. या पेशींचं जाळं आणि परस्पर संकेत पाठवण्याची क्षमता (सायनॅप्स) सुद्धा वाढलेली दिसते.

याचा परिणाम असा होतो की नेहमीची वेदना सोडून इतर प्रकारची वेदना जरी या व्यक्तींना झाली तरी तिची तीव्रता आणि व्यथा ही अपेक्षेपेक्षा अधिक असते. स्मृती, विचार, भावना, कार्यक्षमता, व्यक्तिमत्त्व.. अशा सर्वच गोष्टी त्या वेदनेच्या दावणीला बांधल्या जातात. या सगळय़ा प्रकारामुळे त्या व्यक्तीच्या जीवनाचं व व्यक्तिमत्त्वाचं जे काही होतं त्याला इंग्रजीत ‘क्रॉनिक पेन सिंड्रोम’ म्हणतात.

या वारंवार आणि प्रलंबित काळासाठी होणाऱ्या वेदनांसाठी मज्जासंस्था बधिर करणारी जी औषधं दिली जातात त्या औषधांमुळे या मेंदूत बदल घडण्याच्या प्रक्रियेत फारसा फरक पडत नाही. किंबहुना कधी कधी रुग्ण सांगतात की, औषधांचा बधिर करण्याचा असर जाऊन परत कधी वेदना येईल या विचारानं मानसिक उलाघाल होते म्हणजेच यातून अँग्झायटी न्यूरॉसिसचीसुद्धा सुरुवात होऊ शकते. विफलतेची आणि नैराश्याची भावना यात भर घालत जाते.

लहानपणी आपल्याला एक गोष्ट सांगितली जायची. एका पिंजऱ्यामध्ये प्रचंड आकाराचा अक्राळविक्राळ आणि अनेक दिवस खूप कमी खाद्य दिलेला अर्ध-उपाशी वाघ बांधून ठेवला जातो आणि त्या पिंजऱ्यापासून काही फुटांवर एक बकरी झाडाला बांधून ठेवलेली असते. त्या बकरीसमोर भरपूर गवत आणि इतर खाद्यपदार्थ ठेवलेले असतात. त्या बकरीला काही दिवसांच्या अनुभवावरून माहीत असतं की हा वाघ पिंजऱ्याच्या बाहेर येऊ शकत नाही, पण तरीही ती बकरी अन्नाला तोंडसुद्धा लावू शकत नाही आणि काही दिवसांनी त्या भीतीनं ‘खंगून’ मरण पावते. ट्रायजेमिनल न्यूराल्जियासारख्या आजारात औषध घेत असलं तरी, ‘तीव्र कळ परत कधी येईल’ या भीतीनंच माणूस गर्भगळीत आणि गारद स्थितीत आयुष्य कंठत असतो. ही एक ‘क्रॉनिक पेन सिंड्रोम’मध्ये निर्माण होणारी परिस्थिती आपण नीट समजावून घेतली पाहिजे.

म्हणूनच प्रलंबित काळासाठी अत्यंत तीव्र अशा वेदना उत्पन्न करणाऱ्या ट्रायजेमिनल न्यूराल्जियासारख्या आजाराचं निदान व उपचार प्राथमिक स्थितीत केलं जाणं गरजेचं आहे. ज्या वेळी ती वेदना ही फक्त एक वेदनाच असते आणि अजून ‘व्यथा’ झालेली नसते, त्या पहिल्या काळातच उपचार करून ही मुळासकट बंद करण्याची गरज असते.

यादृष्टीनं ज्या प्रलंबित वेदनांचे आजार, शस्त्रक्रियेनं मूळ कारण दूर करून बरे करता येतात; ते शस्त्रक्रिया उपलब्ध नसलेल्या आजारांपेक्षा बरे असं मला कधी कधी वाटतं. अशा ‘शस्त्रक्रिया उपलब्ध नसलेल्या’ वेदनांमध्ये चेतासंस्थेला बधिर करणारी औषधं वाढत्या मात्रांमध्ये दिली जातात. वाढत्या मात्रांमध्ये देण्याचं कारण म्हणजे जसा काळ जाईल तशी वेदनेची तीव्रता वाढून औषधाची गरजसुद्धा वाढत जाते.

या पार्श्वभूमीवर, प्रलंबित वेदना असलेले जे आजार शस्त्रक्रियेनं मुळासकट बरे होऊ शकतात त्यांच्यावर ‘हे कधी बरेच होणार नाहीत, औषधं घेत राहा..’ असं सांगून वाढत्या औषधांच्या मात्रा आणि उपचार करणं फक्त चुकीचंच नव्हे तर धोकादायक का ठरतं याचं उत्तर ‘क्रॉनिक पेन सिंड्रोम’च्या विवेचनावरून वाचकांना मिळालं असेल अशी मी आशा करतो.

७ ऑक्टोबरच्या निमित्ताने फक्त एक आजार म्हणून नव्हे तर ‘शस्त्रक्रियेनं बरा होऊ शकणारा व प्रलंबित काळच्या वेदनेच्या आजारांचा एक प्रतिनिधी म्हणून ट्रायजेमिनल न्यूराल्जियाचं स्मरण ठेवणं गरजेचं आहे.

(लेखक मेंदू व मणक्याचे शस्त्रक्रियातज्ज्ञ आहेत.

brainandspinesurgery60@gmail.com