करोनाकाळात आपली मुले ऑनलाइन शिकून डिजिटल शिक्षणाच्या स्पर्धात्मक युगाशी जुळवून हुशार वगैरे बनल्याचा भ्रमात असाल तर तसले बिलकूल झाले नाहीय. अभ्यासाव्यतिरिक्त मुलांचा ऑनलाइन वावर वाढला. स्क्रीनटाइम, रीलटाइम यांच्यात एकाग्रता हरवली आणि राग-क्रोधात भर पडली. स्वीडन या अतिप्रगत राष्ट्राने २००० सालात (करोना वगैरे नव्हता तरी) वर्गातून पुस्तके हद्दपार केली. मुलांना लॅपटॉप आणि टॅबयुक्त शिक्षण अवघ्या दहा वर्षांतच देण्यास सुरुवात झाली. संपूर्ण डिजिटलाइज्ड शिक्षणाचा दुष्परिणाम काय ते कळायला पुढले दशक उजाडले. तोवर एक आख्खी पिढी शैक्षणिकदृष्ट्या कमजोर निपजली. भाषेपासून गणितात कच्चे लिंबूच अधिक तयार होत असल्याचे लक्षात आल्यावर २०२८ पर्यंत पूर्णत: लागू होणार्‍या नव्या शालेय अभ्यासक्रमाची रचना आता करण्यात आलीय. म्हणजे, १० कोटी पाऊंड (१२५६ कोटी रुपये) इतकी गुंतवणूक उभारून पुन्हा वर्गात पुस्तक-वह्यांचा पारंपरिक अभ्यासक्रम आखला गेलाय. लाखोंचे शुल्क भरून संपूर्ण विदेशी शाळेत घालण्याची स्वप्ने पाहणार्‍या राज्यातील बुद्रुक आकाराच्या खेड्यांतील पालकांनीही वाचावा असा बीबीसीकडून करण्यात आलेला विस्तृत रिपोर्ताज.

https:// tinyurl. com/ mvv9 pkpj

पुरस्कार नाकारणारी लेखिका…

बुकरच्या तीनपटीहून अधिक रकमेचा म्हणजे तब्बल १७५ हजार पौंडाचा पुरस्कार. सलग जगभरातील माध्यमांमध्ये प्रसिद्धी, टीव्ही चॅनेलांवर प्रभातकालीन मुलाखती, दुकानांतील फडताळात दडपलेली पुस्तके वर आणण्याचा मुहूर्त… आदी सगळ्या गोष्टींवर हेलन डेविट या लेखिकेने गेल्या आठवड्यात स्वहस्ते पाणी सोडले. ‘द लास्ट सामुराई’ या कादंबरीद्वारे २६ वर्षांपूर्वी डेविट या साहित्य वर्तुळात शिरल्या. अल्प प्रमाणात तरी कसदार कथा-कादंबर्‍या त्यांनी लिहिल्या. विंडहॅम- कॅम्पबेल नावाने दिला जाणार्‍या पुरस्कारांपैकी, साहित्यिक जीवनगौरव स्वरूपाचा हा पुरस्कार. या पुरस्काराचा भाग म्हणून फाऊंडेशनच्या माध्यम- चमूकडून घेतल्या जाणार्‍या मुलाखती, चित्रीकरण यांत दररोजच्या सहा तासांचा कालावधी द्यावा लागत असल्याने हा पुरस्कारच नाकारण्याचा धाडसी निर्णय डेविट यांनी घेतला. जगभरातील लेखकांमध्ये (समाजमाध्यमांचे कोलित हाती मिळाल्यानंतर) वकूब नसतानाही स्वत:ला आणि स्वत:च्या पुस्तकांना चमकवत राहण्याची खुमखुमी बळावली असताना, अशा निर्णयांचे स्वागतच करावे. मुद्दा या प्रकाराची गेल्या आठवड्याभरात बरीच चिकित्सा झाली असली, तरी हे दोन दुवे आवडणेबल.

https:// tinyurl. com/3 typ4 ct5    l  https:// tinyurl. com/5 dwkhscd

ओ हेन्री विजेत्या कथा…

बेस्ट अमेरिकन शॉर्टस्टोरीज या खंडाइतक्याच शतकभर चालणार्‍या ‘ओ हेन्री प्राईज स्टोरीज’ खंडातील कथानिवड या आठवड्यात जाहीर झाली. या निवडीतील कथालेखकांची नावे येथे वाचता येतीलच. पण लिट हबने यातील दोन ऑनलाइन मोफत वाचायला उपलब्ध असलेल्या कथाही उपलब्ध करून दिल्यात. या कथामालिकेच्या एका संपादकीय टिपणासह ते येथे वाचता येईल.

https:// tinyurl. com/49 rrru2 d