‘माया’चा जन्म २०१० सालचा. तिला दोन बहिणी आणि एक भाऊ. ‘लता’, ‘छाया’ आणि ‘पंडू’. आई ‘नीरा’ आणि वडिलांचं नाव ‘हिलटॉप’. जन्माला आल्यावर लगेचच मायाची आई नीरा गेली. एका सकाळी फिरायला येणार्यांना ती ओढ्यात दिसली. सुरुवातीला वाटलं बसलीये निवांत. पण तिचं निश्चेष्ट असणं सरावलेल्या डोळ्यांना खुपलं. त्यांना लक्षात आलं नीरा नुसती निश्चेष्ट नाहीये. गेलीये. शवविच्छेदनात रक्तात गुठळ्या आढळल्या अनेक ठिकाणी. डॉक्टरांनी निष्कर्ष काढला- सर्पदंश. आदल्या रात्री कधी तरी तिला साप चावला असावा. माया आणि भावंडं मानवी अर्थानं अनाथ झाले.
माया कळू लागेपर्यंत राहिली आपल्या भावा-बहिणींबरोबर. पण जशी मोठी झाली तसा तिचा स्वतंत्र बाणा दिसू लागला. तिचं काही पटेना त्यांच्याबरोबर. माया शहाणी. सगळ्यांपेक्षा हुशार. मुख्य म्हणजे अगदी खमकी. आपलं आणि त्यांचं पटत नाहीये म्हणून तिनं डोक्यात राख घालून आपलं घर नाही सोडलं. इतरांना घरातनं जायला लावलं बाहेर. गेले बिचारे सगळे आपापलं चंबुगबाळं आवरून नव्या घराच्या शोधात.
मग लवकरच समग्र इलाख्यावर मायाचं साम्राज्य निर्माण झालं. शब्दश: तिच्या परवानगीशिवाय पान हलायचं नाही कोणाचं त्या भागात. लवकरच तिला जोडीदाराची गरज निर्माण झाली. तिनं पहिला पाट लावला तो ‘गब्बर’ बरोबर. त्याच्यापासनं तिला दोन बछडे झाले. पुढच्याच वर्षी ‘सॅटर्न’ तिच्या आयुष्यात आला आणि तिघांना जन्म देऊन गेला. मग दोन वर्षांनी ‘मटकासुर’. नंतर ‘टाळा’. आणि शेवटी ‘बलराम’. अशा वेगवेगळ्या जोडीदारांसंगे मायानं डझनाहून अधिकांना जन्म दिला. एकूण १३ जणांची आई होती ती.
जंगलात- मग ते माणसांचं असेल नाही तर खरंखुरं- वाघीण असणं तसं अवघडच. एका बाजूला एकापेक्षा एक टपोरी वाघ नजर ठेवून असतात. नवनव्या वाघिणींच्या वासावर असतात. त्यांना होकार द्यावा तर पुढे ते स्वत:च्याच पोरांना मारायला तयार. आपल्याच बछड्यांचा गळा घोटायला हे नर कमी करत नाहीत. असे स्वत:च्याच पिलांचे मारेकरी का होतात ते? कारण त्यांची नजर असते स्वत:चं अपत्य वाढवणार्या त्यांच्या आईवर. मादी हवी असते त्यांना. ती जोपर्यंत आईपण सांभाळत असते तोपर्यंत ती नरांच्या आमिषाला जराही बळी पडत नाही. बघत नाही ढुंकून नरांकडे. याचा राग येतो ‘वाट पाहणार्या’ नरांना. म्हणून ते मारून टाकतात आपल्याच पिलांना. म्हणून वाघिणीचं आयुष्य अवघड. आई व्हायचं आणि आपल्याच पिलांना त्यांच्या बापापासनं वाचवायचं.
या सगळ्यात माया भारी होती. सगळ्यांना हातभर अंतरावर ठेवायची. पुलंच्या ‘तुझे आहे तुजपाशी’तले काकाजी वर्णन करतात तशी अदब होती तिची. पण उगाच आपलं ‘वाघ’पण मिरवायची नाही ती. पोट भरलेलं असेल तर हरणाचं बछडं गेलं शेजारून तरी काही करायची नाही. नसेल तर रानरेड्यालाही एकट्यानं संपवायची. तिला पाहायला गर्दी असायची कायम. या प्रेक्षकांच्या समोरनं अगदी त्यांच्या गाडीला घासून जायची दिमाखात… त्यांना तुच्छ लेखत.
ते तिचं तुच्छ लेखणं अनुभवता मात्र आलं नाही कधी. निवांत वेळ काढून जेव्हा ताडोबात गेलो तेव्हा तोपर्यंत माया गायब होऊन वर्ष झालेलं होतं. अचानक २०२३पासून ती दिसेनाशी झाली. ताडोबात जो कोणी तिथला भेटला तो मायाविषयी भरभरून बोलायचा. तिचं दिसणं, वागणं, सलगी देणं, रागावणं अशा सगळ्यावर अनेकांनी भरभरून प्रेम केलं. इतके तिचे चाहते होते की काही जण तर केवळ तिला पाहायला ताडोबात यायचे. अनेक जण सांगतात… तिच्या कॅमेरा सेन्सविषयी. अंधश्रद्धा वाटावी असे किस्से. पण तिचे फोटो पाहिले, त्यातल्या तिच्या पोझेस, आविर्भाव वगैरेमुळे हे कथन खरं वाटू लागतं. खरं तर वाघ मुळातच राजबिंडा. समग्र जीवसृष्टीचा मध्यबिंदू. तो कुरूप असूच शकत नाही. पण तरीही त्या सुंदरांत माया व्याघ्रसुंदरी ठरावी इतकी सुंदर होती.
अनंत सोनावणे यांचं ‘माया: द बायोग्राफी ऑफ ए टायगर’ वाचताना ‘ऐकलेली’ माया आणि पुस्तकातली माया एकच असल्याची खात्री पटत गेली. एका वाघिणीचं चरित्र इतकीच या पुस्तकाची ओळख नाही. त्यानिमित्ताने जंगल, तिथलं अनेकांचं असणं, एकमेकांचा सहवास आणि तरीही एकमेकांच्या जिवावर उठणं. तिथला तो एक विशिष्ट वास. असा सगळा जंगलानुभव घेऊन हे पुस्तक येतं. खरं तर ही जंगलाची गोष्ट आहे. त्या जंगलाची राणी माया. अत्यंत सुलभ, ओघवती भाषा. लहान लहान प्रकरणं आणि चित्रमय कथन शैली यामुळे हे पुस्तक आपल्याला पुढे पुढे नेत रहातं. जंगलात व्याघ्र दर्शनासाठी जाणारे असे हिंडत राहतात… इथे नाही दिसला वाघ, तिथे दिसेल… तिथेही नाही, मग इकडे नक्की असेल असं करत करत किती वेळ जातो कळत नाही. हे पुस्तक असं सहज पुढे नेतं वाचकाला. या जोडीला सुंदर रेखाचित्रं आणि अनेक वाघांची अनेक छायाचित्रं यामुळे ते देखणंही आहे. सोनावणे ताडोबाला असतात. जंगल संवर्धन, निसर्ग, पर्यावरण हे विषय त्यांच्या जगण्याचे आहेत. त्यामुळे पुस्तक विषय हा त्यांचा केवळ लेखनापुरता विषय नाही. तो त्यांचा जगण्याचा भाग आहे.
त्याखेरीज अशी पुस्तकं लिहिली जात नाहीत. मराठीतल्या अशा दोन पुस्तकांचा आवर्जून उल्लेख करायला हवा. ही दोनही पुस्तकं मराठीतल्या मूलभूत, वाचणं अत्यावश्यक अशा ‘ऋतुचक्र’, ‘जागर’, ‘वृक्षगान’, ‘बलुतं’, ‘कोसला’, राम गणेशांची नाटकं, ‘कर्हेचे पाणी’ इत्यादी इत्यादी महत्त्वाच्या पुस्तकांत गणली जावीत अशी. पण अनेकांना विसर पडला असावा त्यांचा. एक म्हणजे दामू धोत्रे यांचं ‘वाघ, सिंह माझे सखेसोबती’ आणि दुसरं चाळीसगावच्या डॉ. वा. ग. पूर्णपात्रे यांचं ‘सोनाली’. हे ‘सोनाली’ डॉ. पूर्णपात्रे यांनी पाळलेल्या सिंहिणीचं नाव. ही पुस्तकं अगदी लहानपणी वाचली आणि डॉ. पूर्णपात्रे, धोत्रे यांचा हेवा वाटायला लागला. बाकी कोणत्याही नरपुंगवांना- म्हणजे पायलट/क्रिकेटर पाहून मला कधी ‘आपण असं व्हायला हवं’ असं कधीही वाटलं नाही. अपवाद फक्त हे दोघे. प्राण्यांशी दोस्ताना असण्यात जितकं माणूसपण आहे तितकं अन्य कशातही नाही. खूप मोठी झाल्यावर डॉ. पूर्णपात्रेंना ‘सोनाली’ला पुण्याच्या पेशवे पार्कात ठेवावं लागलं हे वाचलं तेव्हा माणसांच्या जगातल्या नियमांचा राग आला होता. त्यावेळी पुण्याला गेलो की ‘सोनाली’च्या पिंजर्यासमोर जायचं आणि तिला हाक मारायची हा कित्येक वर्षांचा नियम होता माझा. डॉ. पूर्णपात्रेंना ती प्रतिसाद द्यायची. मलाही तसं वाटायचं.
मायाला अशी हाक मारणं राहून गेलं.
(ता.क. पुस्तकाला सचिनची (तेंडुलकर) प्रस्तावना आहे. ‘माया’चा मोठेपणा सांगण्यासाठी अशा कोणाचीच गरज नाही. सिर्फ नाम ही काफी है।)
माया: द बायोग्राफी ऑफ ए टायगर
लेखक: अनंत सोनावणे
प्रकाशक : हार्पर कॉलिन्स
पृष्ठे : १९१, किंमत : ६९९ रु.
