मनात उद्भवलेल्या आणि समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे बोचत राहिलेल्या प्रश्नाचा चिकाटीने पाठपुरावा राजवाडे कसा करीत, याचे उदाहरण समग्र साहित्याच्या ११व्या खंडातील एका शोधनिबंधाच्या स्वरूपात आपण पाहू शकतो. ‘तगर ऊर्फ तगरेश्वर’ हा त्यांचा १२ पानी शोधनिबंध (दोन आकृत्यांसह) संशोधकीय दृष्टीने अभ्यासण्याजोगा आहे. प्रारंभीच राजवाड्यांनी तगर नामक शहराबद्दलच्या आपल्या जिज्ञासेचा उगम कसा झाला, हे सांगताना लिहिले, ‘माझ्या लहानपणी मराठ्यांच्या इतिहासाबद्दलची लहान शालोपयोगी पुस्तके असत, त्यांत अगदी पहिला मजकूर महाराष्ट्रातल्या अगदी जुन्यांतल्या जुन्या शहरांसंबंधीचा असे. पैठण आणि तगर ही ती दोन शहरे, अशी त्यावेळची समजूत असे. पैठणचे प्रतिष्ठान हे नाव असून शालिवाहन नावाचा राजा तेथे राज्य करीत होता, ही माहिती वाचून मनात संशय राहात नसे. पवित्र गोदावरीकाठचे पैठण साक्षात डोळ्यांनी पाहिलेली माणसे पुणे शहरात भेटत आणि शालिवाहनाची मोडी बखरही त्यावेळी मुुलांच्या वाचण्यात येत असे… त्या दोन्ही बाबी विश्वसनीय असल्याचे वाटून मनाचे समाधान होई. पण ते समाधान तगर या शहरासंबंधाने वाटत नसे…’

तगरबद्दलचे असमाधान का वाटत असे आणि ते पुढेही कसे वाढत गेले, परिणामी त्यांनी कोणकोणते प्रयत्न केले हे सांगताना राजवाड्यांनी पुढे लिहिले, ‘तगर हे शहर नक्की कोठे होते व तेथे कोणता राजा राज्य करी, याबद्दलची निश्चित अशी माहिती त्या छोटेखानी पुस्तकांतून दिलेली नसे आणि वर्गावरील पंतोजीला विचारले असता तो डोक्यावर थापटी मारून शंका जागच्या जागी बसवून टाकी. अशा स्थितीत पंतोजीहून श्रेष्ठ जे हेडमास्तर त्यांच्याकडून समाधान करून घेण्याचा मी एकदा प्रयत्न केला. पुण्याच्या मेहुणपुर्‍यातल्या ओकांच्या वाड्यात एक सरकारी मराठी शाळा भरे. तिचे हेडमास्तर रामभाऊ जोगळेकर होते. १८७४मध्ये ते काही कारणांनी वर्गावर आले असता मी त्यांना धिटाईने हा तगरविषयीचा प्रश्न विचारला. ‘वरच्या यत्तेत गेल्यावर कळेल’, असे म्हणून त्यांनीही डोक्यावर थापटी मारून शंकेची जागच्या जागी निरवणूक केली… तेव्हापासून गेली चाळीस वर्षे त्या बाबीचा उलगडा करण्याचा प्रयत्न मी अधूनमधून करीत आहे. आता तो थांग मला निश्चित लागलासे वाटल्यामुळे सर्व पुरावा येथे नमूद करतो…’

‘तगर हे नाव महाराष्ट्रात प्रचलित होऊन नुकती कोठे शंभर वर्षे होत आली असतील-नसतील’, असे म्हणून राजवाड्यांनी पुढे लिहिले, ‘ज्ञानेश्वरापासून रामजोशापर्यंतच्या मराठी गद्यपद्यसारस्वतात तगर शहराचा उल्लेख नाही, अठरा पुराणांत नाही; मुसलमान लोकांच्या तवारिखांतही या शहराचे नाव नाही. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी मुंबईस बॉम्बे लिटररी सोसायटी नावाचे मंडळ स्थापन झाले, त्यात डॉ. टेलरने एक ताम्रपट छापला, त्यात तगर शहराचा प्रथम उल्लेख आला. तो उल्लेख ग्रांट डफने आपल्या बखरीत उतरून घेतला. तेथून तो मराठी छोटेखानी शालोपयोगी चोपड्यांत शिरला. अशी या शहराच्या नावाच्या प्रसिद्धीची हकीकत आहे’.

राजवाड्यांचे हे म्हणणे आणि नंतर स्थाननिश्चितीसाठी त्यांनी केलेली तार्किक कसरत समजून घेण्यापूर्वीच एक महत्त्वाचा खुलासा आपण आज नोंदवायला हवा. तो खुलासा समग्र साहित्य खंड ११चे संपादक डॉ. अ. रा. कुलकर्णी यांनी आपल्या प्रस्तावनेत केला असून ग्रँट डफचे मराठी चरित्रकार या नात्यानेही केलेला आहे. तो खुलासा असा की, ‘राजवाडे यांनी टेलर व ग्रँट डफविषयी केलेले विधान वस्तुस्थितीला धरून नाही. तो संस्कृत ताम्रपट सातारच्या एका ब्राह्मणाने डफला दिला होता, तो डफनेच टेलरला दिला होता. त्यात तगरचा उल्लेख आढळला, त्याबद्दल त्याने मराठ्यांच्या इतिहासात पाचसहा ओळीच लिहिल्या असल्या, तरी लिटररी सोसायटीतील समकालीनांशी चर्चा करून त्याने त्या सोसायटीच्या नियतकालिकामध्ये तगरबद्दल एक शोधनिबंधही लिहिला होता. ग्रँट डफचा नव्याने उपलब्ध झालेला खासगी पत्रव्यवहार पाहिल्यावर तगरचा छडा लावण्यासाठी त्यानेही किती प्रयत्न केले होते, याची कल्पना येते.’ इतिहासकथनाच्या विशाल पटावर दोन विरुद्ध टोकांना उभ्या असणार्‍या दोन चिवट अभ्यासकांच्या जिज्ञासेचे केंद्र ठरलेले तगर हे शहर राजवाड्यांना कुठे आहेसे वाटले, ते पुढील लेखांकात…