अवनीश पाटील
गूगल आणि विकिपीडियाच्या आधीच्या काळात एखाद्या भाषेत विश्वकोश असणे, हे त्या भाषेच्या बौद्धिक परिपक्वतेचे चिन्ह मानले जात असे. विश्वकोश म्हणजे केवळ माहितीचा साठा नव्हे, तर एका समाजाच्या ज्ञानेच्छेचा, भाषिक आत्मसन्मानाचा आणि आधुनिकतेच्या दाव्याचा दस्तावेज असतो. ए. आर. वेंकटचलपती यांचे ‘द ब्रीफ हिस्टरी ऑफ अ व्हेरी बिग बुक, द मेकिंग ऑफ द तमिळ एन्सायक्लोपीडिया’ हे पुस्तक तमिळ भाषेतील ‘कलईक्कलंजीयम’ या महत्त्वाकांक्षी विश्वकोशाच्या निर्मितीमागील श्रम, जिद्द आणि सामूहिक संकल्पाची सूक्ष्म व चिंतनशील कहाणी उलगडते. मराठी वाचकाला हे वाचताना सहजच आपल्या विश्वकोश परंपरेचीही आठवण होते.

हे पुस्तक केवळ एका प्रकल्पाचा इतिहास नाही. विसाव्या शतकातील तमिळनाडूचा बौद्धिक प्रवास, भाषाशुद्धीचे वाद, मुद्रणसंस्कृती, संस्थात्मक अडथळे आणि सांस्कृतिक राजकारण यांचा तो सखोल दस्तावेज आहे. विश्वकोश तयार करणे म्हणजे केवळ ज्ञान गोळा करणे नव्हे. कोणतीही भाषा आधुनिक संज्ञा कशी घडवते, स्वत:ला कशी प्रमाणित करते आणि स्वत:चे सांस्कृतिक स्थान कसे निर्माण करते, याचीही ती प्रक्रिया असते. हे पुस्तक सातत्याने हेच वास्तव अधोरेखित करते.

पुस्तकाचा पहिला भाग संस्थात्मक पाठबळ नसताना वैयक्तिक जिद्दीवर विश्वकोश घडवणार्‍या, झपाटलेल्या व्यक्तींना समर्पित आहे. ए. सिंगारवेलू मुदलियार (१८५५-१९३१) यांनी १८९० च्या सुमारास ‘अभिताना चिंतामणी’ हा विश्वकोश तयार करण्याचे काम हाती घेतले. इंग्रजी कोशकार सॅम्युअल जॉन्सनप्रमाणेच त्यांनी एकट्याने संशोधन केले. या कामापायी त्यांचे आरोग्य ढासळले आणि पैसाही खर्ची पडला. अखेरीस एका आश्रयदात्यामुळे १९१० मध्ये हा ग्रंथ प्रकाशित झाला. पुढे मृत्यूपर्यंत त्यांनी दुसर्‍या आवृत्तीचे काम सुरूच ठेवले.

पुस्तकातील सर्वांत लक्षात राहणारी व्यक्तिरेखा म्हणजे टी. व्ही. संबासिवम पिल्लई. एक साधा पोलीस कारकून, पण तमिळ-इंग्रजी वैद्यकीय शब्दकोश घडवण्याचा ध्यास घेतलेला. या कामासाठी त्यांनी १३ एकर वडिलोपार्जित जमीन विकली आणि निवृत्तिवेतनही खर्च केले. पाच खंडांच्या या प्रचंड उपक्रमातील निम्मे काम पूर्ण होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. लेखकाने नोंदवलेला तपशील अस्वस्थ करणारा आहे. त्यांच्या अंत्ययात्रेवेळी आयुष्यभराच्या मेहनतीची छापील पाने तिथेच पडून होती. ज्ञाननिर्मितीमागे किती वैयक्तिक झीज दडलेली असते, याची यातून प्रकर्षाने जाणीव होते.

तमिळ विश्वकोशाची अधिकृत घोषणा झाली १५ ऑगस्ट १९४७ रोजी आणि हा प्रवास संस्थात्मक प्रयत्नांकडे वळला. या टप्प्यात टी. एस. अविनाशिलिंगम आणि मुख्य संपादक एम. पी. पेरियास्वामी थूरन हे दोन आधारस्तंभ होते. अविनाशिलिंगम यांनी सरकारी निधीसाठी प्रयत्न केले. थूरन यांनी संपादकीय जबाबदार्‍या आयुष्य वेचून पेलल्या. त्यांच्या समर्पणाचे एक उदाहरण लेखक देतात. त्यांच्या मुलीच्या आजारपणाच्या वेळीही त्यांच्या मनात प्रथम आलेला विचार असा होता, या आजाराची नोंद विश्वकोशात आहे का. हे वाक्य या उपक्रमाने त्यांना किती व्यापून टाकले होते, याचे मार्मिक प्रतीक आहे.

पण मोठ्या सांस्कृतिक प्रकल्पांमागे केवळ आदर्श नसतात. गोंधळ, अपुरे वेतन, कर्मचार्‍यांचा अभाव आणि गैरव्यवहारही असतात. संस्थेच्या खजिनदाराने तब्बल तीन लाख रुपयांचा अपहार केला. त्या काळच्या एकूण अंदाजपत्रकाच्या मोठ्या भागाइतकी ही रक्कम होती. अंतिम ग्रंथाच्या भव्यतेमागे दैनंदिन पातळीवर किती अस्थिरता असते, हे लेखक चपखल दाखवतात.

विश्वकोशामुळे भाषेचे राजकारणही टोकदारपणे समोर आले. विज्ञानासाठी तमिळ प्रतिशब्द तयार करताना शुद्ध तमिळ वापरावी की संस्कृतप्रचुर संज्ञा स्वीकाराव्यात, यावरून वाद निर्माण झाले. द्रविड चळवळीच्या नेत्यांनी विश्वकोशावर टीका केली की तो प्रसिद्ध इंग्रजी विश्वकोश ‘ब्रिटानिका’चे अनुकरण आहे, त्यात पुराणातील निरुपयोगी संदर्भ भरले आहेत आणि त्यावर ब्राह्मणी छाप आहे. म्हणजेच वाद ज्ञानावर कोणाचा ताबा असणार, याचाही होता.

तमिळ अकादमीने अनेक जुन्या नोंदी नष्ट केल्याने त्यांच्याकडे तयार अभिलेख उपलब्ध नव्हते. उरलेल्या पत्रव्यवहार, शासकीय फाईली, खतावण्या आणि खासगी कागदपत्रांच्या आधारे त्यांनी हा इतिहास पुन्हा बांधला गेला. म्हणूनच हे पुस्तक एखाद्या संस्थेची अधिकृत कथा वाटत नाही. ते हरवलेल्या पुराव्यांमधून घडवलेली एक बौद्धिक पुनर्रचना वाटते. त्यात शैक्षणिक काटेकोरपणा आहे, पण शैली क्लिष्ट नाही. मानवी संघर्ष आणि संस्थात्मक तपशील यांचा तोल लेखकाने अचूक राखला आहे. कलईक्कलंजीयम १९५४ ते १९६८ या काळात प्रसिद्ध झाला. तो आज कालबाह्य वाटू शकतो, पण त्याचे ऐतिहासिक महत्त्व कमी होत नाही. तो एका पिढीच्या बौद्धिक आत्मविश्वासाचा पुरावा आहे. एका भाषेला आधुनिक ज्ञानाच्या तोडीस तोड उभे करण्यासाठी किती चिकाटी, श्रम आणि संघटनशक्ती लागते, याची तो ठळक साक्ष आहे. मराठी वाचकांसाठी हे पुस्तक विशेष महत्त्वाचे ठरते.

मराठी विश्वकोश, मराठी कोशपरंपरा आणि ज्ञानभाषा म्हणून मराठीची उभारणी यामागेही अशाच संघर्षकथा दडलेल्या असतील. आपल्या भाषेतील मोठे प्रकल्प आपण तयार स्वरूपात पाहतो, पण त्यामागच्या आयुष्यभराच्या धडपडीची नोंद क्वचितच घेतो. आज मराठीवर इंग्रजीचे वाढते वर्चस्व, शिक्षणातील मागे पडणे आणि ज्ञानभाषा म्हणून कमी होत चाललेला आत्मविश्वास या पार्श्वभूमीवर वेंकटचलपती यांचे हे पुस्तक अधिकच विचारप्रवृत्त करणारे ठरते.

हे पुस्तक एक महत्त्वाची जाणीव करून देते. ज्ञाननिर्मिती ही केवळ कल्पनांची नव्हे, तर श्रमांची, संस्थांची, पैशांची, संघर्षांची आणि भाषिक स्वप्नांची कहाणी असते. गूगलपूर्व काळात ज्ञानाचा प्रत्येक शब्द आपल्या भाषेत आणण्यासाठी माणसांनी आयुष्ये वेचली. म्हणूनच हे पुस्तक अंतर्मुख करते. एक प्रश्न सारखा मनात रुंजी घालतो, आपण आपल्या मराठी भाषेसाठी, तिच्या ज्ञानभांडारासाठी आणि तिच्या विश्वकोशासाठी तेवढी धडपड करत आहोत का?

‘द ब्रीफ हिस्टरी ऑफ अ व्हेरी बिग बुक, द मेकिंग ऑफ द तमिळ एन्सायक्लोपीडिया’

  • लेखक : ए. आर. वेंकटचलपती
  • प्रकाशक : पर्मनंट ब्लॅक
  • पृष्ठे : १४३, किंमत : ३९५ रुपये

avnishpatil@gmail.com