तमिळनाडूच्या राजकारणात सुपरस्टारचे अतूट नाते आहे करुणानिधी, एमजीआर, जयललिता यांची सरकारे ही सतत वाद, कुरघोडी, आर्थिक भ्रष्टाचार यानेच देशभर गाजली. आता विजय थलपती यांची या कुरघोडीच्या राजकारणाची परीक्षा सुरू होतेय, त्यात ते कितपत यशस्वी होताहेत हे येणारा काळच सांगेल. त्यांनी जनतेला अंतर्गत लग्नासाठी आठ ग्राम सोने देणार म्हणून घोषणा केली ती अतिशय घातक आणि भविष्यात गटांगळ्या खाणारी आहे. २०० युनिट वीज मोफत देण्यापेक्षा वीज युनिट दर परवडण्यासारखे ठेवणे गरजेचे होते. महिलांना बस प्रवास फुकट देण्याऐवजी महिलांना अर्ध तिकीट सवलत व ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास देणे योग्य ठरले असते. वर्षाला सहा सिलेंडर मोफतऐवजी भक्कम सबसिडी देणे योग्य होते. गृहिणींना अडीच हजार अर्थ साहाय्याऐवजी घरगुती उत्पन्नाचे स्रोत निर्माण करून स्वावलंबी बनवणे गरजेचे होते. गरजू विद्यार्थ्यांना वार्षिक मदत व ज्येष्ठ नागरिक / विधवा / दिव्यांगांना तीन हजार पेन्शन योजना हे मात्र समर्थनीय आहे. पण तूप आणि साखर लावलेले गाजर दाखवून सुपरस्टार विजय यांनी पहिल्या झटक्यात शतकी खेळी पार केली आहे. अर्थात विधानसभेत सक्षम विरोधी पक्ष असल्यामुळे त्याला तोंड देताना टीव्हीकेच्या तोंडाला फेस आल्याशिवाय राहणार नाही. केंद्रात भाजप सरकार जीडीपीचा परतावा देईल काय ही शंकाच आहे. तमिळनाडूच्या राज्यपालांचे वागणे हे कोश्यारींसारखेच आहे. शिवाय या सरकारला कसे कोंडीत पकडता येईल याची रणनीती तयार असणार. सरकार लवकरच उलथवण्याचे राजकारण विरोधी व भाजप पक्ष नक्की करणार यात शंका नाही. भविष्यातील राजकीय संकटांना तोंड देऊन त्यात यशस्वी होण्याचे सामर्थ्य विजय थलपती यांना लाभो ही सदिच्छा.

– यशवंत चव्हाण, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई</strong>

असे हाल सोसते मराठी…

दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात तब्बल ९४ हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याची आकडेवारी धक्कादायकच नाही तर चिंताजनकदेखील आहे. ज्या मातृभाषेचे बाळकडू घरातून मिळते, ज्या भाषेत आपण विचार करतो आणि स्वप्ने पाहतो त्याच मराठी भाषेत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यापुरतेही गुण मिळू नयेत यासारखी शोकांतिका नाही. मराठी भाषेची महाराष्ट्रातच अशी दयनीय अवस्था का झाली? मराठीत इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी अनुत्तीर्ण होण्यामागे समाजाची मानसिकता कारणीभूत आहे. मुले वाचतात ती फक्त पाठ्यपुस्तके. विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन जवळपास संपुष्टात आले आहे. वर्तमानपत्र, मासिके, कथा, कादंबरी, आत्मचरित्रे वाचनाची सवय नसल्यामुळे भाषेवर पकड तयार होत नाही. वाचन नसल्याने शब्दसंग्रह कमी असतो. मराठी लेखन तर जवळपास दुर्मीळ होत चालले आहे. जे लिहितात त्यांच्याही लेखनात शुद्धलेखन आणि व्याकरणाच्या असंख्य चुका असतात. मराठी विषयाचे शिक्षकही विद्यार्थ्यांमध्ये मराठीची आवड निर्माण करण्यात कमी पडत आहेत.

– श्याम ठाणेदार, दौंड, जिल्हा पुणे</strong>

नवनेतृत्वाचे काय?

‘चांदनी चौकातून’ या सदरात ‘आयात मुख्यमंत्री!’ हे स्फुट (१० मे) वाचलं. काँग्रेसमुक्त भारत करावयास निघालेल्या पक्षास काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांचाच आधार घ्यावा लागणं यातून कोणता संकेत मिळतो, हे ज्याचे त्याने ठरवावे. महाराष्ट्रातदेखील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष राजकीय पटावरून नष्ट करण्यासाठी त्या पक्षातील नेत्यांच्या (!) हाती राज्याची सूत्रे देण्याचा प्रयोग झाला. हिमंता बिसवा सरमा, सर्वानंद सोनोवाल, प्रेमानंद खांडू, बिरेंद्र सिंग यांच्या जाण्याने त्या त्या राज्यात भाजपची सत्ता आली किंवा श्रेष्ठींना राज्यांत सत्तास्थापनेसाठी इतर नियामक संस्थांची मदत घ्यावी लागली हा वादाचा विषय होऊ शकतो. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळापर्यंत राज्याराज्यात स्थानिक नेतृत्व होते, पक्षाच्या बैठकांत त्यांना काही स्थान होते. आज व्यक्तिपूजेला महत्त्व आल्याचे नाकारून चालणार नाही. पक्षाने अनुसरलेल्या एकचालकानुवर्ती परंपरेमुळे कार्यकर्त्यांतील नेतृत्वगुणांना वाव मिळण्याची शक्यता तशी धूसरच. अशा परिस्थितीत पक्षात नवनेतृत्व कसे निर्माण होणार हा प्रश्न अनुत्तरित राहतो.

– शैलेश न. पुरोहित, मुलुंड, मुंबई

बाबासाहेबांच्या विचारांची प्रतारणा कशी?

‘हा बाबासाहेबांचा वैचारिक पराभव नाही का?’ हा शाहू पाटोळे यांचा लेख (१० मे) वाचला. १४ ऑक्टोबर १९५६ ला पूर्वाश्रमीच्या महारांना बौद्ध धर्माची दीक्षा देताना बाबासाहेबांनी ज्या २२ प्रतिज्ञा दिल्या होत्या त्यापैकी बहुतेक बाबासाहेबांचे नवदीक्षीत बौद्ध अनुयायी कसोशीने पाळण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळेच ते आज सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत. त्यामुळे केवळ जनगणनेच्या रकान्यातील जात या रकान्यात आपली पूर्वाश्रमीची जात नमूद करणे म्हणजे ‘‘बाबासाहेबांचे अनुयायी महामानवाच्या विचारांची प्रतारणा करत आहेत’’ हे लेखकाचे म्हणणे कितपत योग्य आहे? जनगणनेच्या रकान्यात जात या रकान्याचा उल्लेखच नसता तर आताच्या नवबौद्धांना आपल्या पूर्वाश्रमीच्या जातीचा उल्लेख करण्याचे काहीच कारण नव्हते. याच लेखात लेखक असेही म्हणतात की तब्बल ९० वर्षांनंतर देशातील सर्व जातींची माहिती संकलित केली जाणार आहे; पण त्यात ओबीसींचा समावेश करण्यात आलेला नाही. पण ‘ओबीसी’ अशी कोणतीही जात अस्तित्वात नसून ‘ओबीसी’ हा इतर मागासवर्गीय जातींचा समूह आहे हे लेखक सोयीस्कररीत्या विसरतात. या ओबीसी प्रवर्गातील प्रत्येक नागरिकाला आपल्या स्व-जातीचा उल्लेख ‘जात’ या रकान्यात करावा लागणारच आहे. त्यामुळे आताच्या नवबौद्धांनी आपल्या पूर्वाश्रमीच्या जातीचा उल्लेख जात या रकान्यात करण्यास लेखकाचा आक्षेप का हे कळण्यास मार्ग नाही आणि तो केल्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांची प्रतारणा होते, असा अजब तर्क लेखकाने लावला आहे.

– सावळाराम मोरे, नालासोपारा

नगरसेवकांनी पुढाकार घ्यावा

‘स्वगणनेला थंड प्रतिसाद’ ही राज्यातील जनगणना प्रक्रियेतील ऑनलाइन नोंदणीच्या आकडेवारीची बातमी (९ मे) वाचून नवल वाटले नाही. नागरिकांचा ऑनलाइन संकेतस्थळांवर माहिती भरणे, लिंक ओपन करून ऑनलाइन प्रतिसाद देणे आणि एकंदरीत प्रशासकीय घोषणा व योजनांच्या धोरण अंमलबजावणीच्या व्यवस्थेवर विश्वास राहिलेला नाही. समाजमाध्यमांवर टाकलेल्या माहितीचा गैरवापर होण्याचे वाढलेले प्रमाण या भीतीला कारणीभूत आहे. खरेतर .ॠः५. ्रल्ल वाले संकेतस्थळ आणि शेवटी ‘ॅ’ अक्षर असलेला मोबाइलवरील संदेश हे धोकादायक नाहीत हे किती तरी वेळा सांगितले जाते. त्यामुळे अशा संकेतस्थळांवर १५-२० मिनिटांत किमान आवश्यक माहिती भरून, विशिष्ट स्वगणना क्रमांक साठवून मग तो जनगणना करायला प्रत्यक्षात येणार्‍यांना दाखवला तर ते त्यावरून आधीच साठवलेल्या माहितीच्या पुढील भाग पूर्ण करू शकतील. हे समजावून सांगायला त्या त्या प्रभागातील नगरसेवकांनी पुढे यायला हवे. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळेस आपण ज्या मतदारांना पुन्हा पुन्हा मतदार स्लिपा पाठवत होतो, त्यांना या स्वगणना संकेतस्थळाची व त्या प्रक्रियेची माहिती द्यायला कितीसा वेळ लागेल, हा विचार त्यांनी करावा.

– श्रीपाद पु. कुलकर्णी, बिबवेवाडी, पुणे

सामान्य वाचकांनाही प्रेरणा

‘‘बातम्यांचा ‘टर्नर’ पॉइंट’’ हा अग्रलेख (९ मे) केवळ एका उद्योगपतीची यशोगाथा सांगत नाही, तर अफाट धाडस, दूरदृष्टी, जोखीम पत्करण्याची वृत्ती आणि संकटांवर मात करण्याची मानसिकता काय असते, याचे दर्शन घडवतो. ‘२४ तास बातम्या’ ही कल्पनाच जिथे अशक्य मानली जात होती, तिथे टर्नर यांनी सीएनएन उभी करून इतिहास घडवला. व्यवसायात मोठे धोके पत्करताना त्यांनी अपयश, कर्ज आणि टीका सोसली; पण नावीन्याचा ध्यास कधीही सोडला नाही. हा लेख केवळ माध्यमविश्वाचा इतिहास उलगडत नाही, तर संघर्षातून फिनिक्सप्रमाणे उभे राहण्याचा एक प्रेरणादायी धडा ठरतो. या निमित्ताने मार्क झुकरबर्ग यांचे सुप्रसिद्ध वाक्य आठवते: ‘‘सर्वात मोठा धोका म्हणजे कोणताही धोका न पत्करणे. वेगाने बदलणार्‍या या जगात अपयशाची खात्री देणारा हा एकमेव मार्ग आहे.’’ हे संपादकीय वाचताना प्रकर्षाने जाणवते की, जीवनातील ‘टर्निंग पॉइंट’ बाहेरून येत नसतो; तो संकटांना आणि आव्हानांना आपण कसे सामोरे जातो, यातूनच घडतो. म्हणूनच हा अग्रलेख केवळ नवोदित उद्योजकांनाच नव्हे, तर सामान्य वाचकांनाही प्रेरणा देणारा ठरेल.

– राघवेंद्र मण्णूर, डोंबिवली