तमिळ साहित्य क्षेत्रातील याोगदानासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारे पी. माणिकवासगम हे पूमणि या टोपणनावाने ओळखले जात. त्यांनी आयुष्यभर प्रशासनात सहकार विभागात उप-निबंधक (डेप्युटी रजिस्ट्रार) म्हणून काम केले, हे काम तसे तांत्रिक आणि रुक्ष. पण तसे काम केलेल्या पूमणि यांचे लेखन मात्र  अत्यंत वास्तववादी, प्रभावी आणि संवेदनशील होते. त्यांनी ‘करिसल भूमी’ (प्रामुख्याने कोरडी काळी माती असलेला प्रदेश) तील लोकांचे जीवन शब्दबद्ध केले. त्यांच्या या लिखाणाची सर्व पातळ्यांवर दखल घेतली गेली. या भागातील, विशेषत: दलितांच्या जीवनाचे प्रभावी चित्रण करणार्‍या पूमणि यांना तमिळ साहित्यात अढळ स्थान आहे.

पूमणि यांचा जन्म १२ मे १९४७ रोजी थुथुकुडी जिल्ह्यातील आंडीपट्टी येथे पुलिथुरई आणि थेनम्माई यांच्या पोटी एका अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात झाला. आईकडून तसेच त्यांच्या समाजातील इतर लोकांकडून गोष्टी ऐकत ते लहानाचे मोठे झाले. या गोष्टींनी त्यांच्या मनावर खूप परिणाम केला. ‘करिसल’ शैलीमधले लेखक की. राजनारायणन यांच्या लिखाणापासून आपण प्रेरणा घेतली असे पूमणि सांगत. पी. केसवदास यांच्या अयलकार म्हणजेच शेजारी या पुस्तकानेही त्यांना भुरळ घातली. विचार करायला भाग पाडले. कल्की, ना. पार्थसारथी व अकिलन या त्या काळातील लेखकांनीही पूमणि यांच्यामधला लेखक जागा केला.

१९७५ मध्ये ‘मरई’ या मासिकात प्रकाशित झालेल्या ‘अरुप्पु’ (कापणी) या लघुकथेने ‘पुमानी’ यांच्या साहित्यिक कारकीर्दीची सुरुवात झाली. ‘अग्न्यादी’ या महाकादंबरीला २०१४ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. ही कादंबरी शिवकाशी आणि परिसरातील जातीय संघर्ष व भेदभावावर आहे. तिने १७० वर्षांचा पट व्यापला आहे.

पूमणि यांचा ‘रीथी’ हा लघुकथा संग्रह तमिळ लघुकथांच्या इतिहासातील एक मैलाचा दगड आहे, असे तमिळ साहित्यातील जाणकार सांगतात. अत्यंत कमी शब्दांत प्रभावी कथा सांगणार्‍या या संग्रहाने वाचकांचे ताबडतोब लक्ष वेधून घेतले होते. त्यांच्या ‘वरप्पू’, ‘वैक्कल’ यांसारख्या साहित्यकृतींनी ग्रामीण कौटुंबिक जीवनाचे विलक्षण वास्तववादी चित्रण केले. ज्या शब्दांना तमिळ शब्दकोशात कधीच स्थान मिळाले नव्हते अशा अनेक प्रादेशिक शब्दप्रयोगांचे पूमणि यांच्या साहित्यातून जतन झाले आहे, असे जाणकार त्यांच्याबाबत सांगतात. त्यांच्या ‘अग्न्यादी’ या कादंबरीचे शीर्षकही अशाच एका बोलीभाषेतील शब्दावरून घेतले गेले होते. पूमणि कोणत्याही राजकीय चळवळीशी औपचारिकपणे जोडले गेले नसले, तरी त्यांचे डावेपण कधीच लपून राहिले नव्हते. जातीय अत्याचारांना विरोध आणि कष्टकरी वर्गाबद्दलची मनापासूनची तळमळ ही त्यांच्या साहित्यिक योगदानाची प्रमुख वैशिष्ट्ये होती, असेही त्यांच्याबद्दल म्हटले गेले. 

लेखक म्हणून पूमणि हे फक्त कथा, कादंबरी या साहित्यप्रकारांपुरतेच सीमित राहिले नाहीत. त्यांच्या लेखणीने चित्रपट क्षेत्राचीही सफर केली. त्यांनी १९९६ मध्ये ‘करुवेलम पूक्कल’ या चित्रपटाचे पटकथा लेखन आणि दिग्दर्शन केले होते तर ‘असुरन’ हा २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला आणि गाजलेला चित्रपट त्यांच्या ‘वेक्काई’ या कादंबरीवर आधारित होता. या संवेदनशील लेखकाचा जीवनप्रवास ७९ वर्षांच्या योगदानानंतर आता थांबला आहे.