गायत्री लेले, सहाय्यक प्राध्यापक, राज्यशास्त्र विभाग, मिठीबाई महाविद्यालय, मुंबई
या देशावर सुमारे पाचशे वर्षे राज्य करणार्या मुघलांचा इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचूच नये, असे प्रयत्न सुरू असण्याचा हा काळ. मुघलांच्या राजकारणाची, क्रौर्याची आणि त्यापलीकडे जाऊन त्यांच्या विद्वत्तेची, कला-कौशल्यांची, खासगी आयुष्यातील गणितांची मीमांसा करणारे हे पुस्तक महत्त्वाचे ठरते, ते त्यामुळेच…
कुठलाच इतिहास हा एकरेषीय नसतो, भारताचा इतिहासही त्यास अपवाद नाही. त्यात अनेक खाचखळगे आहेत, हिंसा आहे, सत्तासंघर्ष आहे, अवघड वळणे आहेत आणि निर्णायक क्षण आहेत. भारतीय इतिहासातील असाच एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे मुघल साम्राज्य. बाबराने भारतात प्रवेश केल्यापासून औरंगजेबाच्या काळापर्यंत मुघलांनी जवळजवळ संपूर्ण भारतावर सत्ता प्रस्थापित केली होती. आत्ताच्या राजकीय वातावरणात मुघल साम्राज्याचा इतिहास सांगणे, शिकवणे, त्याचे टीकात्मक विवेचन करणे ही एक अवघड बाब झाली आहे. पाठ्यपुस्तकांमध्ये याविषयी समग्र माहिती मिळणार नाही आणि त्यामुळे सामान्यांची या इतिहासाशी कदाचित फारशी ओळखच होणार नाही, अशी परिस्थिती भविष्यात उद्भवू शकते. अशा वातावरणात तनुश्री पोद्दार यांच्या ‘शहेनशहाज, बेगम्स अँड शहाजादीज’ या पुस्तकाचे स्वागतच केले पाहिजे.
मुघलांनी या देशावर साधारण पाचशे वर्षे राज्य केले. त्यांचा इतिहास एका ग्रंथात मांडणे तसे कठीण काम. याआधीही असे प्रयत्न झाले आहेत. वेगवेगळ्या मुघल राजांची चरित्रे ब्रिटिशांपासून अनेकांनी लिहिली आहेत. मुघलकालीन स्त्रियांवरही लेखन झालेले आहे- जसे बाबराची कन्या गुलबदन किंवा शहाजहानची पत्नी मुमताज महल यांच्यावर स्वतंत्र कामे झालेली आहेत. मग या नव्या ग्रंथात नवीन काय सापडेल, याबाबत उत्सुकता वाटते. पुस्तकाच्या नावातच याचे उत्तर आहे. हा केवळ मुघल शहेनशहांचा दस्तावेज नाही, तर त्यांच्या बेगम आणि शहाजाद्यांचादेखील लेखाजोखा आहे. या सगळ्यांबद्दल समग्र माहिती हवी असल्यास हे पुस्तक एक उत्तम पर्याय आहे. तनुश्री या स्वत: इतिहासकार नाहीत. त्यामुळे त्यांच्या लेखनाची भाषा अकादमिक आणि बोजड नसून, सर्वसामान्य वाचकांना कळेल अशी सोपी आणि प्रवाही आहे. त्यामुळे मुघल राजे आणि त्यांच्या राण्यांची ज्यांना एकत्रितपणे सहज ओळख करून घ्यायची असेल, त्यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
पोद्दार यांनी पुस्तकाची रचना तीन भागांत केली आहे. पहिल्या भागात बाबर ते औरंगजेबापर्यंत सर्व सम्राटांची चरित्रे आहेत. दुसर्या भागात मुघल साम्राज्यातील जनानखान्यांची व्यवस्था, तसेच त्यात राहणार्या विविध स्त्रियांची माहिती आहे. तिसर्या भागात मुघल परिवारांमधील संघर्ष आणि प्रेमकहाण्या यांचा थोडक्यात परामर्श आहे. या रचनेमुळे मुघलांचा गुंतागुंतीचा इतिहास सुटसुटीत आणि वाचनीय होण्यास मदत झाली आहे.
पहिल्या भागातील प्रत्येक प्रकरण काही उपभागांमध्ये विभागलेले आहे. प्रत्येक राजाचा थोडक्यात परिचय, त्याचे बालपण- शिक्षण, त्यांच्या साम्राज्याचा- सत्तेचा आवाका, त्याच्या पत्नी आणि बायका, त्यांची व्यसने आणि मृत्यू असा आढावा घेतला गेला आहे. यामध्ये बराचसा भाग चरित्रात्मक पद्धतीने लिहिला गेला असला, तरीही त्यातून अनेक रोचक गोष्टी समोर येतात. बाबराची साम्राज्यप्राप्तीची ओढ कशी वर्धित होत गेली, याची कथा यात आहे. त्याचा पूर्वज तैमूर याने कधीकाळी सत्ता गाजवलेली केंद्रे काबीज करून घ्यायची असा निर्धार करून बाबर समरकंद, तसेच पुढे भारताकडे कूच करतो आणि मुघलांनी गमावलेले वैभव काहीही करून हस्तगत करायचे हे ध्येय ठेवतो. याला कारणीभूत ठरते ती १११ वर्षांची एक स्त्री, जिच्याकडून बाबर त्याच्या पूर्वजांच्या कथा ऐकतो आणि प्रेरित होतो. त्यानंतर तो आगेकूच करतो आणि त्यातून हिंदुस्थानाचा नकाशा आणि नशीब दोन्ही बदलते.
परंतु सत्ता हस्तगत करून ती टिकवायची कशी, हा प्रत्येक राजासमोरचा एक महत्त्वाचा पेच होता. भारतातील प्रचंड उकाडा आणि रोगराई यांमुळे बाबराचे सैन्य ग्रासून गेले होते. बाबराने त्याच्या काही सैनिकांना काबूलला परत जाऊ दिले ते याच कारणासाठी. हिंदुस्तानची राजधानी दिल्ली असावी हे बाबराने त्याच्या ‘बाबरनाम्या’त लिहून ठेवले आहे. बाबराचा त्याचा मुलगा हुमायून याच्यावर असलेला जीव, हुमायून आणि हमीदा बेगम यांच्या पोटी जन्माला आलेला अकबर, अकबराने वाढवलेले साम्राज्य आणि त्याच काळात साम्राज्यात वाढलेला अविश्वास व हिंसा, अकबर आणि त्याचा पुत्र सलीम (जहांगीर) यांच्यात असणारी तेढ, परंतु त्याच वेळेस अकबर आणि त्याचा नातू खुर्रम (शहाजहाँ) यांच्यात असणारे प्रेमाचे नाते, मुलगा औरंगजेब याच्याशी शाहजहाँचे असलेले दुराव्याचे संबंध आणि औरंगजेबाची क्रूरता व अंत असा मोठा पट या प्रकरणांमध्ये प्रवाहीपणे उलगडला आहे. हा प्रवास शेवटचा मुघल राजा बहादूरशहा जफर याच्यापर्यंत येऊन थांबतो. बाबराने कमावलेले वैभव ते बहादूर शहा जफरचा कोणाला कळेल न कळेलसा अंत वाचकाला नक्कीच विचारप्रवृत्त करतो. सत्ता, संपत्ती आणि साम्राज्याच्या क्षणभंगुर स्वरूपाचे या प्रकरणांतून दर्शन होते.
बर्याच जणांना कदाचित ज्ञात असलेल्या माहितीबरोबरच (जसे बाबराने पानिपतच्या युद्धात इब्राहिम लोधीचा केलेला पराभव वगैरे), या राजांच्या जटिल आणि चमत्कारिक व्यक्तिमत्त्वांचाही आढावा घेतला गेला आहे. हे राजे आत्यंतिक क्रूर होते. दारू, अफू आणि स्त्रियांच्या आहारी गेलेले होते. सर्वांनाच कुटुंबाच्या आतच सत्तासंघर्षाला सामोरे जावे लागले. जवळच्या नातेवाईकांना, प्रसंगी अगदी वडील व भावंडांनाही शह द्यावा लागला, मार्गातून दूर करावे लागले. त्यामुळे परकीय सत्तेचे आक्रमण हा सततचा धोका होताच, पण स्वकीयांशी युद्ध आणि चढाओढ हे या मांदियाळीतील प्रत्येक राजाचे प्राक्तन होते. अशी दुहेरी टांगती तलवार घेऊन या मंडळींनी राज्य केले.
आक्रमणे आणि साम्राज्याचा विस्तार यापलीकडे जाऊन माणूस म्हणून या व्यक्तींचा विचार कमी वेळा केला जातो. तनुश्री यांनी तो विचार प्रत्येक प्रकरणात केला आहे. क्रूर आणि साम्राज्यवादी प्रवृत्ती असणार्या राजांचे इतर अनेक मानवी कंगोरे संदर्भासहित मांडले आहेत. उदाहरणार्थ, बाबर एक अतिशय हळवा बाप होता. हुमायूनसाठी त्याने आपले प्राण पणास लावले होते. हुमायून हा भावंडांप्रति कनवाळू होता. ज्या भावांनी त्याची हत्या करण्याचा कट रचला होता, तो उघडकीस येऊनही त्यांना माफ करण्याचे मोठे मन त्याच्याकडे होते. दोघेही कविता करत असत आणि पुस्तकांचा मोठा संचय त्यांनी केला होता. अकबराची नवरत्ने सगळ्यांना ज्ञात आहेतच. परंतु अकबर हा कलासक्त तर होताच, शिवाय प्राणिजगताविषयी अत्यंत सूक्ष्म ज्ञान बाळगून होता याची माहिती मिळते. जहांगीरच्या काळात पर्शियन साहित्याची भरभराट झाली. तो असा राजा होता, जो हळवा होता आणि कुठेही कोणत्याही कारणासाठी तो सहज रडत असे, असे आश्चर्यकारक वाटावेत असे उल्लेख आढळतात. औरंगजेबाला अनेक भाषा अवगत होत्या, शिवाय तो उत्तम सुलेखन करत असे. त्याची कुराणाची हस्तलिखिते मक्का आणि मदिनेला पाठवली गेली होती, असाही उल्लेख येतो. थोडक्यात, सर्वसामान्यांना ज्ञात असलेल्या माहितीशिवाय वेगळे असे काही रंजकरीत्या समोर येते. त्यामुळे इतिहासाकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून पाहण्यास वाचक प्रवृत्त होतात.
या सगळ्यांच्या आयुष्यातील स्त्रियांच्या स्थानाविषयीचा विचारही सहसा सखोलतेने होत नाही. या पुस्तकात मात्र लेखिकेने तो करायचा प्रयत्न केला आहे. मुघलांचे जनानखाने हे बंदिस्त आणि गोपनीय असत. तिथल्या स्त्रियांचे स्वत:चे राजकारण आणि सत्तासंघर्ष होता. सम्राटाच्या म्हणजेच सत्तेच्या अधिकाधिक जवळ जाण्यासाठी त्यांच्यात चढाओढ होती. प्रत्येक मुघल सम्राटाने जनानखाने बाळगले, अकबराच्या काळात तर तेथील ्त्रिरयांची संख्या पाच हजारांच्या वर गेली होती. म्हणजेच हे जनानखाने स्वत:तच लहान शहरे होती. तनुश्री आपल्या पुस्तकात या बायांचे जग केवळ काहीतरी अगम्य अथवा सुरसकथेसारखे रंगवत नाहीत. या सगळ्या हाडामांसाच्या, विचार करू शकणार्या, स्वत:कडे ‘एजन्सी’ असणार्या हुशार बायका म्हणून समोर येतात. अर्थात त्यांना अनेकानेक मर्यादा होत्या, आणि आपल्या छोट्यामोठ्या धाडसांसाठी त्यांना सतत किंमत चुकवावी लागली. त्यांचे आयुष्य कायम सम्राटाभोवतीच फिरत राहिले. परंतु त्यातल्या अनेकींमुळे मुघलांच्या राज्याचे रक्षण झाले आणि काहींमुळे त्यांचा इतिहास लिखित स्वरूपात शिल्लक राहिला हेही खरे.
जसे बाबराची मुलगी गुलबदन हिने स्वत:बद्दल तर लिहून ठेवले आहेच, शिवाय ‘हुमायूननामा’ या ग्रंथात तिने बाबर आणि हुमायून या दोघांच्या आयुष्यातील आठवणी टिपून ठेवल्या आहेत. अकबराने प्रोत्साहन दिल्यामुळे तिने हा ग्रंथ लिहिला. त्याद्वारे त्या काळाचा एक महत्त्वाचा लिखित पुरावा जगास उपलब्ध झाला. नूरजहाँ ही कपडे शिवण्यात पारंगत होती, शिवाय तिला स्थापत्यशास्त्राचे सूक्ष्म ज्ञान होते. औरंगजेबाची मुलगी झेबुन्निसा अनेकानेक विषयांत पारंगत होती. तिच्या वडिलांप्रमाणेच तिला सुलेखन अवगत होते, शिवाय ती युद्धकलेतही अव्वल होती असे उल्लेख सापडतात. थोडक्यात, मुघलकालीन स्त्रिया या केवळ पत्नी आणि आई नव्हत्या, तर सत्तेत भागीदारी घेऊ पाहणार्या महत्त्वाच्या व्यक्ती होत्या असे चित्र उभे राहते.
वाचकांना मुघल काळाच्या पटलावर घेऊन जाण्यास हे पुस्तक नक्की यशस्वी झाले आहे, असे म्हणता येईल. उदाहरणार्थ, या पुस्तकात सम्राटांच्या प्रेमप्रकरणांचा, भावभावनांचा उल्लेख आहे, परंतु सिनेमा अथवा मालिकांमध्ये त्याचे जसे चित्रण होते तसे ते नाही. इतिहासातील घटना आपल्याला दाखवल्या जातात त्यापेक्षा फार वेगळ्या आणि गुंतागुंतीच्या असू शकतात, याचे भान वाचकांना येऊ शकते. जसे, मुघलांच्या काळातील लग्ने ही बहुतेकदा राजकीय हितसंबंध राखण्यासाठी होत असत. अत्यंत मुत्सद्दी असे ते निर्णय असत, आणि बर्याचदा प्रेमभावनेने घेतलेले नसत. ज्या प्रेमप्रकरणांचा पुस्तकात उल्लेख आहे, त्यातही राजकारण आणि भय-संशय पुरेपूर आहे. प्रेमभावना आणि राज्यकारभार यांचा अनेकदा संघर्ष झाला. परंतु त्या संघर्षावर सातत्याने नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्नही झाला.
पुस्तकात ही सगळी गुंतागुंत गोष्टरूपाने उलगडली आहे. परंतु काही भाग माहितीपर जास्त आहेत आणि त्यातले कथानक थोडे मागे पडले आहे. विशेषत: पहिल्या भागात, ज्यात सगळ्या सम्राटांचा पट मांडला आहे. ते एकत्रितरीत्या वाचताना काही काळाने त्यातली गोष्ट हरवून केवळ माहितीचा भडिमार होतो आहे की काय, असे वाटते. बेगम आणि शहाजाद्यांबद्दलचा दुसरा भाग अतिशय वाचनीय आहे आणि एकसंध कथा म्हणून तो भाग समोर येतो. तिसरा भाग थोडक्यात आटोपला आहे आणि त्यातही माहितीचा भाग अधिक आहे. मुघलकाळातील धर्म आणि धर्मांतरे यांवर मतमतांतरे आहेत आणि वादविवादही. या पुस्तकात लेखिकेने विविध सम्राटांच्या धार्मिक धोरणांविषयी माहिती दिली आहे. मुघल राजांच्या हिंदू पत्नींविषयीही माहिती आहे. त्यांपासून निर्माण झालेल्या वंशजांवरही लिहिले आहे. पण त्याचे सखोल विश्लेषण करणे मात्र टाळले आहे. त्या काळाच्या संदर्भात धर्मांतरे किंवा धर्मनिरपेक्षता या बाबींचा खरे तर अधिक अभ्यास व्हायला हवा. या पुस्तकात लेखिकेने तो करण्याची संधी गमावली असे वाटले. परंतु हे नमूद करायला हवे की, हे सारे लिहिताना अकादमिक शिस्तही पाळली आहे. पुस्तकाच्या शेवटी अनेक संदर्भ आहेत, संदर्भटिपा आहेत. त्यामुळे हे पुस्तक जरी प्रारंभिक वाचनासाठी जास्त
उपयुक्त असले, तरी या विषयात रस असणार्यांना पुढील वाचनासाठी दिशा मिळू शकते.
आधी म्हटल्याप्रमाणे, मुख्यप्रवाही ज्ञानचर्चेत मुघलांच्या दीर्घ कारकीर्दीकडे ठरवून काणाडोळा केला जाण्याच्या काळात, ‘शहेनशहाज, बेगम्स अँड शहाजादीज’सारख्या पुस्तकांचे स्वागत व्हायला हवे. त्याचे टीकात्मक विश्लेषणही व्हायला हवे.
gayatrilele0501@gmail.com
