तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी सैल हातांनी प्रस्तावना लिहिल्या; मात्र, समीक्षा लिहिल्या त्या हात आखडता घेत. असे का करावे त्यांनी. त्याचा विचार करता लक्षात येते की, प्रस्तावना लेखन नाही म्हटले तरी प्रशस्ती लेखन असते. पुस्तक समीक्षा वा परीक्षण मात्र जबाबदारी असते आणि जोखीमही. अत्यंत निवडक व्यक्तींच्या निवडक ग्रंथांची समीक्षा करीत तर्कतीर्थांनी त्या त्या लेखकांना एका अर्थाने प्रतिष्ठा मिळवून दिली. या समीक्षा लिहितानाही मराठी समीक्षक सामान्यत: ज्या ग्रंथांना हात लावणार नाहीत, असेच ग्रंथ तर्कतीर्थांनी समीक्षार्थ निवडले. जे निवडले ते स्वत:ची आवड या निकषावर, शिवाय भावल्याशिवाय तर्कतीर्थांनी समीक्षा लेखन केले नाही. समीक्षक सव्यसाची असला पाहिजे, अशी तर्कतीर्थांची बहुधा धारणा असावी. लक्ष्यवेधकाला फक्त मत्स्यभेदाचा ध्यास हवा, शिवाय उभय हातांनी लीलया मत्स्यभेद करता यायला हवा- अर्जुनाप्रमाणे!

ह. कृ. मोहिनी, चिं. ग. काशीकर, भा. पं. बहिरट, डॉ. वा. वि. मिराशी, डॉ. के. ल. दप्तरी, डॉ. ग. श्री. खैर, डॉ. रा. चिं. ढेरे, डॉ. मु. श्री. कानडे ही सारी मंडळी एकाच धारेचे लेखन करणारी. सनातन धर्म, सांस्कृतिक इतिहास, भक्ती मार्ग, वेदोपनिषद, सदाचार, मनुस्मृती, ऋग्वेद, लज्जगौरी, महामाया हे मराठी साहित्याचे रूढ विषय नव्हेत. असलेच तर ही लेखनाची अनवट वाट म्हणायची. त्यांचे ग्रंथही तसे मराठी सर्वसामान्य वाचकांसाठी अनघड, अनभिज्ञ वाटावेत असे. ‘संशोधन मुक्तावली’, ‘अमृतानुभवकौमुदी’, ‘संतवाणीचा अमृतकलश’, ‘नाट्यविचार’, ‘औपनिषदिक जीवनसौख्य’, ‘उपनिषदर्थव्याख्या’ म्हणजे शीर्षक समजून घेण्यापासून श्रीगणेशा! ‘चणे खावे लोखंडाचे’ अशा शिवधनुषी हिकमतीने तर्कतीर्थांनी या समीक्षा लिहिल्या, म्हणजे अपवाद विषयांना साहित्याच्या वाचन प्रवाहात रूढ करण्याचा हा प्रयत्न नि खटाटोप! तर्कतीर्थांची लेखकीय मूळ बैठक तार्किक, तात्त्विक लेखनाचीच, त्यास शोभेल अशाच या समीक्षा. निवडकांची निवड नेहमी अभिजाततेच्या सीमांना स्पर्शणारी असते. या समीक्षा लेखनाने ही उपपत्ती मोहर ठेवून जाते.

वरील प्रकारच्या ग्रंथांच्या समीक्षा तर्कतीर्थांनी आत्मस्वर (इनर व्हॉइस) म्हणून लिहिल्या; पण रसिक मन घेऊन जन्मलेले तर्कतीर्थ हे मानवेंद्रनाथ रॉय, प्रा. मे. पुं. रेगे, डॉ. पां. वा. काणे यांच्यात जसे रमायचे, तितकेच ते कुमार गंधर्व, पु. ल. देशपांडे यांच्यामध्येही! समीक्षेतही हे चित्र दिसते. वरील मांदियाळीशिवाय पसंदिदा लेखन (राइटर्स चॉइस) म्हणून तर्कतीर्थांनी डॉ. इरावती कर्वे यांच्या ‘युगान्त’, गोविंद तळवलकरांच्या ‘सत्तांतर १९४७’, यशवंतराव चव्हाण यांच्या ‘कृष्णाकाठ’ ग्रंथांची केलेली समीक्षा रियाजापलीकडचे गाणे म्हणता येईल. ही मराठी साहित्य क्षितिजावरची तशी स्थितप्रज्ञ मंडळी! काही त्यांना ‘शिष्ट’ म्हणूनही संबोधत. असे सांगितले गेले आहे की, ‘नवभारत’, ‘आकाशवाणी’वर आपल्या ग्रंथाची तर्कतीर्थांनी समीक्षा केल्याचे नुसते ऐकूनही या स्थितप्रज्ञ मंडळींच्याही गालावर खळी पडली होती म्हणे!

तर्कतीर्थ टीकाकार नव्हते, होते समीक्षक! सम्+इक्ष या व्युत्पत्तीनुसार ते साहित्य कृतींकडे, त्यातील गुणदोषांकडे समशील वृत्तीने पाहात, ‘सुखदु:खे समे कृत्वा, लाभालाभौ जया-‘जयौ’’च्या कृष्णकृत उपदेशानुसार या सव्यसाची समीक्षकांनी साहित्याकडे पाहिले म्हणून त्यांच्या समीक्षा वाचनीय, विचारणीय अशा दखलपात्र मानल्या गेल्या. ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय’चे खंड १७ नि १८ क्रमश: ‘तीर्कतीर्थ स्मृतिगौरव’ व ‘तर्कतीर्थ साहित्यसमीक्षा संग्रह’ होत. सुमारे शतकभराच्या कालखंडात शे-दीडशे विद्वानांनी यात लेखन केलेले दिसते; पण ‘समीक्षक तर्कतीर्थ’ अशा अंगाचा लेख शोधूनही सापडत नाही.

‘‘तर्कतीर्थांचे लेखन ‘एन्सायक्लोपीडिस्ट राइटिंग’ सदरात मोडते. यात व्यापक विद्वत्ता, चिंतन गांभीर्य, उत्कटता, ऋजुता, नेटका युक्तिवाद, तर्क, तत्त्व साऱ्यांचा कसा मधुर मिलाप असतो,’’ असे प्रा. मे. पुं. रेगे यांनी तर्कतीर्थांच्या वैचारिक वाटचालीचे वर्णन करताना म्हटले होते. ते तर्कतीर्थांच्या समीक्षेसही तंतोतंत लागू पडते, तर्कतीर्थांची मराठी कळायला मराठी-इंग्रजी शब्दकोशाचा आधार घ्यावा लागतो, असे भाई माधवराव बागल ‘हिंदुधर्माची समीक्षा’ हा ग्रंथ वाचून त्याचा तर्कतीर्थांना अभिप्राय देत एकदा म्हणाले होते. यात तर्कतीर्थ लेखन पद्धतीचे मार्मिक भाष्य दडलेले आढळते.

डॉ. सुनीलकुमार लवटे

drsklawate@gmail.com