तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींमध्ये दडलेला वक्ता नेहमी आपले विचार जगासमोर मांडण्यास उत्सुक असे. त्यांची हजारांहून अधिक अभ्यासपूर्ण भाषणे याची साक्ष देतात. साधारणपणे १९२३मध्ये तर्कतीर्थ जाहीर भाषणे करू लागले. पुढील ३० वर्षांत त्यांनी हजार भाषणे दिली. ‘साहित्य संमेलनाला अध्यक्ष म्हणून ते दिल्लीला जेवढ्या सहजतेने गेले, तेवढ्याच सहजपणे एखाद्या छोट्या दुकानाच्या उद्घाटनालाही जात राहिले. सहकारी, चरित्रकार, संपादक, समीक्षक म्हणून अनेक वर्षे तर्कतीर्थांच्या सहवासात राहिलेले सव्यसाची साहित्यिक प्रा. रा. ग. जाधव यांनी नोंदवलेली निरीक्षणे खरोखरीच लक्षवेधी आहेत.

‘‘शास्त्रीजींना लिहिण्यापेक्षा बोलणे अधिक प्रिय होते. ते जसे लिहीत तसेच बोलत. त्यांची बोलण्याची शैली पुस्तकी नसे. लिहिण्याची शैली बोलकी असे. शास्त्रीजींच्या बाबतीत मौखिक आणि ग्रांथिक असा भेद संभवत नसे. वाणी आणि लेखणी यांच्यातील आशय-अभिव्यक्तीचे अद्वैत हे शास्त्रीजींचे वैशिष्ट्य होते. बहुधा महिन्याच्या ३० दिवसांपैकी जवळ-जवळ २०-२२ दिवस शास्त्रीजी व्याख्यानांच्या निमित्ताने महाराष्ट्रभर व महाराष्ट्राबाहेरही संचार करीत असत. सुमारे अर्धशतकभर व त्यातील दोनतृतीयांश काळ समाजाचे नाना प्रकारे वैचारिक उद्बोधन करण्यासाठी व्याख्यानव्रत चालवणे, ही सोपी गोष्ट नाही. शास्त्रीजींच्या व्याख्यानकलेत पारंपरिक आचार्यवंशाच्या खुणा अधिक दिसून येतात.’’

तर्कतीर्थांनी दिलेल्या भाषणांच्या नोंदींची जंत्री उपलब्ध नाही. मात्र तर्कतीर्थ साहित्य म्हणून जे ग्रंथ समोर येतात, त्यात भाषणसंग्रहच अधिक आहेत. व्याख्यान संहिता, वृत्ते, पुस्तिका, भाषण संग्रह यांच्या आधारे त्यांच्या भाषणांचा स्थूल आढावा घेणे शक्य आहे. त्यांनी विविध विद्यापीठे, संस्था, स्मृती व्याख्यानमाला, साहित्य संमेलने यांमधून विद्वत्तापूर्ण भाषणे केली. भारतात स्वातंत्र्यलढ्यापासून वक्तृत्व कलेस विशेष स्फुरण चढल्याचे दिसते. लक्ष्मणशास्त्री जोशी हे शि. म. परांजपे, नाथ पै, स्वातंत्र्यवीर सावरकर, साहित्यिक आचार्य प्र. के. अत्रे, प्रा. ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, समाजसेवक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या वक्त्यांच्या पठडीतील वक्ते होत.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या कार्याचा विचार आजवर केवळ प्राज्ञपाठ शाळामंडळ, मराठी विश्वकोश निर्मिती, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाद्वारे मराठीचा ज्ञानभाषा म्हणून केलेला विकास असा मर्यादित स्वरूपात झाला. महाराष्ट्रभर समग्र साहित्य संपादनानिमित्ताने फिरताना व साधन संग्रहातून लक्षात आलेली गोष्ट अशी की त्यांनी मुंबईसारख्या महानगरात ‘सेंटर फॉर दि स्टडी ऑफ सोशल चेंज’ नावाची संस्था १९७२मध्ये आपले रॉयिस्ट सहकारी प्रा. गोवर्धन पारीख, प्रा. अ. भि. शहा, प्रा. एन. व्ही. सोहनी, गोविंदराव तळवलकर, नीलकंठ कल्याणी प्रभृती मान्यवरांसह सुरू केली होती. ती आज ग्रंथालय, संशोधन, समाज परिवर्तन, महिला सबलीकरण, मनुष्यबळ विकास क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर आघाडीवर आहे. तर्कतीर्थ मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे अनेक वर्षे अध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात ती संस्था कर्जमुक्त होऊन तिला स्थैर्य मिळण्यास साहाय्य झाले.

वाईतील सध्याचे किसनवीर महाविद्यालय तर्कतीर्थ यांनी जनता शिक्षण संस्था स्थापन करून सुरू केले होते. त्यांनी प्राच्यविद्या विकासासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेली भाषणे, सादर केलेले शोधनिबंध कोणाला माहीत आहेत? मुंबईच्या एशियाटिक सोसायटीत, गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेत त्यांनी केलेली भाषणे कोण जाणते? भांडारकर प्राच्यविद्या संस्थेतील त्यांचे कार्य आणि करण्यात आलेला गौरव अद्याप अंधारात आहे.

साहित्य अकादमी पुरस्कार मराठीस प्रथम मिळवून देणारे तर्कतीर्थ सर्वांना माहीत आहेत, साहित्य अकादमीने त्यांना आपले ‘महदत्तर सदस्यत्व’ (फेलोशिप) बहाल केले होते व त्या वेळी त्यांनी केलेले भाषण व त्यांना मिळालेले सन्मानपत्र अद्याप गुलदस्त्यात आहे. तर्कतीर्थ पदवी कुणी पाहिली आहे? या नि अशा कितीतरी पैलूंवर अद्याप प्रकाश पडलेला नाही. माहीत नसलेले तर्कतीर्थ समजून घेणे हा तर्कतीर्थांच्या – जीवन, कार्य, विचारांचा समग्र धांडोळा ठरेल.

drsklawate@gmail.com