महाराष्ट्र व गुजरातचे मिळून ‘द्विभाषिक राज्य’ १ नोव्हेंबर, १९५६ला निर्माण झाले, तेव्हा ‘नवभारत’ मासिकाने आपला ऑक्टोबर-नोव्हेंबर, १९५६चा जोडअंक (दिवाळी अंक) ‘भाषा, संस्कृती व राज्य विशेषांक’ म्हणून प्रसिद्ध केला. त्याचा बीजलेख तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी लिहिला होता. त्यात त्यांनी ‘भाषिक राज्य’ संकल्पनेचा वैश्विक, राष्ट्रीय आढावा घेऊन राज्य निर्मितीत भाषा व संस्कृतीचे महत्त्व विशद केले होते.
त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘‘भाषा, संस्कृती व राज्य हे मानवी समाजाचे सर्वथा आवश्यक असलेले घटक होत. भाषा व संस्कृती ही मानव्याची लक्षणे व आविष्कार होत. संस्कृतीत भाषेचा अंतर्भाव होतो. संस्कृती हेच मानव्य होय, असे निश्चितपणे म्हणता येते. हे मानव्य सामाजिक जीवनात व्यक्त होऊन वाढीस लागते. मानव्य हे साध्य असून, राज्य हे त्याचे साधन होय. मानवास लाभलेल्या भाषिक वरदानामुळे तो स्वतंत्र झाला. भाषा हे त्याच्या स्वातंत्र्याचे व वेगळेपणाचे लक्षण ठरले. माणसाला अनेक भाषा घडविता येतात, हेच त्याच्या स्वातंत्र्याचे गमक बनले. भाषेमुळे मानवास विचार करण्याचे व ते निर्मिण्याचे वरदान लाभले. निसर्गावरील मानव विजयाचे भाषा हे साधन बनले. असेही म्हणता येईल की, भाषा हे मानवी स्वातंत्र्याचे प्रधान प्रतीक बनले.
मानवी समाज भिन्न असून, समुदायानुसार त्यांच्या भाषा भिन्न आहेत. हे भाषिक भिन्नत्व प्रदेश विशेषातून तसेच भाषिक आदान-प्रदानातून निर्माण होते. व्यवहारांमधून ही देव-घेव होते. ज्या मनुष्य समुदायाचे स्थैर्य असते, शिवाय जो संख्या व सांस्कृतिक समृद्धीनी विशाल असतो, त्याच्या भाषेचा प्रभाव अन्य छोट्या समुदायावर पडतो. ज्यांची भाषा प्रगत व संपन्न असते, त्यांचा प्रभाव अप्रगत व असंपन्न समुदायाच्या भाषेवर अधिक पडत असतो. बोली, उपभाषा, भाषा अशी भाषेची अनेक रूपे दिसून येतात.
बोली वा उपभाषांना लिपी लाभून त्या समुदायाचे लोक लिहू, वाचू लागले की, त्यांच्यात स्थिरशील व्यवहार तयार होतात. ते शिक्षणाने विकसित होतात. मग ती भाषा ग्रंथनिविष्ट होऊ लागते. त्या बोलीतील लोकसाहित्याचे रूपांतर लिखित साहित्यात होत, त्या भाषेत साहित्य वा सारस्वत परंपरा तयार होते. साहित्य भाषा किंवा ग्रांथिक भाषा हीच विद्या वा कलेचे- पर्यायाने सारस्वताचे साधन व वाहन बनते. पिढ्यानपिढ्यांच्या प्रयत्नांतून तिची परंपरा विकसित होते. त्यातून त्या भाषेत सारस्वत सामर्थ्य निर्माण होते. याला शेकाडो, हजारो वर्षांचा काळ लोटावा लागतो. संस्कृत, इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच इत्यादी भाषांचा इतिहास हेच सांगतो. त्यातून त्यांचे अभिजात पद उदयाला येते. त्यांचे अनुकरण, अनुवाद अन्य भाषा करीत त्या स्वत:स समृद्ध करीत राहतात.
माणसात भाषिक शक्ती निर्माण होते, त्याचे मूळ कारण ‘विश्वव्यापी बुद्धितत्त्व’ (युनिव्हर्सल रीझन) हे असते. विश्व व मानवी जीवन यांच्यात अन्वय निर्माण करण्याचे कार्य भाषा करते. भाषा हा ‘विश्वव्यापी बुद्धिदेवतेचा निनाद’ (व्हॉइस ऑफ युनिव्हर्सल रीझन) होय. हे बुद्धितत्त्व अन्य मानवी समाजावर प्रभाव टाकते.
राज्य हे भाषिक उद्गाराचे अद्वितीय साधन होय. स्वभाषा विकास भावनेतून राष्ट्रीयत्वाची भावना उगम पावते. स्वभाषा ही मानव्याची अपरिहार्य व नैसर्गिक मर्यादा आहे. त्या मर्यादेत आपण विश्वमानवतेची उपासना करू शकू, असे त्यास वाटते. हर्बर या जर्मन तत्त्वचिंतकाने याचा पुरस्कार केला होता; पण तो फोल ठरला. राज्यमूलक राष्ट्रीयत्व स्वीकारत स्वयंपूर्ण होण्याचा व निभाव लागण्याचा काळ विसाव्या शतकात राहिला नाही. उलटपक्षी राज्य हे राष्ट्रीय जीवनाचे अंग बनण्याचा म्हणजेच राष्ट्रीय राज्य (नॅशनल स्टेट) हा वर्तमान राजकीय विचारसरणीचा कल बनला आहे.’’
भाषा, संस्कृती व राज्य या त्रितत्त्वांचा एकात्म विचार हेच जागतिक राजकारणाचे अभिन्न अंग बनले आहे. हे तर्कतीर्थांनी या लेखातून स्पष्ट केले आहे. त्यातून त्यांचे राज्यशास्त्रविषयक आकलन स्पष्ट होते. भाषा, संस्कृती व राज्यसंबंधांचे हे विश्लेषण त्यांचा व्यासंग अधोरेखित करणारे आहे. drsklawate@gmail.com
