वैचारिक लेख हे साहित्यविश्वात भाषणसदृश लोकप्रबोधन व लोकजागृतीचे प्रभावी साधन मानले जाते, म्हणून विचारपरिवर्तन करायचे असेल, तर प्रगल्भ चिंतक लेख लिहिणे पसंत करतो. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी तत्कालीन साप्ताहिक ‘केसरी’च्या ८ फेब्रुवारी, १९२७च्या अंकात ‘धर्मशास्त्र संशोधनाची दिशा’ हा वैचारिक लेख लिहित आपल्या साहित्यसर्जनाचा प्रारंभ केल्याचे दिसते. पुढे ते शेवटच्या श्वासापर्यंत लेख लिहित राहिले. सुमारे सात दशकांच्या आपल्या लेखनकाळात तात्त्विक, आत्मपर, राजकीय, धार्मिक, साहित्यिक, शैक्षणिक, ऐतिहासिक, सामाजिक स्वरूपांचे लेख लिहिले. काही इंग्रजी वैचारिक लेखांची मराठी भाषांतरेही केली. व्यक्तिलेख, वृत्तांत, प्रवासवर्णन असेही लेखन केले. सुमारे अडीचशे लेख त्यांनी लिहिल्याचे आढळते. हे जरी खरे असले तरी अप्राप्त लेखांचा ऐवजही मोठा आहे. लेख संकलनाचे कार्य तर्कतीर्थ निवर्तल्यानंतर तीनएक दशकांनी हाती घेतल्याने समाजातील जतनसाक्षरतेच्या अभावामुळे एक मोठा दस्तऐवज काळाच्या उदरात गडप झाला.
जो वैचारिक लेखांचा ऐवज हाती आहे, त्याआधारे म्हणता येते की, तर्कतीर्थांचे हे लेखन त्यांच्या भारतीय व पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या वाचन, विचार व चिंतनाची फलश्रुती होय. ‘भारतीय तत्त्वज्ञान : उदय व विकास’सारखा लेख भारतीय षड्दर्शनांना आपसूक कवेत घेतो. पाश्चात्त्य दर्शनाने भारतीय धर्म व समाजपरिवर्तनाचे आलेखन तर्कतीर्थ ज्या सहजपणे आपल्या विविध लेखांमधून करतात, त्यातून त्यांचा या उभयदर्शन प्रवाहावरील एकाधिकार लक्षात येतो. भारतीय प्राचीन दर्शनांसारखे नवे तत्त्वज्ञान आधुनिक भारतात तयार न झाल्याचे शल्य ते ‘आधुनिक भारतीयांतील तत्त्वज्ञानाचे दारिद्र्य’ लेखात व्यक्त करतात. तत्त्वज्ञानाइतकाच रस आणि व्यासंग तर्कतीर्थांच्या सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक व शैक्षणिक लेखांमधून प्रतिबिंबित होताना आपण पाहतो, तेव्हा आपल्या लक्षात येते की, तर्कतीर्थांचे वाचन, चिंतन, मनन सर्वविषयव्यापी आहे. राजकारणातील विविध पक्षांइतकाच अभ्यास विविध विचारधारांचा असणे, यातून त्याची उदारमतवादी वैचारिक घडण स्पष्ट होते.
भाषा ज्ञानवाहक हवी. साहित्य जीवनलक्ष्यी असावे. संस्कृती मानवविकास केंद्रित राहावी, असा आग्रह आणि अपेक्षा असणारे तर्कतीर्थ निरंतर उच्चतर मानव्याच्या दिशेने जाणारे लेख लिहित राहतात, यातूनही त्यांची नवमानवतावादी समाजनिर्मितीची ओढ ठळक होत राहते. स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षतेसारखी सांविधानिक मूल्ये प्रमाण मानत जीवन जगणारे तर्कतीर्थ विज्ञाननिष्ठा, विवेकवाद, अंधश्रद्धा निर्मूलन, अहिंसा, सहिष्णुता, समन्वय वृत्ती अंगीकारत जे लेखन करतात, ती केवळ लेखनकामाठी न राहता, जीवन ध्येय व दिशा म्हणून पुढे येते, यात त्यांच्या लेखांची इतिकर्तव्यता व फलश्रुती शोधता येते.
तर्कतीर्थांनी अनेक संशोधनपर निबंध लिहिले आहेत. विविध परिसंवादांमधून त्यांनी व्यक्त केलेले विचार त्यांना पुरोगामी प्रबोधक ठरवितात. अनेकानेक व्यक्तिमत्त्वांबद्दल तर्कतीर्थ जे व्यक्तिलेख लिहितात, त्यातून त्यांची गुणग्राहकता अधोरेखित होते. ती व्यक्तिपूजा न होता, वृत्तीचे अनुकरण व अनुशीलन असते हे विशेष. साहित्य कला, संगीत, योग, पत्रकारिता असे बहुआयामी व्यक्ती व विचार आकर्षण असणे यातून व्यापकतेचा ध्यास स्पष्ट होतो. कार्ल मार्क्स, वर्नर हाइसेनबर्ग, मायकेल पोलॅनी, फिलिप स्पॅट, आयझॅक बेहावीस सिंगर, मानवेंद्रनाथ रॉय यांच्या अनेक इंग्रजी लेखांची मराठी भाषांतरे करून तर्कतीर्थांनी वैश्विक भ्रातृभाव स्पष्ट केला आहे. धर्मसुधारता ते वैश्विक एकता, असा व्यापक वैचारिक पट ते आपल्या लेखांमधून उभा करतात. प्रवासवर्णने तर्कतीर्थांसाठी केवळ देशाटनाचे वृत्तांत लेखन नसते; उलटपक्षी कविवर्य मोरोपंतांची आर्या- ‘केल्याने देशाटन, पंडित मैत्री सभेत संचार। शास्त्रग्रंथविलोकत, मनुजा चातुर्य येतसे फार।।’ हेच त्यांचे जीवन बनून जाणे यात तल्लीनता आहे. ती एका कळवळ्याची तळमळ बनणे म्हणजे त्यांचे व्यासंगी लेखन होय.
तर्कतीर्थांचे सर्वप्रकारचे लेख नव्या विचारयुगाची नांदी असते. ती समाजाची नैतिक अधिष्ठाने व्हावीत, असा त्यांचा अट्टहास असतो. नवक्रांतीची साधना करीत शतक नव्या विचार उन्मेषांनी भारावलेले असावे, असे तर्कतीर्थांना निरंतर वाटत राहणे, यातूनही त्यांच्या मनात संशयग्रस्त भवितव्यातून मानवी जीवन चिरंतन मानवी मूल्यांवर उभे करण्याचे स्वप्न लक्षात येते.
